रविवार, १७ मार्च, २०१३

ये ‘आसुमल थाऊमल सिरुमलानी' रंगिला है !


 महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्ये सध्या भीषण दुष्काळाच्या दाहकतेने भाजून निघाले आहेत. हा दुष्काळ अन्न-धान्याचा नाही. तो पाण्याचा आहे. कधी नव्हे ते यंदा ऐन हिवाळ्यातच जलसाठे कोरडे पडले. त्यामुळे पेयजलाचा प्रश्न ऐरणीवर आला. माणसं गाव सोडून गुराढोरांसह भटकंती करीत आहेत. वन्यप्राणी तडफडून मरत आहेत. असे असताना  अंधळ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले असाराम बापू आणि त्यांच्या असंख्य भाविकांनी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये कस्तुरचंद पार्कवर धूळवड खेळली. त्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी केली. विशेष म्हणजे नागपुरातही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. आपल्या तहानलेल्या नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे सोडून नागपूर  महानगरपालिकेने  या धूळवडीसाठी टँकरने पाणी पुरवविले. आसाराम बापूंनी भक्त आणि भक्तीनींच्या अंगावर पाण्याचे फवारे उडविले. भक्तांनीसुद्धा मोठ्या रंगात येऊन आपल्या सोबतच्या भक्तीनींना बापूंच्या साक्षीने रंगविले. त्यामुळे आसाराम बापूंचा रंगिला स्वभाव पुन्हा एकदा दिसून आला. आसारामबापू हे वातानुकूलित गाडीतून फिरतात. कडेकोट संरक्षणात वावरतात. रोज मिष्टान्न खातात. भक्तीचा व्यवसाय करतात. चित्रविचित्र पोषाख घालतात. कधी मुड झालाच तर गुरूचा बुरखा उतरवून नाचा होत नाचतात. स्वतःला देव म्हणतात. यामुळेच ते असामान्य वाटतात. म्हणूनच की काय, सामान्य दुष्काळग्रस्तांचे   पाण्यासाठी होत असलेले हाल त्यांच्या ‘दिव्य दृष्टी'ला दिसत नाहीत.  मुळात या बापूंचे नाव आसुमल थाऊमल सिरुमलानी आहे. १७ एप्रिल १९४१ रोजी पाकिस्तानातील  बेरानी (नवाबशहा)  या गावी त्यांचा जन्म झाला.  फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात अहमदाबाद आले. ते लहान असतानाच त्यांचे वडील मरण पावले. त्यामुळे लिहिता-वाचता येईल एवढंच शिक्षण ते घेऊ शकले. व्यवसाय म्हणून त्यांनी एका छोट्या मंदिरात पूजारी म्हणून काम सुरू केले. धंदा ब-यापैकी चालत होता. त्यामुळे आसुमल यांच्यासाठी चांगली स्थळे येऊ लागली. त्यांच्या आईने एक चांगल स्थळ निवडून लक्ष्मीदेवी यांच्याशी त्यांचे लग्न ठरविले; पंचाग पाहून मुर्हुत शोधला; मात्र इथेच माशी शिंकली अन्  लग्नापूर्वी आसुमल घरातून पळून गेले. सासरकडच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला. त्यांना धकमावले. त्यामुळे घाबरून जावून त्यांनी अखेर त्यांनी नव्या मुर्हुतावर लग्न केले. पुढे काही काळ  संसार करून आसुमल हे उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे गेले. तेथून संपूर्ण देशात आपला धंदा वाढविला. अजूनही वाढवित आहेत. या अल्पशिक्षित बापूंना अनेक उच्चशिक्षित शिष्य मिळाले. ज्यांनी कोणी गैरमार्गाने, गरिबांचे शोषण करून, देशाची लुबाडणूक करून पैसा कमाविला असे नवश्रीमंत भक्त या लबाड बापूंना दान देऊन त्यांचे घबाड भरत आहेत. पैशामुळे या बापूंना माज चढत आहे. परिणामी, दिल्ली बलात्कार असो वा राहुल गांधी अशा कुठल्याही विषयावर ते बेतालपणे भाष्य करतात. हे करीत असताना त्यांनी आयुर्वेदिक औषधी विकण्याचा धंदाही वाढविला. गावोगावी आपल्या भक्तांना आपल्या उत्पादनाची दुकान थाटायला भाग पाडले. या धंद्यांसोबतच कायदे, नियम गुंडाळून ठेवण्याची त्यांची वृत्तीसुद्धा विकसित झाली. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील भैरवी या गावी राज्य सरकारकडून दहा एकर जमीन घेतली आणि तेथे अलिशान आश्रम बांधला. हळूहळू या आश्रमाच्या बाजूची जमीनही ताब्यात घेतली. ज्यांच्या जमिनी बळकावल्या त्यांनाच धमकावले. मग या पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेर राज्य सरकारने सहा एकर अनधिकृत जागेवरील आश्रमाचे बांधकामवर बुलडोजर चालविला. त्यांच्या आयुष्यात असे अनेक वादग्रस्त बेकायदा घटना आहेत. त्या कुठल्याही सज्जन माणसाचे गुंड व्यक्तीत रुपांतर करायला पुरेशा आहेत. बापूंचाच शिष्य असलेला राजू चांडक याने एकदा या बापूंना एका भक्त स्त्रीसोबत अश्लिल चाळे करतात पाहिले. जे पाहिले ते त्याने  डिसेंबर २००९ मध्ये न्यायलयात एका प्रतिज्ञापत्र लिहून दिले. त्यामुळे साबरमती येथील रामनगरात राजूवर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदला आणि राजू चांडक याच्यावरील खुनीहल्ल्याचा प्रयत्न केल्याबद्दल आसारामबापू यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आला. त्यापूर्वी आणखी एका प्रकरणात आसारामबापूंच्या आश्रमातील गुरुकुल शाळेत शिकणा-या दीपेश वाघेला आणि अभिलाष वाघेला या १० व ११ वर्षांच्या मुलांचे मृतदेह साबरमती नदीच्या पात्रात आढळून आले. त्याविरुद्ध अनेक पालकांनी संतप्त तक्रारी पोलिसांकडे केल्या. या प्रकरणाची सीआयडी चौकशी गुजरात सरकारने घोषित केली. सात साधकांना पोलिसांनी अटक केली. आसारामबापू यांच्या आश्रमात काळीजादू, मंत्रतंत्र याचे अघोरी प्रयोग केले जातात, त्यासाठी बहुधा या मुलांच्या हत्या झाल्या असाव्यात असे पोलिसी तपासात म्हटले होते. या गूढ मृत्यूचे रहस्य आता आणखी गहिरे झाले आहे.बापूंचेच गुण वारसा हक्काने त्यांच्या चिंरजिवांच्या स्वाभावात उतरले. त्यामुळेच त्याच्याही प्रेमलीलाही बाहेर आल्या आहेत.  त्यांचा मुलगासुद्धा स्त्री लंपट निघाला. हेच यांचे संस्कार आहेत. कारण जे पेरले तेच उगवणार हा नियम आहे.  

- विकास वि. देशमुख  
करडा, रिसोड, वाशीम.

Vikas V. Deshmukh 
Karda, tq- Risod, dist- Washim


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा