रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

मोरांगी



सा तो अभ्यासात जेमतेमच. खूप अभ्यास केल्यानंतर कसातरी काठावर पास व्हायचा. त्याची बारावी झाली. आता यापुढे आपण जोमानं अभ्यास करू. चांगले माक्र्स् घेऊ असं ठरवूनच एक स्टोव, सतरंजी, उशी, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी आणि जुनी सायकल घेऊन तो बीएसाठी शहरात आला. पावसाळाही लागला होता. सारं कसं टवटवित. आल्हाददायक. नजर जाईल तिकडं हिरवंकंच्च दिसत होतं. गार-गार. कॉलेजच्या रस्त्यावर गुलमोहराची फुलं कुणी सडा टाकावा तशी पडलेली असायची. त्यामुळं याचंही मनही अधिकच प्रफुल्लीत झालं. कोवळ्या गवताप्रमाणे याच्या मनात अनेक स्वप्न अंकुरले. तो त्याचा कॉलेजचा पहिला दिवस होता. पाऊस धो-धो कोसळत होता. त्या दिवशी हा छत्री घेऊन पायीच कॉलेजला गेला. गेटवर त्याला ती दिसली. नाजूक सायकलच्या नाजूक पायडलवर नाजूक पाय फिरवत असलेली. तिनं शेवाळलेल्या रंगाचा रेनकोट घातला होता. तिच्या गालावरून पावसाचे ओथंबे ओघळत होते. कोण असावी बरं ही? आपल्याला बोलेल का? असा विचार करीत यानं वर्गाच्या पाय-या चढल्या. छत्री मिटवली नि आपल्या बाकड्यावर जाऊन बसला. इतर मुलं-मुलींपैकी ज्यांच्या पूर्वीच्या ओळखी होत्या त्यांचा चिवचिवाट सुरू झाला. तो त्या गावात नवीनच होता. त्यामुळं एका कोप-यात जावून बसला. त्याच्या मनात मात्र तीच रेंगाळत होती. अरेच्चा! ती पण त्याच वर्गात येऊन बसली की. मग काय, वर्ग खोलीच्या टिनावर पडणा-या टपोर थेंबाचा आवाज याच्या काळजात यायला लागला. आता याच्या मनात विचारानं अधिक गती पकडली. काय नाव असावं बरं हिचं, असा विचार तो करू लागला. एवढ्यात मॅडम आल्या. सगळे उठून उभे राहिले. पहिला दिवस असल्यानं केवळ परिचय करून घेऊ, हेच ते काय त्याला ऐकू आलं. बाकी सगळं लक्ष तिच्याकडंच तर होतं. तिचा नंबर आला. ती म्हणाली, ‘‘मी मोरांगी. मला चित्र काढायला आवडतात. इतिहास संशोधक व्हायचंय.'' हा मनातल्या मनात पुटपुटला, ‘मोरंगी. व्वा! काय सुंदर नाव आहे. अगदी मोराच्या अंगासारखंच'. तीसुद्धा खरोखरच मोरांगीच होतीच.
दिवसामागून दिवस जात होते. याचेही आता कॉलेजमध्ये मित्र झाले. कधी-कधी उगाचच काही तरी कारण काढून तो तिला बोलायचा; पण याच्यापेक्षा ती इतर मुलांनाच जास्त बोलयची. हीच त्याची व्यथा होती. आपली ही व्यथा तिची कथा बनेल का, असं याला सारखं वाटायचं. तिला नेहमीच कॉलेजमध्ये यायला उशीर व्हायचा आणि पहिला प्रिरिअड तिच्या आवडीच्या इतिहासाचाच असायचा. या प्रिरिअड च्या मॅडम नोट्स लिहून द्यायच्या; मात्र मोरंगीला उशीर झाल्यानं तिला लिहून घेता येत नव्हतं. हेच यानं हेरलं. तो नियमित नोट्स लिहून घ्यायला लागला. या प्रेडसाठी याच्याएवढं नियमित कुणी नाही हे मोरांगीच्याही लक्षात आलं. मग तिनंही याच्याशी सलगी वाढविली. ती रोज याची इतिहासाची वही घेऊन जाऊ लागली. यालाही तेच हवं होतं. आता ती आपल्याला रोज बोलते याचं समाधान त्याच्या चेह-यावर असत होतं; पण तू मला आवडतेस! हे तिला कसं सांगावं, हा प्रश्न याला काही स्वस्थ बसू देत नव्हता. एक दिवस त्यानं वर्गातीलच त्याच्या एका मित्राला हे बोलून दाखवलं. मग काय.. त्या भाऊंनी सल्ला दिला, ‘‘ अरे, ती चित्र खूप छान काढते तर रांगोळ किती सुंदर काढत असेल''?
तो : ‘‘ते तर काढतच असेल ना! त्याचा इथं काय संबंध?''
मित्र : ‘‘तेच तर.. तुला कळत नाही. ती तिच्या अंगणात रोज सकाळी छान रांगोळ काढत असेल. त्यावेळी तू तिच्या घराकडं जात जा ना! हळूहळू तिच्याही लक्षात येईल, की तू कशासाठी येत आहेस ते''. मित्राचं हे बोलणे ऐकून यानं ठरवलं आता रोज पहाटे तिच्या घराकडं मार्निंग वॉकचं निमित्त करून जायचं. ती कुठं राहते याचा त्यानं पत्ता काढला. तिचं घर भर वस्तीत असतानाही तो तिकडं सकाळी पाच ते सात वाजतापर्यंत इकडून-तिकडं अन् तिकडून इकडं धावत असे. सकाळी आठ वाजता कॉलेजचा वेळ असे. त्यामुळं सातच्या नंतर हा खूप थकून रुमवर येई. असं पाच-सहा दिवस केलं; पण ती दिसलीच नाही. दरम्यान, एकानं त्याला हटकलंही, ‘तू मोकळा रस्ता सोडून या गल्लीत धावण्यासाठी का येतो ते?' त्याच्या बोलण्यावर हा निरुत्तर झाला; पण यानं आपलं धावणं सोडलं नाही. ती दिसत नसल्यानं याच्या मनाची घालमेल होत होती. आठवडा गेल्यानंतर एक दिवस तिच्याकडून वही परत घेत असताना त्यानं विचारलंच : ‘‘ मोरांगी तुझ्या अंगणात तू सुरेख रांगोळी काढत असशील ?'' ती हसली अन् म्हणाली : ‘‘अरे, मला सकाळी आठ वाजतापर्यंत जागच येत नाही! म्हणून तर कॉलेजला उशीर होतो. मग रांगोळीला वेळच मिळत नाही.'' असं म्हणून तिनं सायकलवर टांग मारली. हा मात्र आपण उगाचच मित्राचं ऐकल नि इतके दिवस साखर झोपेचं खोबरं केलं म्हणून स्वतःवरच चिडत होता. एकदाची परीक्षा झाली. सुट्या लागल्या. पुढे निकालही लागला. याचा नेमका इतिहासच लटकला. ती फस्ट क्लासमध्ये पास झाली. याच्याच वहीतून अभ्यास करून इतिहासात तिला सर्वाधिक माक्र्स मिळाले. नापास झाला म्हणून तिनंही आता याची वही नेणं बंद केलं. कालांतरानं कॉलेज संपलं. तिनं पुरातत्त्व खात्याच्या परीक्षा देणं सुरू केलं. दरम्यान, गलेलठ्ठ पगारावर नोकरी असलेल्या एका मुलासोबत तिचं लग्नही झालं. त्यावेळी याचं काळीज किल्लारीसारखं उद्ध्वस्त झालं. हा अजूनही तसाच आहे. ती गेलेल्या हिरव्या वाटेकडं डोळे लावून. कुपोषित, करपलेल्या मेळघाटासारखा. कुठे आणि कशी असेल मोरांगी? झाली असेल का इतिहास संशोधक? असा विचार करीत पुन्हा-पुन्हा जीर्ण झालेली इतिहासाची वही काढून आठवणींचं उत्खनन करीत बसणारा.

                                   - विकास वि. देशमुख
                                     करडा, ता. रिसोड, जि.वाशीम 

                                      
                                      Vikas V. Deshmukh
                                      at. Karda tq. Risod, dist. Washim

1 टिप्पणी:

  1. मोरांगीच्या आठवणी अजूनही तुमच्या ह्रदयात घर करून बसल्या आहेत.

    उत्तर द्याहटवा