शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

रामदास स्वामी

लग्नाची सारी तयारी झाली होती, मंगलाष्टका म्हटल्या जात होत्या. ‘शुभमंगल सावधान’ चा घोष झाला आणि हातात वरमाला घेऊन उभा असलेला नवरदेव मांडवातून धूम ठोकून पळाला. खूप शोधाशोध झाली; पण तो काही सापडला नाही. पुढे हाच युवक रामदास स्वामी, या नावाने प्रसिद्ध झाला. ‘दासबोध’सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला, ‘मनाचे श्लोक’ ही त्यांची कालातीत अशी व्यवहारज्ञानाची देणगी आहे. आजही समर्थ रामदासांचे व्यक्तिमत्त्व अनेक कारणांनी चर्चेत
असते; पण त्यांनी लग्न मंडपातून पलायन केल्यामुळे त्यांच्या वाग्दत्त वधूचे पुढे काय झाले, हे कधीच वाचनात आले नाही. प्रभू रामचंद्राबरोबर वनवासामध्ये सीतामाई होत्या; पण बंधू लक्ष्मणाबरोबर त्यांची पत्नी नव्हती. तिने पतीचा विरह बारा वर्षे सहन केला. कवी मैथिलीशरण गुप्त यांनी त्या ऊर्मिलेच्या मानसिक आंदोलनावर ‘साकेत’ हे महाकाव्य लिहिले; पण रामदासांची न झालेल्या पत्नी मात्र उपेक्षितच राहिली. रामदासांच्या होऊ घातलेल्या या दुर्दैवी वधूचे पुन्हा लग्न ठरले काय? त्या काळात प्रबळ असलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत तिला कशी वागणूक मिळाली की तिने आत्महत्या केली? नेमकी काय झालं असेल त्या युवतीचं...
 
- विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम


Vikas V. Deshmukh
Karda, Risod, washim

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा