सध्या सबंध महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील कार्यकत्र्यांना लक्ष्मण मानेंच्या क्रुरकृत्यामुळे शरमेने मान खाली घालावी लागत आहे. शासनासोबत राहून आणि व्यवस्थेशी जुळवून घेतल्यामुळे माने यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. शिवाय दोन वेळा विधान परिषदेतही पाठविण्यात आले. असे असताना त्यांनी स्त्रीदास्य मुक्ती म्हणत स्वतःच महिलांचे शोषण केले, असा आरोप होत आहे. दरम्यान, त्यांनी आश्रम शाळांच्या अनुदानातून आपले बँक बॅलन्स वाढविले. आता त्यांच्यावरील आरोपामुळे ते कुठे लपले आहेत याचा कुणालाच थांगपत्ता नाही. या उलट सातत्याने सरकारच्या विरोधात बोलणा-या आणि हजारो वर्षांपासून दलित, आदिवासी, श्रमिक यांच्या मेंदूला लावलेले टाळे आपल्या कलेच्या माध्यमातून खोलणा-या कबीर कला मंचच्या शाहीर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळी या गुणी आणि ‘विद्रोही' कलाकारांवर ते नक्षलवादी असल्याचा संशय घेतला जात आहे. यामुळेच व्यथित होऊन या दोन्ही कलाकारांनी मंगळवारी (दि.२ एप्रिल) स्वतःला अटक करून घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे निश्चितच डाव्या चळवळीत काम करताना ते ‘उजवे' ठरले आहेत. गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे हे योद्धे आहेत. त्यांचा लाल सलामचा सूर्य आता अजून प्रखरतेने तळपळणार आहे. विशेष म्हणजे शाहीर शीतल साठे ही सहा महिन्यांच्या गरोदर आहे.
सचिन आणि शीतलचा खरोखरच नक्षलवादी चळवळीला पाठिंबा आहे की नाही, हे पोलिस तपासात उघड होईलच; पण या पोरांनी कधी हातात बंदूक घेतली नाही. घेतली ती लेखणी आणि ढोलकी. ढोलकीवर थाप देऊन ते पाड्या-पाड्यावर, बेड्या-बेड्यावर बाबासाहेबांचे, भगतसिंगाचे, महात्मा फुल्यांचे आणि माक्र्सचे विचार पोहोचविण्याचे काम करीत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ‘घुंगराची काठी रं दादा सावकाराच्या माथी हानङ्क म्हणत स्वाभिमान पेरत आहेत. ‘ये भगतसिंग तू जिंदा है' असे सांगत देशप्रेम जागं करीत आहेत.
‘रामाच्या राज्यात ह्या रोज शंभूक मरतो । शूद्र एकलव्याचा कुणी अंगठा खुडतो कुणी अंगठा खुडतो बळी पाताळी गाडतो । डोळे शुद्रांचे फोडतो। तुका वैकुंठी धाडतो।' हा इतिहास डफावर थाप मारून जागवणारा सचिन माळी नक्षलवादी ठरतो. त्याच्या खांद्याला खांदा भिडवून शीतल साठे ‘या रे खुळ्या जमिनीत क्रुर व्यवस्था नांदतेङ्क असे सांगत त्याला सोबत करते आणि ही क्रांतिकारी जोडी आज गुन्हेगार ठरते डोके सुन्न झालेय. त्यामुळेच काही प्रश्न उपस्थित झालेत. आपल्या हक्काबद्दल लोकशाही मार्गाने गाणे म्हणणे, कविता-लेख लिहिणे, पथनाट्यातून जागल करणे आणि बाबासाहेब, फुले, भगतqसग यांचे तत्त्वज्ञान कवनांच्या माध्यमातून सांगणे म्हणजे नक्षलवाद का? आणि दुसरीकडे इतर धर्मवादी खुलेआम हातात नंग्या तलवारी नाचवून माणसांच्या कत्तली करू, असे बोलतात. भडकाऊ भाषणे देऊन शहरा-शहरांत दंगली माजवतात, जातीय-धर्मीय वक्तव्ये करून आणि लोकांना भडकावून एकमेकांचे गळे सरेआम कापू शकतात; पण क्रांतिगीते/विद्रोही गीते गाऊन, इथल्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढले की तुम्ही चक्क नक्षलवादी ठरता ? अजब आहे हे सरकार ? पुरोगामी महाराष्ट्रातील हा कुठला न्याय?
मुळात कबीर कला मंच ही संघटना कलाप्रेमींची आहे. झोपलेल्यांना जागे करणे हे कलाकारांचे प्रमुख काम आहे याची जाण या कलाकारांना आहे. ते मनोरंजन करीत नाहीत तर झापड असलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात. खैरलांजी हत्याकांडानंतर कबीर कला मंचने राज्यात सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दलित, शोषित, असंघटित कामगारांना एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती केली.त्यात शाहीर शीतल साठे व माळी यांचा सहभाग होता. त्याचवेळी एटीएसने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथून नक्षलवादी विचारांचा, साहित्याचा प्रचार व प्रसार करणाèया कार्यकत्र्यांची, शाहीर, कलाकारांची धरपकड सुरू केली.
यात केवळ शीतल आणि सचिन हे दोघेच काम करीत नाहीत तर शोषित, पीडित कुटुंबामध्ये जन्माला आलेले अनेक तरुण-तरुणी यात आहेत. ही सगळी मंडळी पुणे-मुंबई परिसरातील आहे. यापैकी शीतल ही २००२ मध्ये कबीर कला मंचमध्ये सहभागी झाली. ती उत्तम गायिका आणि कवयित्री आहे तर सचिन हासुद्धा लेखक, कवी आहे. ‘गुलाम नाही योद्धे पैदा होताहेत' हा त्याचा वास्तवादी विचार मांडणारा आणि शोषण करणा-या व्यवस्थेवर कडाडून हल्ला करणारा काव्यसंग्रह २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. या संग्रहाच्या मनोगतातच त्याने म्हटले आहे, ‘ यातील कविता मूळ कवीची (म्हणजेच सचिन माळी) परवानगी न घेता छापण्यास मुभा आहे. त्याखाली कवीचे नाव छापावेच असे बंधनकारक नाही.', यातूनच आपल्या कार्याशी आणि विचारांशी तो किती प्रामाणिक आहे, याची पावती मिळते. अशांनाच ही व्यवस्था तुकारामाप्रमाणे वैकुंठी पाठविण्याचे नियोजन करीत आली आहे. झालेच कधी तर आश्रम शाळा, शिक्षण संस्था, महामंडळ, आमदारचा तुकडा देऊन त्याला लाचार केले जाते. याला इतिहास साक्षी आहे. हेच होऊ नये यासाठी अमरनाथ चंदेलिया यांच्या पुढाकाराने कबीर कला मंचची स्थापना झाली. या चळवळीत अनेक जण पूर्ण वेळ आहेत. ही मंडळी आपल्या जवळ कधी बंदुक वा स्फोटके ठेवत नाहीत. त्यांच्याजवळ आहेत अन्याय निवारण्याचे विचार. या विचारांमुळे यापुढे गुलाम नाही तर शिवबासारखे योद्धेच पैदा होतील. त्यामुळे शोषण व्यवस्था हादरून जात आहे. हेच या व्यवस्थेला नको आहे. त्यामुळेच ही पोरं नक्षलवादी असल्याचा आरोप केला जात आहे. (तिकडे ख-या नक्षलवाद्यांसमोर हेच सरकार हतबल झाले)
यांच्यापैकीच एक असलेला मुंबईच्या भायखळ्यातील साहित्यिक सुधीर ढवळे याच्यावरही २०१० मध्ये नक्षलवादी असल्याचा आरोप ठेवला गेला. चंद्रपूर येथे त्याला एका साहित्य संमेलानातून अटकही केली गेली. आजही त्याच्यावरील आरोप निश्चित नाही; पण केवळ संशयाच्या आधारावर तो कारागृहात खीतपत पडून आहे. असेच शंतनू कांबळे याच्याही बाबतीत झाले होते. या दोघांप्रममाणेच शीतल आणि सचिन यांच्यावर ही वेळ आली आहे. या शिवाय थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह नागेश चौधरी, यशवंत मनोहर यांच्यावर अशाच प्रकारचा आरोप आपल्या पोलिसांनी केला होता. त्यावेळी खुद्द आर. आर. पाटील यांना माफी मागावी लागली होती. तिच चूक पुन्हा केली जात आहे. शासनाची दडपशाही अशीच सुरू राहिल्यास खरोखर महानगरातील दलित आदिवासी नलक्षवादी होतील; पण असे होऊ नये हे टाळणे शासनाच्याच हाती आहे. तूर्त या दोन कॉम्रेडला जय भीम !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा