सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

ग्रामसभा नव्हे जादूची कांडी


हाराष्ट्राच्या टोकाला असलेला गडचिरोली जिल्हा. या जिल्ह्यातील आदिवासी बहूल असलेलं लेखामेंढा गाव. गावाच्या भोवती बांबूचं घनदाट जंगल. गावात पोहोचायला धड रस्ताही नाही. जेमतेम प्राथमिक शिक्षणच घेता येईल, अशी जिल्हा परिषदेची एकमेव शाळा; पण नक्षलवाद्यांच्या भीतीनं या शाळेत कुणी शिक्षक येत  नव्हता. आला तर टिकत नव्हता.  परिणामी, येथे शिक्षणाच्या नावानं कायम बोंब होती. बाहेर जावून ज्यांनी शिक्षण घेतलं ते बोटावर बोजण्याएवढेच; मात्र त्यांच्यापैकीही काहींनी आपलं बस्तान शहरात मांडलं.  वीज नाही, पाण्याचा अभाव. नक्षलवाद्यांमुळे शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. अशातच निसर्गाची अपकृपा कायम होती. पाऊसही दगाबाज. कधी धो-धो पडून सगळं पीक वाहून नेत होता तर कधी न पडून पिकाला करपून टाकत होता. चुकून त्याची कृपा झाली अन् भरभरून पीक आलं तर जंगली जनावर त्यावर पडशा पाडायची. एकूणच या गावातील ग्रामस्थांच्या भोवती कायम संकटं सकटंच होती. नाही म्हणायला गावात ग्रामपंचायत होती; परंतु नक्षवाद्यांच्या भीतीनं कुणी सरपंच व्हायला तयार नसे. झाला तरी त्याला अन् सदस्यांनाही आपल्या हक्काबाबत काही माहीत नसे; पण अलीकडच्या काळात सरकारनं काही निर्णय घेतले, तेराव्या वित्त आयोगातून गावांना काही अधिकार मिळाले. त्यामुळं या गावानेही  मरगळ झटकली. आत्तापर्यंत त्यांना वनविभाग सांगत  होता. गावाच्या भोवती असलेल्या जंगलातील बांबूवर आमचा अधिकार आहे. आम्हीच त्याचं उत्पन्न घेणार. ते तसं करीतसुद्धा होतं. एव्हाणा गावालाग्रामसभेचे अधिकार कळले होते. ग्रामस्थांनी ठराव घेतला नि शासनाला ठणकावून सांगितलं, जंगल आम्ही जगवलं, वाढवलं, उत्पन्नही आम्हीच घेणार. सुरुवातील वनविभागानं याला विरोध केला. गावानं याविरुद्ध संघर्ष केला. शासन नमलं. ग्रामसभेनं बांबू वाहतुकीचा परवाना मिळवला. आत्ता जंगलातील बांबूचा नफा ग्रामस्थ सामूहिकरीत्या वाटून घेतात. त्यातून त्यांची गरिबी दूर झालीच; परंतु त्यातील काही रक्कम गावाच्या विकासासाठी वापरली जाते. या गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळं त्यांना कळलेल्या ग्रामसभेच्या महत्त्वमुळं दारिद्य्रात खितपत पडलेल्या या ग्रामस्थांचे आयुष्यच बदलंलं. हे गाव महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे; परंतु या गावाप्रमाणेही अनेक गावं महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यापर्यंत माध्यमं पोहोचली नसल्यानं ती समोर आलीच नाहीत.  ना वीज ना पाणी. ..ना रस्ता ना शिक्षण...ना आरोग्य सेवा ना दवाखाना... अशा परिस्थितीत  या गावातील शहाण्या व्यक्तींनी पुढे येत बाबा आमटे, प्रकाश आमटे, अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्याप्रमाणेच आपल्या गाव विकासाला गती दिली.
शेरपे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील गाव. या गावाच्या परिसरातील qसचनाचे क्षेत्र वाढावं म्हणून शासनानं गावातील नदीची पाहणी करून नदीवर धरण बांधण्याची योजना आखली. यात अनेक ग्रामस्थांना भूमिहीन व्हावं लागणार होतं. त्यामुळं धरण न बांधण्याचा ग्रामसभेनं निर्णय घेतला. शासनाला सवाल केला, धरणामुळे जेवढं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तेवढी जमीन तर आत्ताच उत्तमरीत्या पिकते. मग या धरणाचा फायदा काय? त्याऐवजी दुस-या ठिकाणी धरण बांधा. त्यासाठी ग्रामस्थांनी दुसरी जागा दाखविलीसुद्धा. गावानं ग्रामसभेत तसा ठरावही केला. इथंही सरकारनं त्यांना विरोध केला. ग्रामस्थांनी आंदोलन केलं. सरकारच्या तज्ज्ञांना पटवून दिलं की, या ठिकाणी धरण बांधणं कसं चुकीचं आहे. सरकार ग्रामसभेपुढे नमलं. आता दुस-या ठिकाणी धरणाचं काम सुरू आहे. परिणामी, या गावातील अनेक कुटुंब भूमिहीन होण्यापासून वाचले आहेत. बचत गट, तंटामुक्ती या माध्यमातून गाव विकासाला गती दिली जात आहे.
जैन्याळ (ता. कागल, जि. कोल्हापूर) हे छोटंस गाव. महात्मा गांधीजींच्या जयंती पर्वावर गावात ग्रामसभा भरली. निर्मल ग्राम अभियान राबविण्याचं एकमतानं ठरलं; पण गावातील काही स्वाभिमानी महिलांनी आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या, स्वच्छता करायची ती महिलांनी; मात्र नाव होणार ते पुरुषांचं. हे चालणार नाही. महिलांच्या बरोबरीनं पुरुषांनीही झाडू मारायला हवा. शिवाय पत्नी ही पतीच्या बरोबरीनं कुटुंबासाठी झटते. त्यामुळं शासनाच्या नियमाप्रमाणे घरावर पती-पत्नी दोघांचंही नाव असावं. महिलांचे हे दोन्ही मुद्दे पुरुष मंडळींना पटले. ग्रामसभेत निर्णय झाला. महिलांच्या बरोबरीनं पुरुषही स्वच्छतेची सारी कामं करीत आहेत. घरावरही पती-पत्नी असे दोघांचीही नावं आहेत.  एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ६८ गावं अशी आहेत, जिथलं प्रत्येक घर महिलेच्या मालकीचं आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही हा कित्ता आता गिरवला जातोय.
असंच कोल्हापूर जिल्ह्यातील देवरडे हे टुमदार गाव. गावाच्या परिसरात भरपूर गायरान जमीन. या जमिनीत मोठ्या प्रमाणात निलगिरीची झाडं. या झाडांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांना भरपूर प्रमाणात पाणी लागतं. ही झाडं जमिनीतील, परिसरातील जलसाठ्यातील पाणी प्रचंड प्रमाणात शोषून घेतात. परिणामी, या गावाच्या जंगलातील तलाव, जलसाठे लवकर आटून जात होते. पाण्याच्या शोधात जंगातील प्राणी गावात येत असतं. त्यात जंगली हत्तीसुद्धा असतं. त्यामुळे गावाला धोका निर्माण झाला. यावर उपाय करण्यासाठी ग्रामसभा बसली. गावानं ठाराव पारित केला. त्यानुसार जंगालात आणि मोठ्या प्रमाणात नीलगिरी असलेल्या ठिकाणी आंबे आणि काजूची लावगड केली. पाणी आटण्याचा प्रश्न मिटला. जंगली प्राणीसुद्धा गावात येईनासे झाले. शिवाय  काजू आणि आंब्याच्या झाडांपासून दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत आहे. ते गाव विकासासाठी वापरून उर्वरित रक्कम समप्रमाणात गावकरी वाटून घेत आहेत. या गावालासुद्धा वनविभागानं विरोध केला; पण येथील ग्रामस्थांनीसुद्धा त्यांना ठणकावून सांगितलं. गाव आमचं आहे. झाडंही आम्ही लावली. नफासुद्धा आम्हीच घेणार. आज या गावातील समस्या तर मिटली. शिवाय उत्पन्नाचं साधनही ग्रामस्थांना मिळालं. ते केवळ ग्रामसभा आणि गावाच्या एकजुटीमुळेच. स्वाभाविकच गाव विकासासाठी ग्रामसभा ही जादूची कांडीच असल्याचे सिद्ध झाले आहे.

- विकास देशमुख
मोबा. ९८५०६०२२७५
००००००

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

श्रमिकांचा क्षीण आवाज


संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील कामगार संघटनांनी बुधवार आणि गुरुवारी देशव्यापी संप पुकारला आहे. सरकारी कर्मचा-यांचा संप रद्द करण्यासाठी सरकार आणि ट्रेड यूनियन्समधील चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यानंतर यूनियनचे अध्यक्ष जी. संजीव रेड्डी यांनी नियोजित संप २० आणि २१ फेबु्रवारी २०१३ रोजी सुरू राहणारच, अशी घोषणा केली. त्यामुळे देशभरातील जनजीवनावर  या संपाचा परिणाम होणार आहे. बँक कर्मचारी, वाहतूक संघटनाही या संपात सहभागी असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडणार आहे. त्या अनुषंगाने...


मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

अभंग


ग दाटून आले होते. तो एकटाच गच्चीवर बसला होता. स्वतःच स्वतःच्या तंद्रीत. कितीतरी वेळापासून. एवढ्यात मोबाईल वाजला. नंबर अनोळखी. कुणाचा कॉल असावा, असे प्रश्नार्थक भाव त्याच्या चेह-यावर आले. त्याने कॉल घेतला. पलिकडून थोडासा कातर पण गोड आवाज आला. ‘‘कसा आहेस?'' क्षणभर तो गोंधळून गेला. कोण आहे ही? अन् एवढ्या जिव्हाळ्याने का विचारतेय? एका क्षणात सारे सारे प्रश्नच प्रश्न. वेगानं तो फ्लॅशबॅमध्ये गेला. अचानक त्याला क्लिक झालं. अन् तोही ओल्या आवाजात म्हणाला, ‘‘तू सोडून गेली तेव्हा होतो तसाच!'' क्षणभर दोघंही निशब्द झाले. कुणीच बोललं नाही. दोन वर्षांनंतर हो दोनच वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांचं बोलणं होत होतं. कोण आनंद झाला त्याला. तीच पुन्हा बोलती झाली. ‘‘ मला वाटलं होतं तू नंबर बदलला असशील''. तो - ‘‘कसा बदलणार? बदलला असता तर माझा नवीन नंबर तुला कोण देणार होतं?''ती - हूँऽतो- ‘‘मला खात्री होतीच की तू कधी ना कधी कॉल करशील. तुझ्यासाठीच हा नंबर सुरू ठेवलाय मी.'' दोघांनाही हे अजिबात अनपेक्षित नव्हतं. ती म्हणाली, ‘‘मला तुझी खूप आठवण येतेय; पण काय करणार? आता भेटणं शक्य नाही.''तो - ‘‘हूँऽ कशी आहेस? नवीन काही''ती - जगतेय चार भिंतीच्या जगातच. अस्तित्व हरवून. तो- ....ती - ''मला मुलगा झालाय. काय नाव ठेऊ?''त्याचा आवाज अजून खोल गेला. तो म्हणाला, ‘अभंग' ठेव. एवढ्यात कुणाचा तरी आवाज आला, ‘‘अगं बाळ रडतंय. त्याला पाजायचं सोडून तिकडच्या खोलीत का करतेस?'' घाईघाईत तिने कॉल कट केला. तो मात्र विचारात गडून गेला. ‘अभंग' स्मृतींना उजाळा देत... आता आभाळ अधिकच आंधारलं होतं. क्षणात धो-धो कोसळेल असं.

- विकास वि. देशमुख 

करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.

Vikas V. Deshmukh
Karda, Risod, washim.

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

कुस्ती व्हेंटिलेटरवर

हिल्या ऑलिम्पिक (१८९६) स्पर्धेपासून एक प्रमुख क्रीडाप्रकार म्हणून ओळखल्या गेलेल्या कुस्ती खेळाला २०२० च्या ऑलिम्पिकमधून बाहेर करण्याचा धक्कादायक निर्णय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने (आयओसी) घेतला आणि विश्वभरातून या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजीचे सूर उमटले. १८० देशांत हा खेळ खेळला जातो. या देशांतून आता आव्हान-प्रतिआव्हानाचे शड्डू ठोकले जाणार नाहीत. बलवान कुस्तीपटू होण्यासाठी खेळाडूंना अपार मेहनत घ्यावी लागते. त्यांचा आहार आणि खुराक भक्कम स्वरूपाचा असतो. त्यांच्यासाठी हा निर्णय पाठीत खंजीर खुपसण्यासारखा होता. अलिकडे तर काही महिला कुस्तीपटूही या खेळात प्रावीण्य मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी किमान आठ वर्षे तयारी करावी लागते; परंतु आयओसीने एका फटक्यात तयारीचा किल्ला उद्ध्वस्त केला आहे. कुस्ती हा मर्दानगीचा खेळ आहे. शारीरिक बल आणि रग याच्या जोडीला त्याच्याकडे चपळाईही असली पाहिजे. भारतात हा खेळ शतकानुशतके खेळला जातो. त्याला ‘लाईक’ करणा-यांचा तोटा नाही. मातीतून घडणारे बलप्रदर्शन आज मातीमोल ठरण्याची वेळ आली आहे. पूर्वी गावागावांतून हा खेळ खेळला जायचा. भल्या पहाटेपासून तालमी-तालमीतून किंवा आखाड्यांतून शड्डू ठोकल्याचे आवाज घुमायचे. आशियाई कुस्तीपटूंचे या खेळातील कौशल्य यूरोपीय देशांना खुपत असावे म्हणूनच त्यांनी या खेळाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू केला आहे. प्रथम त्यांनी मातीतील कुस्ती मॅटवर आणली. विविध डावांऐवजी ‘पॉर्इंटस्’ ला अधिक महत्त्व दिले. आशियाई कुस्तीपटूंना मॅटशी जुळवून घेण्यास प्रथम अवघड गेले. परंतु नंतर त्यावरही वर्चस्व संपादन केले. भारतीय मल्लांनी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई, जागतिक स्पर्धांवर आपली मोहर उठवली. १९५२ मध्ये भारताच्या खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिले कांस्यपदक मिळवले. त्यानंतर सुशीलकुमारने बीजिंगमध्ये (२००८) कांस्य तर लंडनमध्ये (२०१२) रौप्य पदकाची कमाई केली. लंडनमध्येच (२०१२) योगेश्वर दत्तने कांस्य मिळवले. ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश विविध देशांतील खेळाडूंनी जात, धर्म, वर्णभेद बाजूला ठेवून आपले कौशल्य दाखवावे हा आहे. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतके संघटक आर्थिक सत्तेच्या जोरावर हुकूमशाही गाजवू पाहात असतील तर त्याला कसून विरोध केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती फ्री-स्टाईल आणि ग्रीको-रोमन पद्धतीने खेळवली जाते. लंडन ऑलिम्पिकमध्ये ११ फ्री-स्टाईल आणि ७ ग्रीको-रोमनची पदके ठेवण्यात आली होती आणि ते मिळवण्यासाठी एकूण ३४४ मल्ल झुंजले होते. म्हणजेच या स्पर्धेला स्पर्धकांचा तोटा नाही अन् प्रेक्षकांचाही नाही. तरीही कुस्तीला ‘घुटना’ मारण्याचा प्रयत्न कशासाठी? ऑलिम्पिकमधून एखादा क्रीडाप्रकार हटवायचा झाल्यास आयओसी टेलीव्हिजन रेटिंग, तिकिटविक्री, डोप टेस्ट समितीची शिफारस, खेळाची लोकप्रियता आदी ३६ हून अधिक निकषांचा आधार घेते. एखादा खेळ वगळताना त्या खेळात ‘डोपिंग’ ची प्रकरणे किती झाली तेही पाहिले जाते. कुस्तीला ‘डोपिंग’ च्या निकषाचा आधार लावला गेला असेल तर त्याच्या तुलनेत वेटलिफ्टिंग व सायकलिंगमध्ये ही प्रकरणे अधिक आहेत. मग या खेळांचे स्थान अबाधित कसे? कुस्तीपेक्षा अधिक धोकादायक असणा-या मॉडर्न पेन्टॅथलॉनला मानाचे पान कसे काय मिळते? कुस्तीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ११६ पदके रशियाने पटकावली आहेत. भारत या क्रीडा प्रकारात डोईजड होण्याची लक्षणे दिसू लागली की यूरोपीय देशांच्या पोटात दुखू लागते हा अनुभव जुनाच आहे. हॉकीमध्ये भारताची एकाधिकारशाही नष्ट करण्यासाठी हॉकीच्या नियमावलीतच आमूलाग्र बदल करण्यात आले. मैदानाच्या स्वरूपातही बदल करण्यात आला. असाच प्रकार आता कुस्तीमध्येही सुरू आहे. कुस्तीतील भारताची समृद्धशाली परंपरा नष्ट करण्यासाठी अत्यंत धूर्तपणे कट रचण्यात आला आहे. कुस्ती केवळ भारतातच लोकप्रिय आहे असे नाही. पाकिस्तान, तुर्कस्तान, जपान, मंगोलिया, इराण, रशिया या देशांतही तितकीच लोकप्रिय आहे. भारतात कुस्ती लोकप्रिय करण्यासाठी मारुती माने, श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, दीनानाथसिंह, मास्टर चंदगीराम, सतपाल, हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार यांनी जिवाचे रान केले होते. त्यांचे प्रयत्न वाया जाणार काय? सर्वसामान्यांची ही अस्वस्थता शक्य तितक्या लवकर दूर झाली पाहिजे. कुस्तीला आखाड्याबाहेर करण्याचा प्रयत्न करणा-यांनाच ‘धोबीपछाड’ मारला पाहिजे. मेमध्ये सेंट पीटस्बर्ग येथे होणा-या आयओसी कार्यकारिणीच्या बैठकीत कुस्तीचा पट काढला जाणार नाही यासाठी चिकाटी दाखवली पाहिजे. या बैठकीत बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, रोलर स्पोर्टस्, स्पोर्ट क्लायंबिंग, सक्वॅश, वेकबोर्डिंग, वुशू आदी खेळांसाठी सादरीकरण होणार आहे. त्यात कुस्तीला धक्का लागणार नाही यावरही चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी कुस्तीवर प्रेम करणा-या देशांनी दबावगट निर्माण केला पाहिजे. सध्या तरी कुस्ती व्हेंटिलेटरवर आहे. ती पुन्हा नैसर्गिक श्वासोच्छवास घेऊ शकेल अशी उपाययोजना करावी लागेल.

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

मोरांगी



सा तो अभ्यासात जेमतेमच. खूप अभ्यास केल्यानंतर कसातरी काठावर पास व्हायचा. त्याची बारावी झाली. आता यापुढे आपण जोमानं अभ्यास करू. चांगले माक्र्स् घेऊ असं ठरवूनच एक स्टोव, सतरंजी, उशी, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी आणि जुनी सायकल घेऊन तो बीएसाठी शहरात आला. पावसाळाही लागला होता. सारं कसं टवटवित. आल्हाददायक. नजर जाईल तिकडं हिरवंकंच्च दिसत होतं. गार-गार. कॉलेजच्या रस्त्यावर गुलमोहराची फुलं कुणी सडा टाकावा तशी पडलेली असायची. त्यामुळं याचंही मनही अधिकच प्रफुल्लीत झालं. कोवळ्या गवताप्रमाणे याच्या मनात अनेक स्वप्न अंकुरले. तो त्याचा कॉलेजचा पहिला दिवस होता. पाऊस धो-धो कोसळत होता. त्या दिवशी हा छत्री घेऊन पायीच कॉलेजला गेला. गेटवर त्याला ती दिसली. नाजूक सायकलच्या नाजूक पायडलवर नाजूक पाय फिरवत असलेली. तिनं शेवाळलेल्या रंगाचा रेनकोट घातला होता. तिच्या गालावरून पावसाचे ओथंबे ओघळत होते. कोण असावी बरं ही? आपल्याला बोलेल का? असा विचार करीत यानं वर्गाच्या पाय-या चढल्या. छत्री मिटवली नि आपल्या बाकड्यावर जाऊन बसला. इतर मुलं-मुलींपैकी ज्यांच्या पूर्वीच्या ओळखी होत्या त्यांचा चिवचिवाट सुरू झाला. तो त्या गावात नवीनच होता. त्यामुळं एका कोप-यात जावून बसला. त्याच्या मनात मात्र तीच रेंगाळत होती. अरेच्चा! ती पण त्याच वर्गात येऊन बसली की. मग काय, वर्ग खोलीच्या टिनावर पडणा-या टपोर थेंबाचा आवाज याच्या काळजात यायला लागला. आता याच्या मनात विचारानं अधिक गती पकडली. काय नाव असावं बरं हिचं, असा विचार तो करू लागला. एवढ्यात मॅडम आल्या. सगळे उठून उभे राहिले. पहिला दिवस असल्यानं केवळ परिचय करून घेऊ, हेच ते काय त्याला ऐकू आलं. बाकी सगळं लक्ष तिच्याकडंच तर होतं. तिचा नंबर आला. ती म्हणाली, ‘‘मी मोरांगी. मला चित्र काढायला आवडतात. इतिहास संशोधक व्हायचंय.'' हा मनातल्या मनात पुटपुटला, ‘मोरंगी. व्वा! काय सुंदर नाव आहे. अगदी मोराच्या अंगासारखंच'. तीसुद्धा खरोखरच मोरांगीच होतीच.
दिवसामागून दिवस जात होते. याचेही आता कॉलेजमध्ये मित्र झाले. कधी-कधी उगाचच काही तरी कारण काढून तो तिला बोलायचा; पण याच्यापेक्षा ती इतर मुलांनाच जास्त बोलयची. हीच त्याची व्यथा होती. आपली ही व्यथा तिची कथा बनेल का, असं याला सारखं वाटायचं. तिला नेहमीच कॉलेजमध्ये यायला उशीर व्हायचा आणि पहिला प्रिरिअड तिच्या आवडीच्या इतिहासाचाच असायचा. या प्रिरिअड च्या मॅडम नोट्स लिहून द्यायच्या; मात्र मोरंगीला उशीर झाल्यानं तिला लिहून घेता येत नव्हतं. हेच यानं हेरलं. तो नियमित नोट्स लिहून घ्यायला लागला. या प्रेडसाठी याच्याएवढं नियमित कुणी नाही हे मोरांगीच्याही लक्षात आलं. मग तिनंही याच्याशी सलगी वाढविली. ती रोज याची इतिहासाची वही घेऊन जाऊ लागली. यालाही तेच हवं होतं. आता ती आपल्याला रोज बोलते याचं समाधान त्याच्या चेह-यावर असत होतं; पण तू मला आवडतेस! हे तिला कसं सांगावं, हा प्रश्न याला काही स्वस्थ बसू देत नव्हता. एक दिवस त्यानं वर्गातीलच त्याच्या एका मित्राला हे बोलून दाखवलं. मग काय.. त्या भाऊंनी सल्ला दिला, ‘‘ अरे, ती चित्र खूप छान काढते तर रांगोळ किती सुंदर काढत असेल''?
तो : ‘‘ते तर काढतच असेल ना! त्याचा इथं काय संबंध?''
मित्र : ‘‘तेच तर.. तुला कळत नाही. ती तिच्या अंगणात रोज सकाळी छान रांगोळ काढत असेल. त्यावेळी तू तिच्या घराकडं जात जा ना! हळूहळू तिच्याही लक्षात येईल, की तू कशासाठी येत आहेस ते''. मित्राचं हे बोलणे ऐकून यानं ठरवलं आता रोज पहाटे तिच्या घराकडं मार्निंग वॉकचं निमित्त करून जायचं. ती कुठं राहते याचा त्यानं पत्ता काढला. तिचं घर भर वस्तीत असतानाही तो तिकडं सकाळी पाच ते सात वाजतापर्यंत इकडून-तिकडं अन् तिकडून इकडं धावत असे. सकाळी आठ वाजता कॉलेजचा वेळ असे. त्यामुळं सातच्या नंतर हा खूप थकून रुमवर येई. असं पाच-सहा दिवस केलं; पण ती दिसलीच नाही. दरम्यान, एकानं त्याला हटकलंही, ‘तू मोकळा रस्ता सोडून या गल्लीत धावण्यासाठी का येतो ते?' त्याच्या बोलण्यावर हा निरुत्तर झाला; पण यानं आपलं धावणं सोडलं नाही. ती दिसत नसल्यानं याच्या मनाची घालमेल होत होती. आठवडा गेल्यानंतर एक दिवस तिच्याकडून वही परत घेत असताना त्यानं विचारलंच : ‘‘ मोरांगी तुझ्या अंगणात तू सुरेख रांगोळी काढत असशील ?'' ती हसली अन् म्हणाली : ‘‘अरे, मला सकाळी आठ वाजतापर्यंत जागच येत नाही! म्हणून तर कॉलेजला उशीर होतो. मग रांगोळीला वेळच मिळत नाही.'' असं म्हणून तिनं सायकलवर टांग मारली. हा मात्र आपण उगाचच मित्राचं ऐकल नि इतके दिवस साखर झोपेचं खोबरं केलं म्हणून स्वतःवरच चिडत होता. एकदाची परीक्षा झाली. सुट्या लागल्या. पुढे निकालही लागला. याचा नेमका इतिहासच लटकला. ती फस्ट क्लासमध्ये पास झाली. याच्याच वहीतून अभ्यास करून इतिहासात तिला सर्वाधिक माक्र्स मिळाले. नापास झाला म्हणून तिनंही आता याची वही नेणं बंद केलं. कालांतरानं कॉलेज संपलं. तिनं पुरातत्त्व खात्याच्या परीक्षा देणं सुरू केलं. दरम्यान, गलेलठ्ठ पगारावर नोकरी असलेल्या एका मुलासोबत तिचं लग्नही झालं. त्यावेळी याचं काळीज किल्लारीसारखं उद्ध्वस्त झालं. हा अजूनही तसाच आहे. ती गेलेल्या हिरव्या वाटेकडं डोळे लावून. कुपोषित, करपलेल्या मेळघाटासारखा. कुठे आणि कशी असेल मोरांगी? झाली असेल का इतिहास संशोधक? असा विचार करीत पुन्हा-पुन्हा जीर्ण झालेली इतिहासाची वही काढून आठवणींचं उत्खनन करीत बसणारा.

                                   - विकास वि. देशमुख
                                     करडा, ता. रिसोड, जि.वाशीम 

                                      
                                      Vikas V. Deshmukh
                                      at. Karda tq. Risod, dist. Washim

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

झारखंडपासून विदर्भवादी धडा घेतील काय?


स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतर मध्य प्रदेश आणि विदर्भ मिळून ‘सी.पी. अ‍ॅण्ड बेरार' हे राज्य होते. त्याची राजधानी नागपूर होती. कालांतराने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे अकोला आणि नागपूर करारानुसार १ मे १९६० रोजी या राज्यातील मराठी भाषिकांचा प्रांत महाराष्ट्रात सामील झाला. तेव्हापासून या प्रदेशाची हेळसांडच सुरू आहे. नागपूरचा राजधानीचा दर्जा गेला आणि उपराजधानी म्हणून शिक्का बसला. आज महाराष्ट्रात येऊन विदर्भाला ५० वर्षे झालीत. दरम्यान विकासाचा असमतोल निर्माण झाला. त्यामुळेच वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी होऊ लागली. विदर्भाचा इतिहास, वन आणि खनिज संपत्ती पाहता ती काही प्रमाणात योग्यही आहे. शिवाय लहान राज्य लवकर विकसित करता येते, हा या मागणीमागे विचार आहे. पण लहान राज्य स्थिर सरकार देऊ शकेल काय आणि सरकारच जर स्थिर नसेल तर विकास कामांना वेळ मिळेल काय? हा प्रश्न झारखंडच्या राजकीय स्थितीवरून निर्माण झाला आहे. परिणामी, विदर्भवाद्यांनी यावर विचार करण्याची वेळ आली आहे.१२ वर्षांपूर्वी झारखंड राज्याची निर्मिती झाली. या काळात कुठलाच पक्ष किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. स्वाभाविकच या राज्याने आठ मुख्यमंत्री आणि दोनदा राष्ट्रपती राजवट पाहिली. आता पुन्हा तिसèयांदा हे राज्य राष्ट्रपती राजवटीच्या उंबरठ्यावर उभे आहे. यात जनता भरडली जात आहे. विकास रखडलेलाच आहे. झारखंड राज्य झाल्यानंतर विकास होईल, असे वाटत होते; परंतु तसे झाले नाही. मुख्यमंत्री बदलले, सरकारे बदलली, भ्रष्टाचार कायम राहिला. येथील सगळेच पक्ष आणि प्रमुख नेते भ्रष्टाचारी
आहेत, हे उघड झाले. याचा फटका राज्याला सहन करावा लागत आहे. झारखंडमध्ये खनिज संपत्ती भरपूर आहे; परंतु खाणीतून बाहेर येणाèया
लोह संपत्तीच्या विकासाची दृष्टी असलेल्या कारभाराचा परिसस्पर्श होत नसल्याने ती वाया जात आहे, खेडी उजाड होत आहेत. शहरांकडे लोंढा वाढतो आहे. दुसरीकडे नक्षलवादी प्रस्थ वाढवीत आहेत. २४ जिल्ह्यांपैकी २२ जिल्ह्यांत त्यांचे वर्चस्व आहे. स्वाभाविकच विकास काय आहे, हे अजूनही येथील जनतेला कळलेला नाही. असेच काहीसे वेगळ्या विदर्भाचेही होऊ शकते. पूर्वी मध्य प्रदेश आणि विदर्भ मिळून राज्य होते. परिणामी त्याकाळी सरकारही स्थिर होते. विदर्भात सध्या ११ जिल्हे आहेत. वणी आणि खामगाव हे दोन जिल्हे करावे, अशी मागणी आहे. विदर्भ राज्य झाल्यास या दोन शहरांना जिल्ह्याचा दर्जा मिळेलही. पण केवळ १३ जिल्ह्यांवर राज्य सरकार स्थिर होईल का? हा प्रश्न आहे. राज्य म्हणून विदर्भाकडे भौगोलिकदृष्ट्या पूर्वीपासूनच सगळे काही आहे. नागपूरला विधानभवन, उच्च न्यायालय या इमारतीसुद्धा आहेत. झारखंडप्रमाणे विपूल खनिज संपत्ती आहे. तसेच पूर्वविदर्भात नक्षलवादी आहेत. त्यांचा बिमोड करणे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याला शक्य झाले नाही, ते लहान विदर्भाला शक्य होईल का? महत्त्वाचे म्हणजे विदर्भातसुद्धा प्रांतवाद आहे. वèहाड (पश्चिम विदर्भ) आणि पूर्वविदर्भ म्हणजेच झाडीपट्टी असे त्याचे दोन प्रांत आहेत. दोन्ही भागांतील संस्कृती, भाषा भिन्न आहे. पूर्वविदर्भात qहदीचा अधिक प्रभाव आहे. गोंदिया जिल्ह्यात १०० टक्के हिंदीच बोलली जाते. तेथील नगरपालिका, ग्रामपंचायत यांचा कारभारही हिंदीतूनच चालतो. याशिवाय भंडारा, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांतीलसुद्धा बरेच तालुके पूर्णतः हिंदी भाषिक आहेत. परिणामी, विदर्भ राज्य वेगळे झाले तरी भाषिकदृष्टी ते एक होणार नाही. दुसरे म्हणजे हे लहान राज्य स्थिर सरकार देऊ शकेल काय? या सगळ्यांचा विचार विदर्भवाद्यांनी करणे गरजेचे आहे.
विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम.
Vikas V. Deshmukh
Karda, tq. Risod, Dist Washim

बालक पालक आणि सेक्स

सकाळची वेळ. आई घर काम करण्यात व्यस्त. बाबा अंघोळ करून पेपर वाचत होते. दादा गच्चीवर सूर्यनमस्कार काढत होता. एवढ्यात तिसरीत असलेला चिंटू धावत आला नि आईचा पदर ओढत म्हणाला, ‘‘आईऽऽऽ आईऽऽऽ आपल्या शेजारची पिंकी मुलगी अन् मी मुलगा असं कसं? कसं ठरवायचं हा मुलगा अन् ही मुलगीच म्हणून...'' या प्रश्नामुळे आई थोडी गोंधळली अन् चिडलेल्या स्वरात म्हणाली, ‘‘ जा तुझ्या बाबाला विचार! नस्ते प्रश्न करत राहतोस!!'' हिरमुसला होऊन चिंटू हॉलमध्ये आला. इकडे आई-मुलाचा संवाद बाबाच्या कानावर पडलाच होता. बाबा त्याला जवळ घेत म्हणाले, ‘‘अरे वेड्या पिंकी कपडे कसे घालते?''
चिंटू : ‘‘ती फ्रॉक घालते.''
बाबा : ‘‘अन् तू?''
चिंटू : ‘‘मी चड्डी अन् शर्ट घालतो''
बाबा : ‘‘म्हणूनच पिंकी मुलगी आहे अन् तू मुलगा! काय समजलं का? जा आता खेळ बाहेर जाऊन'' असं म्हणत बाबांनी आपल्या चष्म्यातून चिंटूकडे कटाक्ष टाकत पेपरमध्ये डोळे खुपसले; परंतु इकडे चिंटूच्या मनात असलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळण्याऐवजी बाबांनी दिलेल्या उत्तरामुळे त्याच्या मनात पुन्हा उपप्रश्न निर्माण झाला, ‘मी जर फ्रॉक घातला तर मीसुद्धा मुलगी होईल का?' त्याने त्याचीच जीभ चावली अन् मित्रकंपनीकडे धूम ठोकली.
असे आईबाबा आणि चिंटू जवळपास प्रत्येक घरातच असतात. 
चिंटूच्या मनात आला तसेच अनेक प्रश्न घराघरांतल्या चिंटू अन् पिंकीच्यासुद्धा मनात येतात; मात्र शास्त्रीय आणि खरे उत्तर देण्याचे बहुतांश पालक टाळातात. ‘नस्ते' प्रश्न म्हणत काहीतरीच उत्तरं देत वेळ मारून नेतात; पण यामुळे चिंटू अन् पिंकीची उत्सुकता कमी थोडीच होते? उलट त्यांना अजून प्रश्न पडतात. मग जमेल त्या मार्गाने, कधी मित्र-मित्रिणीशी चर्चा करून तर कधी टीव्ही, चित्रपट, पुस्तके यातून ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे मित्र-मैत्रिणीही त्यांच्याच वयाचे. त्यामुळे ते तरी कसे योग्य उत्तर देणार? स्वाभाविकच एका मनाची उत्सुकता दुस-या मनात प्रवेश करते नि या चिमुकल्यांकडून चुकीचे अर्थ लावले जातात. ओघानेच त्यांच्यापैकी काहींकडून चुकाही होतात. ते जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा अपराधीपणाची भावना त्यांच्या कोवळ्या मनाला कुरडते अन् उनाडक्या करणारे एकाएकी एकलकोंडे होतात. अभ्यासात मन लागत नाही. जर आईबाबांनी वा इतर कुणी जबाबदार व्यक्तींनी त्यांना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली तर त्यांच्या हातून चुका होणार नाहीत. या चुका टाळण्यासाठी ‘बालक-पालक' यांच्यात या विषयावर संवाद होणे गरजेचे आहे. खेदाची बाब म्हणजे आपल्याकडे तसे होत नाही. हीच कोंडी फोडण्याचे काम ‘बीपी (बालक-पालक)' या मराठी चित्रपटाने केले. 
लैंगिक शिक्षण कसे आवश्यक आहे हे हा चित्रपट पटवून देतोच; परंतु त्याही पेक्षा बालक-पालकांत संवाद किती महत्त्वाचा आहे, हे सांगतो. चित्रपटाची कथा अंबर हडप यांच्या ‘बीपी(बालक-पालक)' या नाटकावर आहे. पटकथा आणि संवाद त्यांचेच आहेत. ही कथा पौंगाडवस्थेतील भिन्न स्वभावधर्माच्या पाच मुलांभोवती गुंफलेली आहे. त्यामध्ये दोन मुली आहेत. ते सगळे संस्कारात वाढलेले, विचारांवर पालकांचाच प्रभाव असणारे आहेत. यापैकी डॉली, चिऊ, अव्या आणि त्यांचा आणखी मित्र एकाच चाळीत राहतात. एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकतात. स्वाभाविकच त्यांच्यात कमालीच सख्य असते. एक दिवस ते शाळेतून घरी येतात. सबंध चाळीत सुतकी वातावरण असते. चाळीतीलच मेघाताई ही चाळ सोडून ऑटोतून जाताना दिसते. ती का आणि कुठे जात आहे? असे प्रश्न या चौकडीच्या मनात येतात. नेमकं काय झालं हे त्यांना कुणीच सांगत नाही; मात्र ‘मेघानं शेण खाल्लं; असं एक ना एक दिवस होणारच होतं' हे चाळीतल्या बायकांचं बोलणं त्यांच्या कानावर पडतं. ‘शेणं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं आणि शेण काय खाण्याची वस्तू आहे का?' हा प्रश्न त्यांना पडतो. डिक्सनरीत ते त्याचा अर्थ शोधतात; पण व्यर्थ. मग त्यांच्यापैकीच असलेली भोळी चिऊ एक दिवस पूजा करीत असलेल्या आईला विचारते, ‘‘आई गोमुत्र प्याल्याने काय होतं?'' आई म्हणते : ‘‘ ते शरिरासाठी चांगलं असतं, आजार होत नाहीत'' चिऊ पुन्हा विचारते : ‘‘मग शेण खाल्यानं काय होतं?'' त्यावर आई भयंकर चिडते आणि आरतीची टाळी तिच्या श्रीमुखात भडकावते. दुसरीकडे अव्या त्याच्या नाट्यदिग्दर्शक असलेल्या बाबाला म्हणतो ‘‘बाबा तुम्ही कधी शेण खाल्लं का?'' त्याचेही चिऊ प्रमाणेच होते. बाहेर फुटणाèया फटाक्यांचा आवाज याच्या कानाखाली येतो. पुढे ही चौकडी एकत्र बसते आणि ‘शेण खाणे' याचा नेमका अर्थ कसा शोधायचा याचा विचार करते. त्यावर त्यांना त्यांच्या शाळेतील विष्णू हा टपोरी मुलगा आठवतो आणि ते त्याच्याकडे जातात. इथून कथेला रंगत येते. विष्णू एखाद्या शिक्षकाप्रमाणे त्याला जे माहित आहे ते सांगतो. या चौघांना पिवळी पुस्तकं वाचायला देतो; परंतु या पुस्तकात जे लिहिलंय ते खरं आहे का? असा प्रश्न पुन्हा त्यांना पडतो. त्याचे उत्तर शोधण्यासाठी ते रात्री चाळीतल्या खिडक्यातून डोकावतात; मात्र नशिबी निराशाच येते; पण स्वस्थ बसू देईल ती उत्सुकता कसली? विष्णूच सांगतो की, आपण ‘ब्ल्यू फिल्म (बीपी)' पाहायची. एक दिवस ते भाड्याने व्हिसीआर आणि व्हिडिओ कॅसेट आणून सामूहिक बीपी पाहातात. पुढे त्यांच्यातील कोवळ्या मुलांत पुरुषत्व जागं होतं. त्यातीलच एक चिऊकडे प्रेयसी म्हणून पाहू लागतो तर अव्या त्याच्या पेक्षा मोठ्या असलेला नेहाताईला चक्क ‘आय लव यू' म्हणतो. हे मुलींना आवडत नाही. त्यांचं मैत्रीची नातं दुभंगू लागतं. खेळणं तर ते हरवूनच बसतात. चाळीतील ज्येष्ठ नागरिक असलेले कदम काका (किशोर कदम) यांच्या हे सगळं लक्षात येतं. ते सगळ्यांना नेहाताईच्या मदतीने एकत्र आणतात आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची, शरिराच्या बदलाची माहिती देतात.
यातील कथा दोन पिढ्यांची आहे. पहिली पिढी ८० च्या दशकातील तर दुसरी आताच्या. दोघांमध्ये २५ ते ३० वर्षांच अंतर आहे; पण त्यांना पडणारी प्रश्न, त्यावर पालकांनी दिलेली उडावा-उडवीची उत्तरं qकवा पोरगा कोनावर जातोय म्हणून बाबांनी आडव्या हाताने कानपट्टीचे घेतलेले माप, त्यानंतर मुलांनी पिवळी पुस्तक, कॅसेट, सीडी, मित्र यांच्यामार्फत स्वतः शोधलेली उत्तर हे दोन्ही पिढ्यात सारखंच आहे. मुलांनी वाममार्गाने जाऊ नये, यासाठी या विषयावर ‘बालक आणि पालकङ्क यांचा संवाद कसा आवश्यक आहे हा संदेश हा चित्रपट देतो. हा अत्यंत नाजूक विषय हळुवारपणे आणि अश्लिलतेचा कुठलाच स्पर्श होऊ न देता हातळण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आला आहे. 
‘काय मस्त अ‍ॅटम आहे'  ‘तो आपला माल है' असे नेहमीच्या बोलण्यातील संवाद पात्रांच्या तोंडी आहेत. त्यामुळे चित्रपट पाहाताना यात पालक आपले बालपण शोधतो नि म्हणतो, ‘आयला आम्ही बी असंच करत व्हत्तू की...'अन् बालक प्रेक्षक म्हणतात ‘सॉलिड आमचंही असंच आहे' त्यामुळेच हा चित्रपट बालक आणि पालक या दोघांसाठी आवश्यक आहे. सध्या समाजाला चूक काय आहे हे सांगणा-या पालकाची नव्हे तर काय बरोबर आहे हे सांगणाèया पालक रुपातील मित्राची गरज आहे, हा अत्यंत वास्तववादी आणि मार्मिक विचार यातून दिला आहे. चित्रपटाची निर्मिती ख्यातकीर्त अभिनेता रितेश देशमुख, उत्तुंग हितेंद्र ठाकूर आणि मेघना जाधव यांची आहे. दिग्दर्शन रवि जाधव यांनी केले आहे. विशाल-शेखर आणि चिनार-महेश यांचं संगीत आहे. हल्लीच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा काहीच मिनिटांचा पडद्यावरील वावर सुखावून जातो अन् अभ्यंकर यांनी शेवटी भूमिका एका ‘माईल स्टोनङ्क अशा चित्रपटात केली या विचारानं मन भरून येतं. किशोर कदम यांनी साकारलेला ‘काका' सगळ्याच पालकांना विचार अन् जबाबदारीची जाणीव देतो. कथेत हलक्या-फुलक्या विनोदांची पेरणी केली आहे. त्यामुळे चित्रपट आणखीच मनाला भिडतो. सगळ्याच कलाकारांनी ताकदीचा आणि नैसर्गिक अभिनय केला आहे. जो विषय समाजात बोलण्यास कुणी पुढाकार घेत नाही तो पहिल्यांदाच मराठीतून पडद्यावर दाखविण्याचं धाडस निर्मात्यांनी केलं आहे. त्यांमुळं त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. हा चित्रपट जरी लैंगिक शिक्षणावर आधारित असला तरी यात अश्लिलता कुठेच नाही. सहकुटुंब पाहता येईल आणि पाहावाच असा हा चित्रपट आहे. असे असताना किती पालक हा चित्रपट आपल्या बालकांसोबत पाहतील? पालकांनी चित्रपट पाहिल्यानंतर ते मुलांना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देतील का, की केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट पाहायला येतील आणि घरी गेल्यानंतर विसरून जातील, असे एक ना अनेक प्रश्न सुज्ञ प्रेक्षकांना पडले नाही तर नवलच. 
-  विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम.

९८५०६०२२७५
०००००

Vikas Deshmukh
Karda, Risod, Washim

रामदास स्वामी

लग्नाची सारी तयारी झाली होती, मंगलाष्टका म्हटल्या जात होत्या. ‘शुभमंगल सावधान’ चा घोष झाला आणि हातात वरमाला घेऊन उभा असलेला नवरदेव मांडवातून धूम ठोकून पळाला. खूप शोधाशोध झाली; पण तो काही सापडला नाही. पुढे हाच युवक रामदास स्वामी, या नावाने प्रसिद्ध झाला. ‘दासबोध’सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला, ‘मनाचे श्लोक’ ही त्यांची कालातीत अशी व्यवहारज्ञानाची देणगी आहे. आजही समर्थ रामदासांचे व्यक्तिमत्त्व अनेक कारणांनी चर्चेत
असते; पण त्यांनी लग्न मंडपातून पलायन केल्यामुळे त्यांच्या वाग्दत्त वधूचे पुढे काय झाले, हे कधीच वाचनात आले नाही. प्रभू रामचंद्राबरोबर वनवासामध्ये सीतामाई होत्या; पण बंधू लक्ष्मणाबरोबर त्यांची पत्नी नव्हती. तिने पतीचा विरह बारा वर्षे सहन केला. कवी मैथिलीशरण गुप्त यांनी त्या ऊर्मिलेच्या मानसिक आंदोलनावर ‘साकेत’ हे महाकाव्य लिहिले; पण रामदासांची न झालेल्या पत्नी मात्र उपेक्षितच राहिली. रामदासांच्या होऊ घातलेल्या या दुर्दैवी वधूचे पुन्हा लग्न ठरले काय? त्या काळात प्रबळ असलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत तिला कशी वागणूक मिळाली की तिने आत्महत्या केली? नेमकी काय झालं असेल त्या युवतीचं...
 
- विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम


Vikas V. Deshmukh
Karda, Risod, washim

जातीव्यवस्थेमुळे आईला विकावा लागला काळजाचा तुकडा

राजस्थानातील झालावाड गाव. या गावात काही भटकी कुटुंबं पालं टाकून राहतात. यातील एका कुटुंबात एक चुणचुणीत मुलगी. तिचं वय झोपाळ्यावाचून झुलण्याचं. मंदिरांतील घंट्या अन् मैत्रिणीसोबत खेळण्या-कुदळण्याचं; पण तिचं कुटुंब अठराविश्व दारिद्य्रात खितपत पडलेलं. दिवस उजाडला की दोन वेळच्या जेवणाची भ्रांत या कुटुंबाला पडते. दारिद्य्रीकाठच्या यातना भोगणा-या या कुटुंबातील तिच्या आईला जात पंचायतीने एका प्रकरणात ४ लाख ५० हजार रुपयांचा दंड भरण्याचं फर्मानं सोडलं. ही रक्कम भरली नाही तर जातीतून बाहेर काढण्याची धमकीही दिली. तिचं आणि तिच्या कुटुंबाचं पोटं तळहातावर. त्यामुळे ऐवढी मोठी रक्कम ती कुठून आणणार... आणि ही रक्कम भरली नाहीच तर? पंचायत जाती बाहेर काढेलच शिवाय अजून दुसरी शिक्षासुद्धा देईल, या भीतीनेच आणि जातीच्या खोट्या अभिमानेही एखाद्या पाळीव जनावराप्रमाणे आपल्या कोवळ्या मुलीचा तिने जाहीर लिलाव केला. यात या मुलीला साडे सहा लाख रुपये बोली मिळाली. खरिदार मुलीला घेऊन जात असताना तिने त्यांच्या हाताला झटका देऊन धूम ठोकली. ती एका हॉटेलमधील टेबलामागे लपली. हुमसूहमसू रडू लागली. हॉटेल मालकाला सशंय आला. त्याने या बाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस आले. मुलीने सारा प्रकार सांगितला. खरिदार तिला मुंबईला घेऊन जाणार होते, अशी कैफियत या चिमुकलीने पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी तिची आई आणि खरिदारांना अटक केली आहे.
एकीकडे सारा देश ६४ व्या प्रजासत्ताक दिनाची तयारी करत असताना काळजाची चाळणी करणारा हा प्रकार राजस्थानातील भटक्यांच्या पालावर घडला. येथील व्यवस्थेने त्यांच्यावर पिढ्यान्पिढ्यानपासून लादलेली लाचारी, जातीचा खोटा अभिमान, स्वतःला समांतर न्यायव्यवस्थाच समजणारी क्रूर जात पंचायत आणि गरिबी यामुळेच हे घडलं. यात या मातेचा दोष आहे असे मी म्हणत नाही. तर तिच्यावर अन्याय केला तो येथील मूळ व्यवस्थेनं. या व्यवस्थेमुळे तिच्या आईला तिची विक्री करावी लागली. व्यवस्थेमुळेच त्यांच्यावर भटके म्हणून जगण्याची वेळ आली. त्यामुळेच त्यांना सामाजिक प्रतिष्ठा नाही. सामाजिक प्रतिष्ठा नसल्याने पैसा नाही. परिणामी शिक्षण, आरोग्य अन् घरसुद्धा नाही. या दलदलित हे भटके फसले आहेत. आज आपली लोकशाही ६४ वर्षें झाली तरीही दलित, भटके, आदिवासी यांचं जीवन आपण अजूनही सुधारू शकलो नाही, हेच यातून दिसून आले आहे. हजारो वर्षांपूर्वी मेंदूत पेरलेलं शोषणाचं तणकट अजूनही दणकट अवस्थेत आहे, हीच शोकांतिका आहे.

 - विकास वि. देशमुख

   करडा, रिसोड, वाशीम.
                                                                                                                       

                                                                                                                           Vikas Deshmukh 

                                                                                                                        Karda, Risod, Washim 

सत्यनारायणाचा प्रसाद खाल्ल्याने ८६ जणांना विषबाधा

महाराष्ट्रात सगळीकडे सत्यनारायणाची पूजा केली जाते; या पूजेमुळे आयुष्य सुखी होते. संतती नसलेल्यांना संतती लाभ होतो, असा समज ही पूजा करणा-यांचा आहे. त्यामुळेच आता या पूजेचे लोण हळूहळू इतर राज्यांतही पोचू लागले आहे. त्यातूनच उत्तर प्रदेशमधील हैदरगढ पोलिस ठाण्याअंतर्गत येणा-या कान्हीपूर (जि. बाराबंकी) या गावातील लालू अवस्थी या व्यक्तीने आपल्या मुलगा होऊ दे असा नवस केला. गंमत म्हणजे त्याला सत्यनारायणाच्या नवसाने (त्याच्या मुळे नव्हे) मुलगा झाला. त्या आनंदात त्याने ठरल्याप्रमाणे ३१ जानेवारीला घरी सत्यनारायणाची पूजा केली. प्रसादासाठी आप्तस्वकियांना आंमत्रित केले. आपण प्रसाद घेण्यासाठी गेलो नाही तर उगाचच ‘कलावतीङ्कप्रमाणे सत्यनारायणाचा आपल्यावरही कोप होईल, या भीतीने तर काही जण एक वेळच्या जेवणाचे भागेल. शिवाय मिष्टान्न खायला मिळेल, या हेतूने प्रसाद सेवण करण्यासाठी अवस्थी याच्या घरी गेले. पूजा झाली. आलेल्या प्रत्येकाने दर्शन घेतले. काहींनी देवाच्या पुढे पैसेसुद्धा टाकले. त्यानंतर रांगेत बसून ८६ जणांनी प्रसाद घेतला. त्यानंतर तास-दीड तासातच या सगळ्या भाविकांना हगवण आणि उलटीचा त्रास सुरू झाला. लागलीच यजमानांसगट पोथी वाचणा-या भटजींचीही ‘फाटली'. मग मिळेल त्या वाहनाने सगळ्यांना दवाखान्यात नेण्यात आले. काही जण स्वतःच गेले. प्राथमिक उपचारानंतर यातील ७६ भाविकांना घरी पाठविण्यात आले तर १० भाविक अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत. फुकटंच खायला मिळेल आणि सत्यनारायण आपल्याला पावेल या (अंधळ्या) श्रद्धेने गेलेल्या या सगळ्यांनाच चांगलाच ‘प्रसाद' मिळाला.
खरं तर सत्यनारायणाची कथा जशी प्राचिन नाही तशी ती भारतभरसुद्धा नाही. या कथेचा हेतू त्याची प्रतिष्ठा, प्रतिज्ञेचे महत्त्व आणि धर्माविषयीचा आदर वाढविणे असा सांगितले जातो; पण यातील एकाही मूल्याची पेरणी ही कथा करीत नाही. उलट या कथेमुळे सत्याची प्रतिष्ठा वाढविण्याऐवजी लोभी वृत्तीच वाढत आहे. मलाच मिळावे, असे वाटणारे ती आपल्या घरी वाचतात. शिवाय धर्माचा आदर वाढण्याऐवजी या कथेमुळे धर्माची भीतीच अधिक वाटते. तुम्ही जर प्रसाद सेवण केला नाही qकवा कथा वाचली नाही तर तुमचे वाईट होईल, अशी धमकीच या कथेतून सरळ-सरळ दिली आहे. एकूणच काय तर या कथेची जर समीक्षा करायचे झाले तर तिच्या लेखकाची आणि ती वाचणा-यांची विकृत मानसिकताच यातून दिसते. त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धीने विचार करायलाच हवा. सत्यनारायणाची कथा वाचल्याने वाचणा-यांचे जर खरंच भले होत असेल तर या ८६ भाविकांना त्याच सत्यनारायणाने हगवण का लावली? त्याच्या प्रसादामुळे बुडलेले जहाज वर येते; पण तोच प्रसाद खाणा-या १० जण मरणासन्न का झाले? याच विचार ही पोथी वाचणा-यांनी करायलाच हवा.
०००००००००००००
- विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम.
०००००००००००००

Vikas V. Deshmukh
Karda, tq, Risod, dist Washim