शुक्रवार, १५ मार्च, २०१३

‘हत्ती’ ला ‘गरूड’ गती मिळेल ?


राज्यातील फुले-आंबेडकरी चळवळ खिळखिळी झाली. प्रकाश आंबेडकर केवळ अकोला जिल्ह्यापुरतेच मर्यादित झाले. प्रा. जोगेंद्र कवाडे हे वादळही थंडावले. रामदास आठवले यांनी तर शिवसेना-भाजपच्या गोटात सामील होऊन स्वतःच आंबेडकरी चळवळीचा खून केला. रा. सु. गवई सध्या काय करीत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. नामदेव ढसाळांचेही विचार, निष्ठा शिवसेनेच्या उपकाराखाली पूर्णतः ढासळली आहे. याचाच फायदा काँग्रेस, राकाँ, भाजप, शिवसेना या पक्षांना होत आहे. परिणामी सत्ताधारी जमात होण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न धुळीस मिसळले आहे. अशा स्थितीत चळवळीत नव्याने आलेली पिढी सैरभैर झाली. राज्याच्या याच वर्तमान स्थितीचा अभ्यास करून बसपच्या सुप्रिमो मायवती यांनी गेल्या १७ फेब्रुवारीला उपराजधानी नागपूरच्या कस्तुरीचंद पार्कवर मेळावा घेतला. ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रचंड जनसमुदाय राज्याच्या कानाकोप-यातून एकत्रित आला होता. एक प्रकारे आंबेडकरी चळवळ आता हत्तीवर स्वार होते की, काय असे चित्र या मेळाव्यामुळे निर्माण झाले आहे.बसपाने मधल्या काळात अनेक चढउतार पाहिले. गतवर्षी आपला बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा सपाने सपाटून पराभव केला. पण राजकारणात असे चढउतार येत असतात, याच विचारातून पुन्हा नवी उभारी घेत दिल्ली काबीज करण्याची मोहीम आखली आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेचे सरकार देशात सत्ता काबीज करू शकते, या मतावर ठाम असलेल्या कांशिराम यांनी बामसेफ, डी.एस.फोर असा प्रवास करीत १४ एप्रिल १९८४ ला पक्षाची स्थापना केली. पण दुर्दैवाने या पक्षाला महाराष्ट्रात यश प्राप्त झाले नाही. त्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये या पक्षाने चारवेळा सरकारही स्थापन केले. त्यापाठोपाठ बिहार, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये या पक्षाचे आमदार आणि खासदार जिंकून आल्याचा इतिहास आहे. कांशिराम यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात महाराष्ट्रातून केली. पण त्यांना त्यांच्या हयातीमध्ये राज्यात पक्षाचा निकाल आणता आला नाही. त्यांच्यानंतर पक्षाची सूत्रे मायावती यांच्या हाती आली. त्यांनी कांशिराम यांच्या तालमीत तयार झालेले विलास गरूड यांच्याकडे राज्यप्रमुखाची सूत्रे दिली. २००८ पासून त्यांनी राज्याचे नेतृत्व लिलया पेलले. नवतरुणांना साद घातली. राज्याच्या कानाकोप-यामध्ये फिरत एक नवी फळी राजकारणाच्या पटलावर निर्माण केली. कार्यकत्र्यांमध्ये आत्मविश्वास पेरून राज्यात सत्ता स्थापनेचा नवीन अजेंडा बहुजन समाजापर्यंत पोहोचविला. त्यांना संदीप ताजणेसारखे तरुण, तडफदार, आत्मविश्वासू आणि अभ्यास असलेले अनेक उच्चशिक्षित कार्यकर्ते भेटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षाच्या जनाधाराचा आलेख बघता इतर बहुजन संघटनांपेक्षा बसपा अगदी सरस ठरल्याचे दिसते. राज्याच्या उपराजधानीमध्ये १२ नगरसेवक जिंकून आणण्याची भीम पराक्रमही त्यांनी साधला आहे. अमरावती, ठाणे, नगर, सोलापूर, मुंबई, उल्हासनगर आदी महापालिका आणि अनेक नगरपालिकांत सदस्य आहेत. शिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाने खाते उघडून इतर राजकीय पक्षांना त्यांच्या उपस्थितींची दखल घेण्यास भाग पाडले. २००९ ला लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बसपाला उतरतीकळा लागली होती. मात्र गरूडांच्या चिवटपणाने पक्षाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय केल्याचे नागपुरातील मायावती यांच्या विशाल जनसभेवरून सिद्ध होते. त्यामुळे नक्कीच रिपाइं पक्षाच्या काळजात धस्स झाले. इतर रिपाइं पक्षाकडे भविष्याचे नियोजन नाही, ठोस कार्यक्रम नाही. प्रकाश आंबेडकर त्यादृष्टीने विचार करतात, बोलतात. मात्र त्यांनाही अकोल्याच्या बाहेर पडता येईनासे झाले. अशा स्थितीत बसप सशक्त पर्याय ठरू शकतो. तूर्तास इतकेच म्हणता येईल की, मायावती यांच्या सभेला जी लाखोची गर्दी जमली होती. त्यापैकी किती जण आपले मत हत्तीला देतील यावरून महाराष्ट्रात बहुजन समाज पक्षाचे स्थान ठरणार आहे.
- विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा