सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

कुस्ती व्हेंटिलेटरवर

हिल्या ऑलिम्पिक (१८९६) स्पर्धेपासून एक प्रमुख क्रीडाप्रकार म्हणून ओळखल्या गेलेल्या कुस्ती खेळाला २०२० च्या ऑलिम्पिकमधून बाहेर करण्याचा धक्कादायक निर्णय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने (आयओसी) घेतला आणि विश्वभरातून या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजीचे सूर उमटले. १८० देशांत हा खेळ खेळला जातो. या देशांतून आता आव्हान-प्रतिआव्हानाचे शड्डू ठोकले जाणार नाहीत. बलवान कुस्तीपटू होण्यासाठी खेळाडूंना अपार मेहनत घ्यावी लागते. त्यांचा आहार आणि खुराक भक्कम स्वरूपाचा असतो. त्यांच्यासाठी हा निर्णय पाठीत खंजीर खुपसण्यासारखा होता. अलिकडे तर काही महिला कुस्तीपटूही या खेळात प्रावीण्य मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी किमान आठ वर्षे तयारी करावी लागते; परंतु आयओसीने एका फटक्यात तयारीचा किल्ला उद्ध्वस्त केला आहे. कुस्ती हा मर्दानगीचा खेळ आहे. शारीरिक बल आणि रग याच्या जोडीला त्याच्याकडे चपळाईही असली पाहिजे. भारतात हा खेळ शतकानुशतके खेळला जातो. त्याला ‘लाईक’ करणा-यांचा तोटा नाही. मातीतून घडणारे बलप्रदर्शन आज मातीमोल ठरण्याची वेळ आली आहे. पूर्वी गावागावांतून हा खेळ खेळला जायचा. भल्या पहाटेपासून तालमी-तालमीतून किंवा आखाड्यांतून शड्डू ठोकल्याचे आवाज घुमायचे. आशियाई कुस्तीपटूंचे या खेळातील कौशल्य यूरोपीय देशांना खुपत असावे म्हणूनच त्यांनी या खेळाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू केला आहे. प्रथम त्यांनी मातीतील कुस्ती मॅटवर आणली. विविध डावांऐवजी ‘पॉर्इंटस्’ ला अधिक महत्त्व दिले. आशियाई कुस्तीपटूंना मॅटशी जुळवून घेण्यास प्रथम अवघड गेले. परंतु नंतर त्यावरही वर्चस्व संपादन केले. भारतीय मल्लांनी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई, जागतिक स्पर्धांवर आपली मोहर उठवली. १९५२ मध्ये भारताच्या खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिले कांस्यपदक मिळवले. त्यानंतर सुशीलकुमारने बीजिंगमध्ये (२००८) कांस्य तर लंडनमध्ये (२०१२) रौप्य पदकाची कमाई केली. लंडनमध्येच (२०१२) योगेश्वर दत्तने कांस्य मिळवले. ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश विविध देशांतील खेळाडूंनी जात, धर्म, वर्णभेद बाजूला ठेवून आपले कौशल्य दाखवावे हा आहे. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतके संघटक आर्थिक सत्तेच्या जोरावर हुकूमशाही गाजवू पाहात असतील तर त्याला कसून विरोध केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती फ्री-स्टाईल आणि ग्रीको-रोमन पद्धतीने खेळवली जाते. लंडन ऑलिम्पिकमध्ये ११ फ्री-स्टाईल आणि ७ ग्रीको-रोमनची पदके ठेवण्यात आली होती आणि ते मिळवण्यासाठी एकूण ३४४ मल्ल झुंजले होते. म्हणजेच या स्पर्धेला स्पर्धकांचा तोटा नाही अन् प्रेक्षकांचाही नाही. तरीही कुस्तीला ‘घुटना’ मारण्याचा प्रयत्न कशासाठी? ऑलिम्पिकमधून एखादा क्रीडाप्रकार हटवायचा झाल्यास आयओसी टेलीव्हिजन रेटिंग, तिकिटविक्री, डोप टेस्ट समितीची शिफारस, खेळाची लोकप्रियता आदी ३६ हून अधिक निकषांचा आधार घेते. एखादा खेळ वगळताना त्या खेळात ‘डोपिंग’ ची प्रकरणे किती झाली तेही पाहिले जाते. कुस्तीला ‘डोपिंग’ च्या निकषाचा आधार लावला गेला असेल तर त्याच्या तुलनेत वेटलिफ्टिंग व सायकलिंगमध्ये ही प्रकरणे अधिक आहेत. मग या खेळांचे स्थान अबाधित कसे? कुस्तीपेक्षा अधिक धोकादायक असणा-या मॉडर्न पेन्टॅथलॉनला मानाचे पान कसे काय मिळते? कुस्तीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ११६ पदके रशियाने पटकावली आहेत. भारत या क्रीडा प्रकारात डोईजड होण्याची लक्षणे दिसू लागली की यूरोपीय देशांच्या पोटात दुखू लागते हा अनुभव जुनाच आहे. हॉकीमध्ये भारताची एकाधिकारशाही नष्ट करण्यासाठी हॉकीच्या नियमावलीतच आमूलाग्र बदल करण्यात आले. मैदानाच्या स्वरूपातही बदल करण्यात आला. असाच प्रकार आता कुस्तीमध्येही सुरू आहे. कुस्तीतील भारताची समृद्धशाली परंपरा नष्ट करण्यासाठी अत्यंत धूर्तपणे कट रचण्यात आला आहे. कुस्ती केवळ भारतातच लोकप्रिय आहे असे नाही. पाकिस्तान, तुर्कस्तान, जपान, मंगोलिया, इराण, रशिया या देशांतही तितकीच लोकप्रिय आहे. भारतात कुस्ती लोकप्रिय करण्यासाठी मारुती माने, श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, दीनानाथसिंह, मास्टर चंदगीराम, सतपाल, हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार यांनी जिवाचे रान केले होते. त्यांचे प्रयत्न वाया जाणार काय? सर्वसामान्यांची ही अस्वस्थता शक्य तितक्या लवकर दूर झाली पाहिजे. कुस्तीला आखाड्याबाहेर करण्याचा प्रयत्न करणा-यांनाच ‘धोबीपछाड’ मारला पाहिजे. मेमध्ये सेंट पीटस्बर्ग येथे होणा-या आयओसी कार्यकारिणीच्या बैठकीत कुस्तीचा पट काढला जाणार नाही यासाठी चिकाटी दाखवली पाहिजे. या बैठकीत बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, रोलर स्पोर्टस्, स्पोर्ट क्लायंबिंग, सक्वॅश, वेकबोर्डिंग, वुशू आदी खेळांसाठी सादरीकरण होणार आहे. त्यात कुस्तीला धक्का लागणार नाही यावरही चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी कुस्तीवर प्रेम करणा-या देशांनी दबावगट निर्माण केला पाहिजे. सध्या तरी कुस्ती व्हेंटिलेटरवर आहे. ती पुन्हा नैसर्गिक श्वासोच्छवास घेऊ शकेल अशी उपाययोजना करावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा