शनिवार, १७ जून, २०१७

जाहीर कबुली

र्ष २००० मध्ये गावातीलच शाळेतून ६५.२० टक्के घेऊन दहावी पास झालो. त्याचा ना अनंद झाला ना दुःख. बस आला दिवस गेला दिवस असेच होते; कारण यातील एकही गुण मनाने लिहून मिळवलेला नव्हता. सरसगट नवनित अपेक्षित मधून पाहून लिहिले. त्यातही नसले की काॅपीवर लक्ष ठेवण्यासाठी असलेले शिक्षकच फळ्यावर लिहून देत. पण, काॅपी करून गुण मिळविले हा माझा अवगुण नव्हता. आमच्या शाळेची, गावाची, परिसराची एवढेच नाही; तर तालुक्याची ती परंपरा होती. तिचा मी पाईक झालो. खुद्द आमच्या भागातील तत्कालीन आजी-माजी आमदार सुरळीतपणे काॅपी सुरू आहे का, हे पाहायला येत. काॅपी करू द्या, अशा सूचना केंद्रप्रमुखांना करत. कधी आलेच तर शिक्षण विभागाचे अधिकारी येत; तेही हाच कित्ता गिरवत पार्टी झोडून परत जात. पुढे तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यातल्या नामांकित एका कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळा नावाजलेली. दरवर्षी ४ ते ५ विद्यार्थी मेरीट येत. (यात शिक्षकांची मुलं किंवा त्यांचे नातेवाईकच अधिक) परंतु, तिथेही तेच. फक्त काॅपी करण्याची पद्धत शिस्तबद्ध. या ठिकाणी ९० टक्के गैरमार्ग आणि १० टक्के मनाने लिहून बारावीची परीक्षा दिली. ५९ टक्के मिळाले. त्यानंतर पदवीसाठी जिल्हा ठिकाणी गेलो. काॅलेज एकदम कडक. आजूबाजूला शहरी मुलं. झालं आत्मविश्वास गमावला. बीएच्या पहिल्याच वर्षी नापास झालो. कशीतरी एटीकेटी मिळाली. मग 'चादडली' पदवी मिळविण्यासाठी तब्बल साडेपाच वर्षे लागले. ते केवळ अन् केवळ गावाकडे असलेल्या शिक्षणाच्या खेळखंडोब्यामुळेच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा