मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

किती महिला स्वंयप्रेरणेने निवडणूक लढविणार ?

पलिकेमध्ये शासनाने महिलांना ५0 टक्के आरक्षण दिले आहे. स्त्री सशक्तीकरण आणि स्त्रीयांच्या उत्थानाकरिता हे आवश्यकच आहे. त्या दृष्टीने आत्ता वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड, मंगरुळपीर आणि वाशिम या नगर पालिकेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नगरसेवक दिसणार आहेत. पण, होऊ घातलेल्या नगर पालिकेत किती महिला स्वंयप्रेरणेने निवडणूक लढविणार आहेत, हा चिंतनाचा विषय बनला आहे.
नगरपालिका निवडणुकीकरिता अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. ५0 टक्के जागा या महिलांकरिता राखीव झाल्या आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक पुरुषांचा हिरमोड झाला असून, काही करून सत्ता काबीज करायची, या लालसेने त्यांनी आपली पत्नी, आई, बहीण, भावजय अशा जवळच्या स्त्रीयांना निवडणुकीत उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात उतरणार्‍या बहुतांश स्त्रीया यापूर्वी कधीच राजकारणात नव्हत्या; पण केवळ आपला पती, भाऊ, मुलगा, दीर किंवा इतर नातलग पुरुषांना आपल्या पदराआड राजकारण करता यावे, यासाठी त्या निवडणूक लढविणार आहेत.
यामध्ये त्यांना स्वंयप्रेरणा नाही. सहाजिकच नगरसेवक झालेल्या या स्त्रियांच्या पदाचा कारभारही त्यांचे नातलग पुरुषच पाहणार आहेत. त्यामुळे स्त्री नगरसेवक केवळ बुजगावणेच राहणार आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या कार्यामुळे स्त्रीयांना शिक्षणाची दारे उघडी झाली आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थेत ५0 टक्के आरक्षण मिळाले आहे. हे व्हायलाच हवे. मात्र, अजूनही स्त्रीकडे चूल आणि मूल या नजरेनेच पाहिले जाते. ही बाब नाकारून चालणार नाही. याचीच प्रचिती नगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर येत आहे.
केवळ महिलांकरिता जागा राखीव झाल्याने आपल्या ऐवजी आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उभे करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे महिला आरक्षणाचा फायदा काय, हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
अनेक प्रमुख राजकीय पक्षांचे स्वतंत्र महिला आघाडी कक्ष आहेत; पण या महिला आघाडी कक्षाचे संघटन आहे का? त्यांच्याकडे कार्यकर्त्या महिलांची संख्या किती आहे, शहरातील किती वॉर्डात, प्रभागात या महिला आघाडीच्या शाखा आहेत. त्यांचे आतापर्यंत मेळावे, बैठक, सभा असे पक्षांतर्गत कार्यक्रम झाले का, याचाही विचार राजकीय पक्षांनी करणे नितांत गरजेचे झाले आहे; अन्यथा यापुढे नगरसेवक झालेल्या महिला या केवळ बोलक्या बाहुलीतील खेळाप्रमाणे असतील आणि जागतिक स्पध्रेत महिलांचे सशक्तीकरण केले म्हणून देश केवळ कागदोपत्रीच छाती फुगवन बसेल. एवढे मात्र निश्‍चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा