शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

धोंडिबा रतन झोडापे


रात्रीचे दहा-साडेदहा वाजलेले. सगळीकडे निरव शांतता. नुकताच पाऊस पडून गेलेला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले. शहरातील हिंदू-मुस्लिमबहूल भागातील एक मंदिर. पथदिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात मंदिराच्या पायऱ्यांवर बसून तीन ते चार म्हातारे गप्पा करत असलेले. त्यातच मंदिराचा पुजारीही. काहीच अंतरावरील कट्ट्यावर तरुण मुलांचा एक ग्रुप बसलेला. त्यातील एक दोघं स्मार्टफोनवर काहीतरी गांभीर्यानं पाहत असलेले. कुणी कानात एअरफोन टाकून गाणं ऐकत असलेला तर कुणी चॅटिंगमध्ये व्यस्त.
""अबे, ही पाह्य चिखलीची क्‍लीप.'' एका तरुणानं आपला मोबाईल दुसऱ्याकडं देत म्हटलं.
""लै हॉट हय बे..!'' उत्सुकतेनं दुसऱ्या तरुणानं फोनमध्ये डोळे खुपसत प्रतिक्रिया दिली.
याच वेळी दिवसभर सायकल रिक्षा चालवून थकलेल्या अवस्थेत एक जळकटेलला, मळकटलेला पंचवीस-तिशीतला तरुण घराच्या दिशेनं पायडल मारत जात होता. एका हातात चिलीम. डोळे ताठरलेले. बहुधा गांजा ओढत असावा. हॅण्डलला एक काळी कॅरिबॅग लटकवलेली. समोरून कोण येतंय, किती वेळ झाली याचं काहीही घेणं-देणं त्याला नव्हतं. गांजाची झिंग आणि डबक्‍यात साचलेल्या पाण्यामुळं नेमकं मंदिरासमोर रस्त्यातील खड्डयाचा अंदाज त्याला आला नाही. कॅरिबॅग उसळली. खाली पडली. त्यात मांसाचे तुकडे होते. ते मंदिरासमोर पडले. रिक्षाचालकानंही अचानक ब्रेक लावले. मांसाचे तुकडे वेचण्यासाठी तो खाली उतरला. नेमकं हेच दृश्‍य एका म्हाताऱ्यानं आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून नजरेत कैद केलं नि ""अरं मंदिरापुढं मांस'' म्हणत आरोळी ठोकली. पुजारीही खवळला, ""बाटवलं मंदिर बाटवलं'' म्हणत आरडा-ओरड सुरू केली. ""पकडा सायाच्याले'' म्हणत म्हातारे रिक्षाचालकाच्या अंगावर धावले. तो बिच्चारा गांगरून गेला. या गोंधळामुळं तरुणांचे लक्ष मंदिराकडे गेले.
""रमश्‍या काय झालं बे तिकडं?''
""मंदिर बाटवलं म्हंते ब्बा तात्या.''
""बाटवलं?''
""च्या मायले! कोण कशाले मंदिर बाटवलं''
तरुणांचा हा संवाद सुरू असतानाच पुजाऱ्यानं पुन्हा आरोळी ठोकली, ""ओ पोरोहो, या लांड्यानं मंदिरापुढं मांस आणून टाकलंऽऽऽ''
त्याच्या या आवाजानं मंदिराजवळ असलेल्या झाडांवरील पाखरंही घाबरून एकसाथ उडाली. ""मांस? अरं, चला!'' म्हणत पोरांनी मंदिराकडे धूम ठोकली. म्हाताऱ्यांनी रिक्षाचालकाला पकडून ठेवलं.
""जाऊ द्या राजा मले, बायको लेकरं वाट पाह्यले.'' म्हणत रिक्षाचालक त्यांच्या तावडीतून सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत बोलला.
तरुणांच्या घोळक्‍यानं त्यांच्या जवळ येताच त्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारायला सुरवात केली.
""विज्या नक्कीच हे गोमांस हय'' एक जण बोलला.
""काय ह्यय बे हे.. कुठून आणलं?'' रिक्षाचालकाचे मानगूट पकडत दुसऱ्यानं इचारलं.
""नाई ह्यो गोमांस नाई.'' रिक्षाचालक विनवनी करीत पुन्हा बोलला.
""त्याले कायले इचारतं'' म्हणत अन्य एकाने पुन्हा त्याला लाथाबुक्‍या मारायला सुरवात केली.
""थांब मी राजूअण्णाले फोन लावतो'' म्हणत एकजण बाजूला झाला. त्यानं फोन लावला. ""अण्णा, पटकन गाडी घेऊन या! मंदिरापुढं एका लांड्यानं गोमांस टाकलं,'' असं सांगत त्यानं फोन कटही केला. रिक्षाचालक त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. पण, तरुणांचं टोळकं ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. काहीच वेळात दहा-पंधरा मोटारसायकल आल्या. कुण्या गाडीवर तिघे तर कुण्या दोघे बसलेले होते. तिघा-चौघांनी रिक्षाचालकाचं बोंकाडं धरलं. त्याला जबरदस्तीने एका मोटारसायकलवर बसवून पोलिस ठाण्यात नेलं. "जय श्रीराम'चे नारे देत आताच्या आता गुन्हा दाखल करा म्हणून पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. उगाच आफत नको म्हणून पोलिसांनी "एनसी' नोंदवली. कडक कारवाई केली जाईल, कत्तलखाना शोधाला जाईल, म्हणतं ठाणेदारानं त्यांची बोळवण केली. गांजाची चढलेली झिंग नि कार्यकर्त्यांचा रुद्र अवतार पाहून बिच्चारा रिक्षाचालकही आपलं म्हणणं ओरडून ओरडून सांगत अचानक गपगुमान झाला. प्रकरण पेट घेईल म्हणून पोलिसांनी रात्रभर त्याला ठाण्यातच ठेवलं. परीक्षणासाठी मांस लॅबमध्ये पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी अहवाल आला, "मांस हल्याचं आहे म्हणून.' लागलीच पोलिसांनी रात्रीच्या तरुणांना बोलावून घेतलं. सार्वजनिक ठिकाणी आरोग्यास घातक पदार्थ फेकल्याच्या आरोपाखाली रिक्षाचालकावर गुन्हा नोंदविला गेला. एव्हाना रिक्षाचालकाची झिंग उतरली. कुणीतरी नवसाला हल्या कापला तेच मांस दावत म्हणून तो घरी घेऊन जात होता. त्याच्यावर गुन्हा नोंदवून करून आपण खूप मोठं सामाजिक काम केल्याच्या आविर्भावात तरुण निघून गेले. दंगल होता होता थांबवली म्हणत पोलिसांनीही स्वतःची पाठ थोपटून घेतली. रिक्षाचालक भेदरलेल्या अवस्थेत ठाण्याच्या परिसरात बसून होता. काही वेळाने क्राइम रिपोर्टर आले. त्यांना त्याला नाव विचारलं. तो उत्तरला, ""धोंडिबा रतन झोडापे.''
 ■ विकास विनायकराव देशमुख
मु. करडा, पो. मोठेगाव, ता. रिसोड, जि. वाशीम.
हॅलो- 9850602275
vikas.535388@gmail.com

मंगळवार, २६ जून, २०१८

बहिणाबाई चौधरी : एक काल्पनिक कवयित्री


हिणाबाई चौधरी. मराठी साहित्यातील अजरामर नाव. धरतीले दंडवत या चौथीतील कवितेमुळे पहिल्यांदा त्यांची ओळख झाली. पुढे रेडिओ, डीडी टेनवर अधून-मधून बहिणाबाईंची गाणी ऐकायला मिळत. त्यावेळी फार काही कळत नव्हतं. तरीही त्यातील नाद, ग्रामीण बोलीतील हलके-फुलके शब्द, अगदी सहजतेनं कुठलीही जोर-जबरदस्ती न करता जुळवून आलेलं यमक. सारंच कसं कानाला मधुर वाटे. खरं सांगायच तर कवी म्हणून जर पहिल्यांदा कुणाचं नाव मला माहित झालं तर ते बहिणाबाईंचं. जसं-जसा मोठा होत गेलो तसं-तसं गावातील शिकलेल्यांकडून, शाळेतील शिक्षकांकडून कधीतरी बहिणाबाईंविषयी ऐकायला मिळे. याच काळात माझी बहीण आरतीताई कुठंही गेली तरी  माझ्यासाठी चाचा चौधरी, ‘चंपक, ‘अकबर-बिरबल अशी गोष्टींची पुस्तकं आणत होती. त्यातून वाचनाची आवड वृंद्धिगत झाली. पण, बहिणाबाई काही वाचायला मिळालीच नाही. पुढे आठवी, नववीत असताना रिसोड, अकोला आणि वाशीमला पुस्तकांच्या दुकानांत बहिणाबाईंच्या पुस्तकांचा शोध घेतला. कुठंच मिळालं नाही. पौंगाडवस्था आली तशी वाचनाची रुचीही बदलली. वि. स. खांडेकर, व. पु. काळे, गुरुनाथ नाईक यांच्यासारख्या लेखकांच्या रंजक कथा आवडायला लागल्या. सुरेश भट, ना. धों. महानोर, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे रात्र-रात्र जागून वाचून काढले. स्वप्न पाहायचं ते वय होतं नि ही मंडळी वर्तमानाऐवजी स्वप्नच दाखवत होती. त्यामुळं त्यांच्या पुस्तकांसह ती भावत होती. शिक्षणासाठी गाव सोडलं. वाशीम गाठलं तसं मिशाबरोबरच मतंही फुटलं. स्वप्न दाखवणारं हे साहित्य फुटकळ वाटू लागलं. विज्ञानवादी साहित्यानं दृष्टीकोन बदलला. पणबहिणाबाई काही डोक्यातून जात नव्हती अन् आर. ए. काॅलेजची लायब्ररी, वाकाटक, रिसोडचं विवेकानंद इथं कुठं ती भेटतही नव्हती. अचानक एक दिवस विष्णू जोशीनं अनेक जुन्या नियतकालिकांची थप्पी रुममध्ये आणून टाकली. ती चाळता-चाळता एक जीर्ण, जागोजागी फाटलेलं पुस्तक सापडलं. ते बहिणाबाईंच्या गाण्याचं होतं. कोण आनंद झाला. अधाशासारखं वाचून काढलं. त्यातील उपमा, उपमेय, विचार यानं भारावून गेलो. त्यावर समीक्षक दृष्टीनं विचार केला तर  जाणवलं, बहिणाबाई चौधरी नावाची कुणी कवयित्रीच नाही. मग या नितांत सुंदर, इतक्या दर्जेदार कविता लिहिल्या तरी कुणी, हा प्रश्नही होताच. 


सोपानदेवांच्याच कविता 

प्रसिद्ध कवी तथा मराठीचे प्राध्यापक, अभ्यासक सोपानदेव चौधरी यांच्या बहिणाबाई या आई. सोपानदेव यांनीच त्यांच्या काही कविता बहिणाबाईंच्या नावावर खपवल्या हे माझं ठाम मत आहे.  ते कुणाला मान्य असो वा नसो. पण, बहिबाईंची गाणी या संग्रहाचे रचनाकार सोपानदेवच आहेत, असं मला वाटतं.


या आहेत शंका

बहिणाबाईंची सर्व गाणी ही देवीवर वृत्तात आहेत. यात प्रत्येक ओळीत फक्त आठच अक्षरं असतात.  मोठ्या सरावानं, कष्टानं आणि शब्द मोजून प्रसंगी कंजुसपणा करून यामध्ये लिहावं लागतं. हे काम सोपं नाही. त्यासाठी सरावाबरोबरच अभ्यासही हवा. आपण चिकित्सकपणे वाचलं तर लक्षात येईल की, भल्याभल्यांना देवीवर जमलं नाही. तिथे इतरांचं काय? मग अक्षर आेळख नसतानाही बहिणाबाईंनी देवीवरमध्ये अक्षर मोजून लिहिलंच कसं? एवढेच नाही तर बहिणाबाईंनी अनुष्टुपमध्येही लिहिण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांच्या कवितांवरून दिसते. माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ही रचना तर फक्त भाषा विज्ञानाचा तज्ज्ञच लिहू शकतो. 
एक वेळ मान्य की या कविता बहिणाबाईंच्याच आहेत. पण, जर सोपानदेवांना (बहिणाबाईंचा प्राध्यापक मुलगा) माहिती होतं की आपल्या आईच्या कविता या खूप छान आहेत, आधुनिक आहेत (मर्ढेकरांच्या काळातच) तर त्यांनी तिच्या अगोदर स्वतःचा काव्यसंग्रह का प्रसिद्ध केला? बहिणाबाई हयात असतानाच सोपानदेवांना कवी म्हणून मान्यता मिळाली, त्यांचं नाव झालं. जेव्हा त्यांना प्रसद्धीची गरज राहिली नाही तेव्हा त्यांनी बहिणाबाईंच्या निधनानंतर आचार्य अत्रेंच्या मदतीने बहिणाबाईंच्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला. तो बहिणाबाईंच्या जिवंतपणीच का प्रकाशित केला नाही. कारण त्या कविता वाचून, ऐकून बहिणाबाईंना भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली असती आणि त्या कविता बहिणाबाईंच्या नाही तर सोपानदेवांच्या आहेत हे कळलं असतं, ही भीती सोपानदेवांना असू शकते. त्यामुळेच बहिणाबाई गेल्यानंतर त्यांनी तिची गाणी रसिकांसमोर आणली असावीत. 
विशेष म्हणजे बहिणाबाई या माहेर, सासर या परिसराच्या बाहेरही कधी गेल्या नाहीत. घर, शेती आणि गाव एवढंच त्यांचं अनुभवविश्व, तरीही त्यांच्या कवितेतील तत्तज्ञान थक्क करायला लावणारं आहे. एका कवितेत त्यांना गावकुसाबाहेरच्या व्यक्तींचा कळवळा येतो. तीही माणसंच आहेत, त्यांनाही हक्क आहेत, हे त्या ठामपणे सांगतात. ज्योतिष्या माझा हात पाहू नको असे सत्यशोधकी विचार मांडतात. तरीही त्या दिशेने त्यांची कृती शून्यच आहे. आपल्या गाण्यांतून चार-चौघांना समजावून सांगताना त्या व्यवस्थेवर हल्ला करत असतील तर त्यांनी अनिष्ठ रुढी, परंपरा नष्ट होण्यासाठी कृती का केली नाही; कारण हेच की ते विचार बहिणाबाईंचे नसून ते त्यांच्या शिकलेल्या मुलाचे होते. तेही गाव सोडल्यानंतर, पदवीनंतरचे. गंमत म्हणजे स्वतःच्या हातावर, कतृत्वावर विश्वास ठेवा असा उपदेश करणाऱ्या बहिणाबाईंची माझी माय सरसोतीही कविता वरील कवितेच्या विसंगत आहे. ज्योतिष्याला जे सांगितलं ते स्वतःचंच मत त्यांनी स्वतः क्राॅस केलं. ते यासाठीचं लिहिलं असावं की एक अडाणी बाई एवढं सारं कसं सांगू-लिहू शकते हे कुणी विचारलं तर त्याला गप्प करण्यासाठी माझी माय सरसोती, मले शिकवते बोली.. हे उत्तर आहेच. 
नाही म्हणायला बहिणाबाईंचं चरित्र जसं रंगवल्या गेलं तशा स्वभावानुसार संसार, घर, माहेर, सासर अशा कविताही संग्रहात आहेत. परंतु, त्यातील देवीवरची अचुकता सांभाळण्याची कसरत आणि तत्वज्ञान पाहिलं तर वाटतं की एका अशिक्षित व्यक्तीचं हे काम नाही. हे सोपानदेवांनीच लिहिलं हे नक्की. काहीही असो या कविता म्हणजे गावरान मेवाच आहेत. आचार्य अत्रेंच्या शब्दांत सांगायचं झालं तर जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशा बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे.


- विकास वि. देशमुख Vikas V. Deshmukh 
करडा, रिसोड, वाशीम. Karda, Risod, Washim

रविवार, २२ एप्रिल, २०१८

बिलंदर अन् कलंदर


नितीन पगार ( Nitin Pagar )
जही आठवतं. जुलै २००२ मधील एक दिवस. मी राजस्थान महाविद्यालयात बीए फस्ट इयरला होतो. वाशीमला येऊन मला फार-फार तर आठवडा झाला होता. काॅलेजमध्ये सायकल पार्किंगच्या नावाखाली महिन्याकाठी ४० ते ५० रुपये उकळले जात होते. त्या काळात मापारीच्या टपरीवर चहाचा एक कट दोन रुपयांना तर एक प्लेट गरमा-गरमा पोहे तीन रुपयांना मिळत. एकूणच काय तर १५० रुपयांत पोरांचा महिन्याभराचा चहा-नाष्टा होत होता. त्यात सायकल पार्किंगचे ५० रुपये म्हणजे अतीच होते. या विरोधात सुरेंद्र गीते या विद्यार्थी नेत्याने काॅलेज प्रशासनाविरोधात आंदोलन केले. झाडून सगळे विद्यार्थी त्याच्या पाठीशी उभे राहिले. काॅलेज बंद पाडलं. पण, मालू सरांसमोर बोलणार कोण? सगळेच एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहात होते. इतक्यात साउथच्या हिरोप्रमाणे नितीन पगार या युवा पत्रकाराची एमएटीवरून एंट्री झाली. सुसाट आलेल्या नितीनभाऊंची गाडी थेट मालूसरांच्या कक्षाबाहेर थांबली. जिथं खुद्द प्राचार्याची चारचाकी उभी होत नव्हती. तिथं या पठ्ठयानं आपली भंगार एमएटी मोठ्या स्टाइन उभी केली. सातशे-आठशे विद्यार्थी आवाक् झाले. नितीनभाऊनं नरजेच्या एका टापून विद्यार्थ्यांची गर्दी टिपली. गीते यांच्यावरही एक कटाक्ष टाकला अन् कवेलूच्या एका वर्गखोलीबाहेर गुलमोहराखाली बसलेल्या पाच ते सहा विद्यार्थ्यांकडे त्यांची पावलं वळली. हे विद्यार्थ्यांचं टोळकं म्हणजे माझ्याच वर्गात. (हे नंतर मला कळलं) त्यात एक किडकिडीत बांधा असलेला, काळा ठिक्कार मात्र चेहऱ्यावर तेज असलेल्या एका पोरासमोर नितीनभाऊ जाऊन थांबले. तो पोट्टा म्हणजे संदीपभाऊ ताजणे. भाऊच्या सोबत असलेल्यांनी लागलीच भाऊच्या हातात व्हिडिओ कॅमेरा दिला. टीव्ही पत्रकार आला, टीव्ही पत्रकार आला’ म्हणत आम्ही खेडवळ पोर त्यांच्या दिशेने पळालो. भाऊंनी संदीपभाऊंसमोर कॅमेरा धरला नि संदीपभाऊंनी आवेशात विद्यार्थ्यांची समस्या मांडली. कसलेल्या, मुरलेल्या नेत्यांप्रमाणे त्यांनी नितीनभाऊंना बाइट दिली. ते आवेशपूर्ण बोलणं ऐकून मालूसरही बाहेर आले अन् पार्किंग शुल्क रद्द केल्याची घोषणा केली. नितीनभाऊंच्या अनुभवी नजरेनं एवढ्या गर्दीतूनही खरा विद्यार्थी नेता हेरला. संदीपभाऊनंही अस्सल राजकारण्याप्रमाणे सुरेंद्रभाऊंचं आंदोलन हायजॅक केलं. (या कामी त्यांना नितीनभाऊंची मदत झालीच) पुढं-पुढं मी कविता लिहियला लागलो. ती कविता घेऊन झाडून सगळ्या वर्तमानपत्रांच्या पत्रपेट्यात टाकायला लागलो. लोकमतशिवाय कुणी माझी कविता छापेना. त्यामुळे स्वतः कार्यालयात जाऊन कविता देण्याचे ठरविले. थेट नितीनभाऊंच्या 'नवराष्ट्र'मध्ये गेलो. हा प्रसंग त्यांना आठवत नसेल किंवा असेल माहित नाही. पण, आॅफिसमध्ये नितीनभाऊ एकटेच बसलेले होते. त्यांनी माझी कविता घेतली. वाचली. छापू म्हणाले अन् एक ते दीड सात मला बसवून ठेवत वेगवेगळ्या कविता ऐकवत राहिले. त्यांची कवितेची आवड, कविता ऐकविण्याची स्टाइल पाहून मी त्यांचा फॅन झालो. गंमत म्हणजे त्यावेळी माझी ठेवून घेतलेली कविता नितीनभाऊनं अजूनही छापली नाही. पुढं अकोला दर्शनमध्ये मी, अतीशभाऊ आणि नितीनभाऊंनं तीन वर्षे सोबत काम केलं. आम्हा तिघांनाही त्यातून आर्थिक फायदा असा फारसा काही होत नव्हता. पण, काम करताना खूप मज्जा येत होती. नितीनभाऊंकडून खूप शिकायला मिळाले. दिवसभर आम्ही दर्शनमध्ये काम करत होते अन् रात्री मी आणि नितीनभाऊ सगळं वाशीम त्यांच्या एमएटीवरून फिरून पहाटे कधीतरी २ ते ३ वाजता आमच्या सिव्हिल लाइनच्या रुमवर झोपायला जात होतो. त्यावेळी वाशीममधील सगळे भिकारी, बेघर, मनोरुग्ण, निराश्रित, बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशनवर झोपणारे या सगळ्यांना नितीनभाऊ नावानीशी ओळखत होते अन् तेही नितीनभाऊंना ओळखत होते. काही भिकारी आपुलकीनं, मायनं नितीनभाऊंच्या हातावर चाराणे-आठाणेही ठेकवत असल्याचे मी स्वतः पाहिले. खरंच इतक्या शेवटच्या घटकापर्यंतही हा माणूस जनसंपर्क ठेवून आहे. एका भिकाऱ्याजवळ ते स्वतः बसून त्याच्यासोबत शोलेतले डाॅयलाॅग म्हणत. त्यातून भिकाऱ्याचे मनोरंजन तर होतेच होते. शिवाय त्यावेळी हा माणूस स्वतःलाही विसरून जात होता. इतका हा माणूस साधा आहे. अशातच एकदा नितीनभाऊंनं आमदार पाटणी यांच्या विरोधात 'आधुनिक मनू' या हेडिंगखाली दर्शनमध्ये बातमी छापली. त्यावेळी दर्शनमध्ये संपादक म्हणून अतीशभाऊचे नाव छापून येत होते. झालं खवळलेल्या पाटणी साहेबांनी अतीशभाऊंच्या नावानं तब्बल एक कोटी रुपयांच्या मानहानीची नोटिस पाठवली. त्याच वेळी एका आंबेडकरी कार्यकत्याच्या विरोधातही नितीनभाऊंनी झारीतील शुक्राचार्य या शीर्षकाखाली छापले. तोही दर्शन कार्यालयात आला नि इथूनच उडी मारून आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. पण, याची कधी नितीनभाऊनं पर्वा केली ना आपली रोखठोक भूमिका बदलली. नितीनभाऊचं आणि माझं अनेकदा बिनसलं. भांडणही झालं. आजही अधून-मधून होतं. अनेक मुद्द्यावर आमचे मतभेद आहेत परंतु मनभेद नाही. हा माणूस मला खूप आवडतो. लहान मुलासारखं महात्मा फुले मार्केटमध्ये बसून अजूनही खोड्या करतो तर त्याच वेळी मोठ्या प्रगल्भतेने, जाबादारीनेही वागतो. असंच एकदा दर्शनमध्ये आम्ही बसलेलो असताना एक तृतीयपंथी पैसे मागायला आला. त्यावेळी नगरपालिका निवडणुका सुरू होत्या. नितीनभाऊनं त्याला बसवलं अन् तू राजकारणात का जात नाही हे त्याच्या डोक्यात घुसवलं. झालं त्या तृतीयपंथीने नितीनभाऊंच्या सल्ल्यानं दुसऱ्याच दिवशी निवडणूक अर्ज भरला नि निवडणूक लढविली. असा हा माणूस बसल्या बसल्याच राजकारणातील गणितं बललून टाकतो. नितीनभाऊंचे असे एक ना अनेक किस्से आहेत. 
या कलंदर अन् बिलंदर माणसाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!    

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

व्हॉट्‌सअॅपचे घोस्ट रायटर आहेत तरी कोण?

काहींकडे अफाट प्रतिभा असते. त्या बळावर ते उत्तोमत्तोम कथा, कविता लिहितात. त्यांच्या कथेवर चित्रपट निघतो. त्यांच्या कविता गाणं म्हणून हीट होतात. पण, या साहित्यकृतीच्या निर्मितीचे श्रेय तिच्या मूळ लेखक-कवीला मिळतच नाही. कुणी तरी बडा दिग्दर्शक, लेखक, निर्माता बक्कळ पैसे देऊन त्यांची ही कलाकृती विकत घेतो अन्‌ त्या खाली स्वतःचे नाव लावतो. हा प्रकार सिनेजगतात नवीन नाही. आपली कलाकृती विकणाऱ्या साहित्यिकाला चंदेरी दुनियेत घोस्ट रायटर म्हणतात. असेच घोस्ट रायटर सोशल मीडियामध्येही आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फेसबुक, व्हॉट्‌सअॅपवर दिवसभरात नानाविविध विषयांची माहिती आपल्याला मिळते. त्यात कधी सुविचार असतात तर कधी आरोग्याबाबत काय काळजी घ्यावी, पाणी कसे प्यावे इथंपासून ते पार चीन अमेरिका, सीरियामधील घडामोडी, या सरकारमुळे अच्छे दिन कसे येणार ते अच्छे दिन येणारच नाहीत, अशा सगळ्याविषयांवर साधक-बाधक विचार, लेख आपल्याला चटक फू वाचायला मिळतात. शिवाय या लेखांच्या लेखकाला ना त्याचे श्रेय हवे असते ना ते कॉपी राइटचा दावा ठोकतात. पण कधी विचार केला का, की कुठल्याही विषयावर साधं पानभर लिहायचं तर किती संदर्भ जमा करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, संबंधित विषयाच्या तज्ज्ञाला बोलून "कोट' करावा लागतो. मग कुठे त्या विषयाची मांडणी करायला सुरवात होते. परंतु, घटना घडते अन्‌ तास-दोन तासात तिचे संदर्भासहीत विश्‍लेषण फेसबुक, व्हॉट्‌सअॅपवर व्हायरल होते. हे कसं शक्‍य आहे? हे छोटे मोठे लेख लिहिते तरी कोण? कोण आहेत हे घोस्ट रायटर? त्यांचा हेतू काय आहे, याचा आपण शोध न घेताच आपल्याला आवडलेले लेख. माहिती शेअर-फॉरवर्ड करतो.

विशिष्ट हेतूने लेखन 
विविध राजकीय पक्ष, विचारधारेच्या संघटना, जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, कंपन्या, जाहिरात एजन्सी हे विशिष्ट हेतूने काम करतात. जन माणसांवर प्रभाव पाडून आपल्याला हवा तसा बदल घडवून आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठी त्यांचे स्वतःचे आयटी सेल आहेत. कर्मचारी आहेत. या माध्यमातून आपल्या विचारांचा, कार्याचा आणि उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी ते या अटी सेलमधील कर्मचाऱ्यांना कामाला लावतात. प्रसंगी विरोधकांच्या उणिवा शोधून त्यावरही लिहिले, दाखविले जाते. या सेलमधील कर्मचाऱ्यांना तत्काळ हवे ते संदर्भ मिळावेत यासाठी त्यांच्याकडे व्हिडिओ, ऑडिओ आणि ई पुस्तकांची लायब्ररी आहे. गरज पडल्यास ते यू ट्यूब, न्यूज पोर्टल यांचाही संदर्भ घेतात. विषयानुसार एक व्यक्ती संदर्भ उपलब्ध करून देते तर दुसरी व्यक्ती त्याच वेळी त्या विषयावर लेख लिहिते किंवा व्हिडिओ-ऑडिओ तयार करते. त्यामुळे कमी वेळात लेख तयार होतो. ट्विटरवरील टॉप 10 हॅशटॅग पाहिले तर त्यातील सात ते आठ हे एखाद्या राजकीय पक्षाने किंवा ऍड कंपनीने चालविले कॅम्पेन असते. त्यामुळे राजकीय विश्‍लेषण असो, की हलका फुलका विनोद त्यातून बहुतांश वेळा कुठल्या तरी एका विचारधारेचा प्रसारच केलेले दिसतो.

आपला वापर होऊ देऊ नका 
विशिष्ट विचारसरणीचे लोक आपले विचार लादण्यासाठी सोशल मीडियातून अफवा पसरवितात. त्यातून कधी निष्पाप मोहम्मद अखलाकचा जीव जातो तर कुणाची बदनामी होते. काही उत्पादक तर आपल्या प्रतिस्पर्धींना मात देण्यासाठी या एका कंपनीच्या शीतपेयात एचआयव्हीचे विषाणू आहेत तर पिठात प्लॅस्टिक आहे असेही मेसेज ऑडिओ, व्हिडिओ व टेक्‍समधून व्हायरल करतात. बऱ्याच वेळा त्याला टीव्ही, प्रिंट मीडियाही बळी पडतो. सोशल मीडियावरील अफवेला खरे मानून नोटाबंदीतच्या काळात दोन हजाराच्या नोटेत चीफ असल्याची बातमी सगळ्या टीव्ही चॅनल आणि वतर्मानपत्रांनी दिली होती. काही वाहिन्यांवर तर या विषयावर तास-तास भर चर्चाही झाली होती. एकूणच काय तर फुटतात मिळणाऱ्या मेसजचे सर्व घोस्ट रायटर हे एकाच विचारसरणीने प्रेरित झालेले असतात. त्यांची मते व्हायरल करण्यास आपणही कळत-नकळत हातभार लावतो. पण त्यातून समाजविघातक विचारांना बळ तर मिळत नाही ना याचा विचार कुठलीही पोस्ट फॉरवर्ड किंवा शेअर करताना करणे आवश्‍यक आहे.

                                                                                        - विकास वि. देशमुख 
                                                                                          करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.
                                                                                         Vikas V. Deshmukh
                                                                                          Karda, Tq Risod,, Dist Washim