सध्या सबंध महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील कार्यकत्र्यांना लक्ष्मण मानेंच्या क्रुरकृत्यामुळे शरमने मान खाली घालावी लागत आहे. शासनासोबत राहून आणि व्यवस्थेशी जुळवून घेतल्यामुळे या मानेला पद्मश्री पुरस्कार मिळाला. शिवाय दोन वेळा विधान परिषदेतही पाठविण्यात आले. असे असताना या मानेने स्त्रीदास्य मुक्ती म्हणत स्वतःच महिलांचे शोषण केले. आश्रम शाळांच्या अनुदानातून आपले बँक बॅलन्स वाढविले. आता त्याच्यावरील आरोपामुळे तो कुठे लपला याचा कुणालाच थांगपत्ता नाही. या उलट सातत्याने सरकारच्या विरोधात बोलणा-या आणि हजारो वर्षांपासून दलित, आदिवासी, श्रमिक यांच्या मेंदूला लावलेले टाळे आपल्या कलेच्या माध्यमातून खोलणा-या कबीर कला मंचच्या शीलत साठे आणि सचिन माळी या गुणी आणि ‘विद्रोेहीङ्क कलाकारांवर ते नक्षलवादी असल्याचा संशय घेतला जातो. यामुळेच व्यथित होऊन या दोन्ही कलाकारांनी मंगळवारी (दि.२ एप्रिल) स्वतःला अटक करून घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे निश्चितच डाव्या चळवळीत काम करताना ही दोघे ‘उजवे' ठरली आहेत. त्यांच्या या बेधडक निर्णयामुळे दोघा कॉम्रेडला जय भीम !त्यांचा खरोखरच नक्षलवादी चळवळीला पाठिंबा आहे की नाही, हे पोलिस तपासात उघड होईलच; पण या पोरांनी कधी हातात बंदूक घेतली नाही. घेतली ती लेखणी आणि ढोलकी. ढोलकीवर थाप देऊन ते पाड्या-पाड्यावर बेड्या-बेड्यावर बाबासाहेबांचे, भगतqसगाचे आणि महात्मा फुल्यांचे विचार पोहोचविण्याचे काम करीत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ‘घुंगराची काठी रं दादा सावकाराच्या माथी हान' म्हणत स्वाभिमान पेरत आहेत. ‘ये भगतसिंग तू जिंदा है' असे सांगत देशप्रेम जागं करीत आहेत.मग आपल्या हक्काबद्दल लोकशाही मार्गाने गाणे, कविता, लेख यांच्या माध्यमातून बोलणे म्हणजे नक्षलवादी का? बाबासाहेब, फुले, भगतसिंग यांचे तत्त्वज्ञान कवणांच्या माध्यमातून सांगणे म्हणजे नक्षलवादी काय? आणि दुसरीकडे सत्ताधा-यांची हुजेरिगिरी करणे. त्यांना दलित-आदिवासींचे गठ्ठा मतदान मिळून देणे अशी कामे करून थुंकी चाटणा-या मानेला मानाचा पद्मश्री व आमदारकी तर या उलट दलित, श्रमिक यांच्या उद्धारासाठी आपलं अख्खं आयुष्य वाहून घेणा-यांना या उच्चशिक्षित तरुणांच्या माथी नक्षलवादी असल्याचा आरोप. शिवाय त्यांच्या विद्रोही ‘मासिका'वर बंदीचीही मागणी. पुरोगामी महाराष्ट्रातील का कुठला न्याय?मुळात कबीर कला मंच ही संघटना कलाप्रेमींची आहे. झोपलेल्यांना जागी करणे हे कलाकारांचे प्रमुख काम आहे याची जाण या कलाकारांना आहे. ते मनोरंजन करीत नाहीत तर झापड असलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात. यात केवळ शीतल आणि सचिन हे दोघेच काम करीत नाहीत तर शोषित, पीडित कुटुंबामध्ये जन्माला आलेले अनेक तरुण-तरुणी यात आहेत. ही सगळी मंडळी पुणे-मुंबई परिसरातील आहे. यापैकी शीतल ही २००२ मध्ये कबीर कला मंचमध्ये सामील झाली. ती उत्तम गायिका आणि कवयित्री आहे तर सचिन हासुद्धा लेखक, कवी आहे. ‘गुलाम नाही योद्धे पैदा होताहेत' हा त्याचा वास्तवादी विचार मांडणारा आणि शोषण करणा-या व्यवस्थेवर कडाडून हल्ला करणारा काव्यसंग्रह २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. कबीर कला मंचची स्थापना अमरनाथ चंदेलिया यांच्या पुढाकाराने झाली. यांच्यापैकीच एक असलेला मुंबईच्या भायखळ्यातील साहित्यिक सुधीर ढवळे याच्यावरही २०१० मध्ये नक्षलवादी असल्याचा आरोप ठेवून चंद्रपूर येथे त्याला अटक केले. आजही त्याच्यावरील आरोप निश्चित नाही; पण केवळ संशयाच्या आधारावर तो कारागृहात खीतपत पडून आहे. त्याच्या प्रमाणेच या दोन पोरांवर आता असेच खीतपत पडून राहण्याची वेळ येईल का? या शिवाय थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यावर अशाच प्रकारचा आरोप आपल्या पोलिसांनी केला होता. त्यावेळी खुद्द आर. आर. पाटील यांना माफी मागावी लागली होती. तिच चूक पुन्हा केली आहे. शासनाची दडपशाही अशीच सुरू राहिल्यास खरोखर महानगरातील दलित आदिवासी नलक्षवादी होतील; पण असे होऊ नये हे टाळणे शासनाच्या हाती आहे.
- विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम.
Vikas Deshmukh
Karda, Risod, Washim
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा