बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

साहित्य क्षेत्रातील ‘एकलव्य’च !

गाव -खेड्यात कसदार लिखाण करणारे अनेकजण आहेत, पण योग्य मार्गदर्शन, व्यासपीठाचा अभाव यामुळे त्यांचे साहित्य समाजासमोर येतच नाही. स्वाभाविकच फुलण्याआधीच त्यांच्यातला साहित्यिक कोमेजून जातो. हे टाळण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील रिसोड या आडवळणाच्या गावात चाफेश्वर गांगवे या केवळ
साहित्यासाठी जगणाºया युवकाने जून 2000 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी साहित्य चळवळ उभी केली.
रिसोडच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय पहिल्या साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष होते कवी कैलास भाले या चळवळीचे सदस्यसुद्धा चाफेश्वरप्रमाणेच काव्यवेडे,
साहित्य रसिक, कुणाचेही मार्गदर्शन नसलेले, ध्येयासक्त. या सगळ्यांनी मिळून आपल्या संघाला ‘एकलव्य’ हे दिले. आपल्यासारख्या समवयस्क साहित्यिकांचे कौतुक व्हावे, त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूने सलग पाच वर्षे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा घेतली. त्यासाठी ‘एकलव्य’ला अश्व प्रकाशनाचे संचालक राजा वाठोरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या स्पर्धेला महाराष्टÑभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतून पहिल्या येणाºया तीन कवींच्या कवितेला ‘एकलव्य राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. त्यासाठी रिसोड येथेच दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेण्यास सुरुवात केली. एकलव्यच्या पहिल्या
संमेलनाचे अध्यक्ष जालना येथील कवी कैलास भाले होते. अकोल्याचे साहित्यिक सुरेश पाचकवडे हे दुसºया
संमेलनाचे अध्यक्ष होते. पुढे भगवान ठग, शेषराव पिराजी धांडे, रा. मु. पगार यांसारख्या दिग्गजांना एकलव्यच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान
मिळाला. 
यंदा पुन्हा एकलव्यला उभारी देणारी
दरम्यान, दोन प्रातिनिधिक काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित केले. हे करत असताना मुख्य अडचण होती ती आर्थिक. मात्र, शिवाजी शिक्षण संस्थेने प्रत्येक साहित्य संमेलनासाठी आपले सभागृह मोफत उपलब्ध करून दिले. शिवाय संमेलनाला लाभलेल्या स्वागताध्यक्षांनीही आर्थिक मदत केली. मागील दोन वर्षांपासून रिसोडमध्ये एकलव्यचे साहित्य संमेलन झाले नाही, परंतु या वर्षी पुन्हा नव्या जोमाने एकलव्यला उभारी देण्याचे या संघाच्या सदस्यांनी ठरवले आहे. येत्या काही महिन्यांतच आठवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवण्याचेही नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. एकलव्यच्या जडणघडणीत विष्णू जोशी, ग. ना. कांबळे,
प्रमोद तुरेराव, केशव गरकळ, दत्ता शेळके, सतीश अवचार, वसंता जुमडे, प्रकाश धांडे, विठ्ठल सरनाईक यांचेही योगदान आहे. 
एकलव्यमधून ख्यातकीर्त झालेले नवोदित
एकलव्यला नवोदित आणि प्रस्थापित हा भेदच मान्य नसल्याचे या संघातील प्रत्येक सदस्य सांगतो. साहित्य लिहिण्यासाठी लिखाणाचा अनुभव नव्हे तर प्रखर सामाजिक जाणीव हवी असते हेच एकलव्य साहित्य संघाचे सूत्र आहे. आपल्या पहिल्याच काव्यसंग्रहाने नामदेव ढसाळ, नारायण कुळकर्णी कवठेकर हे कवी महाराष्टÑाचे लोकप्रिय साहित्यिक झालेत, हे जाणकारांना माहीत आहे. कवी अनिल कांबळे यांचा ‘झोपडी
नंबर बारा’ हा कवितासंग्रह येण्यापूर्वीच नियतकालिकांच्या माध्यमातून ख्यातकीर्त कवी म्हणून त्यांची ओळख झाली, अशी उदाहरणे एकलव्यचे सदस्य आवर्जून सांगतात. म्हणून त्यांना कुणी नवोदित साहित्यिक म्हटलेले आवडत नाही. या चळवळीमुळे केवळ रिसोड परिसरातच नव्हे तर वाशीम जिल्ह्यातील साहित्य चळवळीला गती आली. साहित्य क्षेत्रात एकलव्यचे योगदान मोठेच आहे.
- विकास देशमुख, वाशीम
Vikas Deshmukh, Karda, Risod, Washim

आदिम झाले आता ई-आदिम

रानटी अवस्था संपली. माणूस व्यक्त व्हायला लागला. उत्तरोत्तर प्रगत झाला. हा आदिम इतिहास आपल्याला माहिती आहे तो चित्र, शिल्प आणि साहित्य या आपल्या ‘आदिम’ कलेमुळेच. हाच धागा पकडून जागतिक कीर्तीचे ख्यातकीर्त चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी अहमदनगर येथून वर्ष 1979 मध्ये ‘आदिम’ हे नियतकालिक सुरू केले होते. चित्र, काव्य, कथा आणि ललित यांचे मिश्रण आदिममध्ये होते. त्यामुळेच ‘आदिम’ मराठी साहित्यात माइल स्टोन ठरले. ऐंशीच्या दशकातील साहित्याला ऊर्जित करून 1982 मध्ये आदिम बंद झाले. मधल्या 30-35 वर्षांत माध्यमांत बदल झाला, पण आदिम कला आहेत त्याच आहेत. याच कला येणार्‍या कैक पिढ्यांसाठी संदर्भ ठराव्यात आणि सकस, अभिजात साहित्य लिहिणार्‍यांना प्रेरणा मिळावी, या उद्दात्त हेतूने मराठीतील सिद्धहस्त गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी अकोला येथून जानेवारी 2014 पासून ‘ई-आदिम’ सुरू केले. या ई आदिमचे स्वरूप पूर्वी होते तसेच आहे. फक्त कागदांच्या जागी संगणकाची स्क्रीन आहे. त्यासाठी राऊत यांनी अथक परिश्रम घेऊन आकर्षक ब्लॉग तयार केला. अल्पावधीत त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता डॉ. राऊत त्याचे कार्यकारी संपादक आहेत. राजन खान यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

‘आदिम’चा इतिहास

चित्रकार अंभोरे यांनी 1979 मध्ये ‘आदिम’ची सुरुवात केली. त्यावेळी ते आदिमचे कार्यकारी संपादक होते. सदशिव अमरापूरकर, प्रा. वसंत दीक्षित, चंद्रकांत पालवे आणि प्रा. वि.रा. दीक्षित यांचा संपादकीय मंडळांत समावेश होता. प्रसिद्ध कादंबरीकार भालचंद्र नेमाडे हे आदिमचे पहिले वर्गणीदार. पुढे अमरापूरकर यांनी नाट्यक्षेत्रातील अनेकांना आदिमचे वर्गणीदार करून घेतले. 1979-82 या काळात आदिमचे एकूण 33 अंक निघाले. त्यामध्ये तीन दिवाळी अंकांचाही समावेश आहे. अंभोरे हे त्या काळात -चक्रमद्रांकित (सायक्लोस्टाइल) : स्वरुपात आदिम काढायचे. पूर्ण अंक पेन्सिलवर हाताने लिहून अंक काढावा लागे. हे काम प्रचंड मेहनतीचे होते. ऑफिसमध्ये कागदांना टॅग बांधण्याकरिता छिद्र पाडण्यासाठी टोच्या असतो. त्या टोच्याचा उपयोग करून अंभोरे पेन्सिलवर लिहित आणि रेखाचित्रही काढत. असे काही अंक काढल्यानंतर खिळे जुळवून मॅटर कंपोज करणार्‍या मशीनवर छापील अंक काढायला सुरुवात केली.

आता ‘ई- आदिम’
पुढे काही अंकानंतर जे अनेक अनियतकालिकांचं होतं तेच आदिमचंही झालं आणि ते बंद पडलं. आता पुन्हा एकदा ‘फेसबुक’ आणि ब्लॉगच्या माध्यमातून ‘आदिम’ सुरू करू म्हणून गझलकार डॉ. राऊत हे अंभोरे यांच्याशी बोलले. त्यांनाही ही कल्पना आवडली. गेल्या सहा वर्षांपासून राऊत हे ‘गझलकार’ या ब्लॉगचा सीमोल्लंघन ई-विशेषांक प्रकाशित करतात. अंभोरे यांच्या भाषेत म्हणजे त्यासाठी लागणारा ‘कुटाणा’ करतात. आता राऊत हा कुटाणा आदिमसाठी करीत आहेत.

असे आहे ‘ई- आदिम’चे स्वरूप
http://eaadim.blogspot.in/ या लिंकवर ई-आदिम उपलब्ध आहे. कथा, कविता, पुस्तक परीक्षण आणि रेखाचित्र, रसग्रहणे, आपण टिपलेली आगळी-वेगळी छायाचित्रे यांचा यामध्ये समावेश आहे. सकस लिहिणार्‍या साहित्यांनी आपले साहित्य याद्वारे प्रकाशित केले जाणार आहे. सुरुवातीला ई आदिम हे द्वैमासिक स्वरुपात असणार. जाने-फेब्रुवारी, मार्च-एप्रिल, मे-जून, जुलै-ऑगस्ट आणि सप्टेंबर-ऑक्टोबर, नोव्हेंबर-डिसेंबर असे त्याचे अंक निघणार आहेत. यामध्येच दिवाळी अंकाचाही समावेश राहणार आहे. आदिमचे फेसबुक पेजसुद्धा आहे.

असे पाठवा आपले साहित्य
आदिमला लिहू इच्छिणार्‍यांनी त्यांचे साहित्य युनिकोड फाँटमध्ये पाठवावे. ज्यांच्याकडे युनिकोड फाँट नाही त्यांनी श्रीलिपी, कृतीदेव, एपीएस प्रकाश, आएसएम-डीव्हीबी यापैकी कुठल्याही एका फाँटमध्ये वर्ड फाइलने साहित्य पाठवता येते. त्यासाठी साहित्यिकांनी ‘aadimambhore@gmail.com’ किंवा आदिमचे फेसबुक पेज किंवा श्रीकृष्ण राऊत यांच्या फेसबुक पेजवरील मेसेजबॉक्समध्येसुद्धा साहित्य पाठवता येऊ शकते, पण फेसबुकवर मॅसेज करताना मजकूर कोणत्या फाँटमध्ये आहे याचा अगोदर इंग्रजीतून उल्लेख करणे आवश्यक आहे.
( दिव्य मराठी- 12 फेब्रु.14-अक्षरा )

-विकास वि. देशमुख, वाशीम
Vikas Deshmukh, Karda, Risod, Washim