शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

बालक पालक आणि सेक्स

सकाळची वेळ. आई घर काम करण्यात व्यस्त. बाबा अंघोळ करून पेपर वाचत होते. दादा गच्चीवर सूर्यनमस्कार काढत होता. एवढ्यात तिसरीत असलेला चिंटू धावत आला नि आईचा पदर ओढत म्हणाला, ‘‘आईऽऽऽ आईऽऽऽ आपल्या शेजारची पिंकी मुलगी अन् मी मुलगा असं कसं? कसं ठरवायचं हा मुलगा अन् ही मुलगीच म्हणून...'' या प्रश्नामुळे आई थोडी गोंधळली अन् चिडलेल्या स्वरात म्हणाली, ‘‘ जा तुझ्या बाबाला विचार! नस्ते प्रश्न करत राहतोस!!'' हिरमुसला होऊन चिंटू हॉलमध्ये आला. इकडे आई-मुलाचा संवाद बाबाच्या कानावर पडलाच होता. बाबा त्याला जवळ घेत म्हणाले, ‘‘अरे वेड्या पिंकी कपडे कसे घालते?''
चिंटू : ‘‘ती फ्रॉक घालते.''
बाबा : ‘‘अन् तू?''
चिंटू : ‘‘मी चड्डी अन् शर्ट घालतो''
बाबा : ‘‘म्हणूनच पिंकी मुलगी आहे अन् तू मुलगा! काय समजलं का? जा आता खेळ बाहेर जाऊन'' असं म्हणत बाबांनी आपल्या चष्म्यातून चिंटूकडे कटाक्ष टाकत पेपरमध्ये डोळे खुपसले; परंतु इकडे चिंटूच्या मनात असलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळण्याऐवजी बाबांनी दिलेल्या उत्तरामुळे त्याच्या मनात पुन्हा उपप्रश्न निर्माण झाला, ‘मी जर फ्रॉक घातला तर मीसुद्धा मुलगी होईल का?' त्याने त्याचीच जीभ चावली अन् मित्रकंपनीकडे धूम ठोकली.
असे आईबाबा आणि चिंटू जवळपास प्रत्येक घरातच असतात. 
चिंटूच्या मनात आला तसेच अनेक प्रश्न घराघरांतल्या चिंटू अन् पिंकीच्यासुद्धा मनात येतात; मात्र शास्त्रीय आणि खरे उत्तर देण्याचे बहुतांश पालक टाळातात. ‘नस्ते' प्रश्न म्हणत काहीतरीच उत्तरं देत वेळ मारून नेतात; पण यामुळे चिंटू अन् पिंकीची उत्सुकता कमी थोडीच होते? उलट त्यांना अजून प्रश्न पडतात. मग जमेल त्या मार्गाने, कधी मित्र-मित्रिणीशी चर्चा करून तर कधी टीव्ही, चित्रपट, पुस्तके यातून ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे मित्र-मैत्रिणीही त्यांच्याच वयाचे. त्यामुळे ते तरी कसे योग्य उत्तर देणार? स्वाभाविकच एका मनाची उत्सुकता दुस-या मनात प्रवेश करते नि या चिमुकल्यांकडून चुकीचे अर्थ लावले जातात. ओघानेच त्यांच्यापैकी काहींकडून चुकाही होतात. ते जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा अपराधीपणाची भावना त्यांच्या कोवळ्या मनाला कुरडते अन् उनाडक्या करणारे एकाएकी एकलकोंडे होतात. अभ्यासात मन लागत नाही. जर आईबाबांनी वा इतर कुणी जबाबदार व्यक्तींनी त्यांना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली तर त्यांच्या हातून चुका होणार नाहीत. या चुका टाळण्यासाठी ‘बालक-पालक' यांच्यात या विषयावर संवाद होणे गरजेचे आहे. खेदाची बाब म्हणजे आपल्याकडे तसे होत नाही. हीच कोंडी फोडण्याचे काम ‘बीपी (बालक-पालक)' या मराठी चित्रपटाने केले. 
लैंगिक शिक्षण कसे आवश्यक आहे हे हा चित्रपट पटवून देतोच; परंतु त्याही पेक्षा बालक-पालकांत संवाद किती महत्त्वाचा आहे, हे सांगतो. चित्रपटाची कथा अंबर हडप यांच्या ‘बीपी(बालक-पालक)' या नाटकावर आहे. पटकथा आणि संवाद त्यांचेच आहेत. ही कथा पौंगाडवस्थेतील भिन्न स्वभावधर्माच्या पाच मुलांभोवती गुंफलेली आहे. त्यामध्ये दोन मुली आहेत. ते सगळे संस्कारात वाढलेले, विचारांवर पालकांचाच प्रभाव असणारे आहेत. यापैकी डॉली, चिऊ, अव्या आणि त्यांचा आणखी मित्र एकाच चाळीत राहतात. एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकतात. स्वाभाविकच त्यांच्यात कमालीच सख्य असते. एक दिवस ते शाळेतून घरी येतात. सबंध चाळीत सुतकी वातावरण असते. चाळीतीलच मेघाताई ही चाळ सोडून ऑटोतून जाताना दिसते. ती का आणि कुठे जात आहे? असे प्रश्न या चौकडीच्या मनात येतात. नेमकं काय झालं हे त्यांना कुणीच सांगत नाही; मात्र ‘मेघानं शेण खाल्लं; असं एक ना एक दिवस होणारच होतं' हे चाळीतल्या बायकांचं बोलणं त्यांच्या कानावर पडतं. ‘शेणं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं आणि शेण काय खाण्याची वस्तू आहे का?' हा प्रश्न त्यांना पडतो. डिक्सनरीत ते त्याचा अर्थ शोधतात; पण व्यर्थ. मग त्यांच्यापैकीच असलेली भोळी चिऊ एक दिवस पूजा करीत असलेल्या आईला विचारते, ‘‘आई गोमुत्र प्याल्याने काय होतं?'' आई म्हणते : ‘‘ ते शरिरासाठी चांगलं असतं, आजार होत नाहीत'' चिऊ पुन्हा विचारते : ‘‘मग शेण खाल्यानं काय होतं?'' त्यावर आई भयंकर चिडते आणि आरतीची टाळी तिच्या श्रीमुखात भडकावते. दुसरीकडे अव्या त्याच्या नाट्यदिग्दर्शक असलेल्या बाबाला म्हणतो ‘‘बाबा तुम्ही कधी शेण खाल्लं का?'' त्याचेही चिऊ प्रमाणेच होते. बाहेर फुटणाèया फटाक्यांचा आवाज याच्या कानाखाली येतो. पुढे ही चौकडी एकत्र बसते आणि ‘शेण खाणे' याचा नेमका अर्थ कसा शोधायचा याचा विचार करते. त्यावर त्यांना त्यांच्या शाळेतील विष्णू हा टपोरी मुलगा आठवतो आणि ते त्याच्याकडे जातात. इथून कथेला रंगत येते. विष्णू एखाद्या शिक्षकाप्रमाणे त्याला जे माहित आहे ते सांगतो. या चौघांना पिवळी पुस्तकं वाचायला देतो; परंतु या पुस्तकात जे लिहिलंय ते खरं आहे का? असा प्रश्न पुन्हा त्यांना पडतो. त्याचे उत्तर शोधण्यासाठी ते रात्री चाळीतल्या खिडक्यातून डोकावतात; मात्र नशिबी निराशाच येते; पण स्वस्थ बसू देईल ती उत्सुकता कसली? विष्णूच सांगतो की, आपण ‘ब्ल्यू फिल्म (बीपी)' पाहायची. एक दिवस ते भाड्याने व्हिसीआर आणि व्हिडिओ कॅसेट आणून सामूहिक बीपी पाहातात. पुढे त्यांच्यातील कोवळ्या मुलांत पुरुषत्व जागं होतं. त्यातीलच एक चिऊकडे प्रेयसी म्हणून पाहू लागतो तर अव्या त्याच्या पेक्षा मोठ्या असलेला नेहाताईला चक्क ‘आय लव यू' म्हणतो. हे मुलींना आवडत नाही. त्यांचं मैत्रीची नातं दुभंगू लागतं. खेळणं तर ते हरवूनच बसतात. चाळीतील ज्येष्ठ नागरिक असलेले कदम काका (किशोर कदम) यांच्या हे सगळं लक्षात येतं. ते सगळ्यांना नेहाताईच्या मदतीने एकत्र आणतात आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची, शरिराच्या बदलाची माहिती देतात.
यातील कथा दोन पिढ्यांची आहे. पहिली पिढी ८० च्या दशकातील तर दुसरी आताच्या. दोघांमध्ये २५ ते ३० वर्षांच अंतर आहे; पण त्यांना पडणारी प्रश्न, त्यावर पालकांनी दिलेली उडावा-उडवीची उत्तरं qकवा पोरगा कोनावर जातोय म्हणून बाबांनी आडव्या हाताने कानपट्टीचे घेतलेले माप, त्यानंतर मुलांनी पिवळी पुस्तक, कॅसेट, सीडी, मित्र यांच्यामार्फत स्वतः शोधलेली उत्तर हे दोन्ही पिढ्यात सारखंच आहे. मुलांनी वाममार्गाने जाऊ नये, यासाठी या विषयावर ‘बालक आणि पालकङ्क यांचा संवाद कसा आवश्यक आहे हा संदेश हा चित्रपट देतो. हा अत्यंत नाजूक विषय हळुवारपणे आणि अश्लिलतेचा कुठलाच स्पर्श होऊ न देता हातळण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आला आहे. 
‘काय मस्त अ‍ॅटम आहे'  ‘तो आपला माल है' असे नेहमीच्या बोलण्यातील संवाद पात्रांच्या तोंडी आहेत. त्यामुळे चित्रपट पाहाताना यात पालक आपले बालपण शोधतो नि म्हणतो, ‘आयला आम्ही बी असंच करत व्हत्तू की...'अन् बालक प्रेक्षक म्हणतात ‘सॉलिड आमचंही असंच आहे' त्यामुळेच हा चित्रपट बालक आणि पालक या दोघांसाठी आवश्यक आहे. सध्या समाजाला चूक काय आहे हे सांगणा-या पालकाची नव्हे तर काय बरोबर आहे हे सांगणाèया पालक रुपातील मित्राची गरज आहे, हा अत्यंत वास्तववादी आणि मार्मिक विचार यातून दिला आहे. चित्रपटाची निर्मिती ख्यातकीर्त अभिनेता रितेश देशमुख, उत्तुंग हितेंद्र ठाकूर आणि मेघना जाधव यांची आहे. दिग्दर्शन रवि जाधव यांनी केले आहे. विशाल-शेखर आणि चिनार-महेश यांचं संगीत आहे. हल्लीच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा काहीच मिनिटांचा पडद्यावरील वावर सुखावून जातो अन् अभ्यंकर यांनी शेवटी भूमिका एका ‘माईल स्टोनङ्क अशा चित्रपटात केली या विचारानं मन भरून येतं. किशोर कदम यांनी साकारलेला ‘काका' सगळ्याच पालकांना विचार अन् जबाबदारीची जाणीव देतो. कथेत हलक्या-फुलक्या विनोदांची पेरणी केली आहे. त्यामुळे चित्रपट आणखीच मनाला भिडतो. सगळ्याच कलाकारांनी ताकदीचा आणि नैसर्गिक अभिनय केला आहे. जो विषय समाजात बोलण्यास कुणी पुढाकार घेत नाही तो पहिल्यांदाच मराठीतून पडद्यावर दाखविण्याचं धाडस निर्मात्यांनी केलं आहे. त्यांमुळं त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. हा चित्रपट जरी लैंगिक शिक्षणावर आधारित असला तरी यात अश्लिलता कुठेच नाही. सहकुटुंब पाहता येईल आणि पाहावाच असा हा चित्रपट आहे. असे असताना किती पालक हा चित्रपट आपल्या बालकांसोबत पाहतील? पालकांनी चित्रपट पाहिल्यानंतर ते मुलांना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देतील का, की केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट पाहायला येतील आणि घरी गेल्यानंतर विसरून जातील, असे एक ना अनेक प्रश्न सुज्ञ प्रेक्षकांना पडले नाही तर नवलच. 
-  विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम.

९८५०६०२२७५
०००००

Vikas Deshmukh
Karda, Risod, Washim

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा