शुक्रवार, ३ मे, २०१३

मोहरलेला चंद्रच !


 
पल्या माय मराठीला ज्ञानोबा-तुकोबांपासून अनेक साहित्यिकांनी समृद्ध केले. त्यांच्याच परंपरेतील महात्मा फुले दीन-दलितांसाठी अखंडमधून भांडले. अण्णाभाऊंनी समतेचे विचार मांडले. एकूणच काय तर भंगलेल्यासाठी साहित्यच एकीची कळ झाले. खचलेल्यांसाठी यशाचे
बळ झाले; पण दुर्दैवाने आताच्या काळात स्वजातीतील अनुभव सोडून इतर जातीतील शोषित, पीडितांच्या व्यथेला वाचा फोडणारे साहित्यिक दुर्मीळ झालेत. बाबाराव मुसळे (  Babarao Musale ) हे त्यातीलच एक. आडवळणातील ब्रह्मा (ता. वाशीम) हे छोटेसे गाव ते पुणे विद्यापीठातील बीए, एमएच्या अभ्यासक्रमात समावेश असा त्यांचा प्रवास स्वप्नावतच आहे.
बाबारावांचा जन्म १० जून १९४९ ला वाशीम जिल्ह्यातील मैराळडोह (ता. मालेगाव) या त्यांच्या आजोळी झाला. वडिलांचे गाव ब्रह्मा. त्यामुळे ब्रह्म्यातच त्यांचे बालपण गेले. त्यांची आई कलावती अंगठाबहाद्दर. वडील गंगाराम यांना सही पुरतीच अक्षर ओळख. एकूणच काय तर दोघांनाही शिक्षणाचा गंध नव्हता आणि गावात कुणी फार शिकलेलेही नव्हते. त्यांचे वडील गुरुदेव सेवा मंडळाच्या तालमीत तयार झालेले. वारकरी संप्रदायात रमणारे. विठ्ठलासारखेच भोळे. त्यांचा हाच भोळेपणा बाबाराव यांच्या अंगी भिनला. त्यांची आई मात्र कणखर. व्यवहारी; परंतु आईचा व्यवहारीपणा त्यांना घेताच आला नाही. स्वाभाविकच चार दशकं ते साहित्यिकांच्या गटा-तटाच्या राजकारणापासून दूरच आहेत. इयत्ता पाचवीपर्यंत ते गावातीलच जिल्हा परिषदेत शाळेत शिकले. पुढे जवळच्याच अन
सिंग येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच. निसर्गाची कृपा झाली तर घरात धान्यांची -हासच -हास असायची नाहीतर उभ्या पिकाचा रास व्हायचा. असे असताना त्यांच्या आईवडिलांनी मुसळे यांना बाहेरच्या उन्हाची झळ बसू दिली नाही. आता शांत, संयमी वाटणारे बाबाराव हे लहानपणी फार खोडकर होते. स्वभावात मुजोरी होती. मोठ्या मुलांशी पंगा घेत; पण शिक्षणातही हुशार होते. दहावीपर्यंत त्यांचा पहिला किंवा दुसरा नंबर कायम असायचा. याच काळात त्यांना कवितेची आवड निर्माण झाली. मो. अं. मुळावकर, बी. जे. वाळली हे त्यांचे शिक्षक वर्गात कविता म्हणून दाखवत. मग मुसळ्यांनाही कविता लिहावशी वाटे. त्यातूनच त्यांनी वाचन वाढविले. पुढे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी ते परभणी जिल्ह्यात नोकरीवर असलेल्या त्यांच्या थोरल्या भावाकडे गेले. परभणीच्या शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित झाला. पहिल्यांदाच त्यांनी मोठे शहर पाहिले. त्यामुळे स्वभावात थोडा बुजरेपणा आला. नव्या शहरी वातावरणामुळे एकलकोंडेपणा वाढला; मात्र कवितेवर जडलेले प्रेम कायमच होते. आपल्याला कवी व्हायचेच याचे जणू त्यांनी व्रतच घेतले होते. त्यांच्या भावाची बदली चुडावा (ता. वसमत) येथील शाळेत झाली. या शाळेत खूप मोठे ग्रंथालय होते. भुकेल्या पाखरांना दाणे दिसावे आणि त्यांनी त्यावर ताव मारावा असेच बाबारावांच्या बाबतीत झाले. त्यांनी या ग्रंथालयातील सर्वच पुस्तके झापाटल्यासारखी वाचून काढली. विविध लेखन प्रकार अभ्यासले. त्या काळी अनेक लेखकांच्या नाखाखाली बीए ही पदवी असायची. ती वाचून बीए होणाराच साहित्यिक होऊ शकतो, असे काहीसे त्यांचे ठाम मत झाले. तर जो कोणावर तरी प्रेम करू शकतो तोच कविता लिहू शकतो, असे गंमतीशीर ठोकताळेही त्यांनी निश्चित केले; पण बाबाराव यांच्यावर कुणी प्रेम करावे, असे त्यांच्यात काहीच नव्हते. त्यांचे हडकुळलं शरीर. साडेचार फूट उंची. त्यामुळे कुठली मुलगी त्यांच्याकडे आकर्षित होणार? मात्र मुसळे यांनी कवी होण्याचे ध्येयच बाळगले होते आणि त्यासाठी प्रेमात पडावे लागेल हा समजही दृढ करून घेतला. तसे ते प्रेमात पडलेही; परंतु वर्गातील वा शेजारच्या मुलीवर नव्हे तर चक्क ड्रिम गर्ल हेमा मालिनीच्या. तिलाच प्रेयसी माणून एकलव्यासारखे त्यांनी आपला काव्यप्रवास सुरूच ठेवला. या काळात अकोल्याच्या ‘स्वराज्य' पाक्षिकात पहिली कविता तर नाशिकच्या ‘कृषीसाधना' या मासिकात पहिली कथा छापून आली. पुढे कथांमागून कथा छापून येऊ लागल्या. त्यावेळी परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात कार्यरत असलेले डॉ. प्रभाकर मांडे यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून अनियतकालिकांच्या चळवळीबद्दल कळाले. त्यानंतर नावाजलेले नियतकालिके, अनियतकालिके यात त्यांच्या कथा येऊ लागल्या.
१९८३ मध्ये पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने तिस-या पिढीची ग्रामीण कादंबरी या स्पर्धेचे आयोजन केले. त्यासाठी बाबाराव यांनी ‘हाल्या हाल्या दुधू दे' ही कादंबरी पाठविली आणि नवल ! महाराष्ट्रातील ४१ हस्तलिखितांमधून ही तिस-या पिढीची एकमेव कादंबरी ठरली. त्यामुळेच मराठी साहित्य क्षेत्रात बाबाराव मुसळे हे नाव एकाएकी चर्चेत आले; मात्र या कादंबरीमुळे त्यांना अचानक प्रसिद्धी मिळाली असे नाही. त्यांच्या आयुष्यात सहजासहजी यशाचे माप सांडले असेही नाही. त्यामागे कठोर मेहनत आणि दांडगा अभ्यास हेच कारण आहे. दरम्यानच्या काळात मुसळे बीएससी, एमएससी बीएड झाले. वाशीम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले आणि त्याच शाळेतून सेवानिवृत्त झाले. त्यांची साहित्य लतिका उत्तोरत्तर बहरतच गेली. १९८५ साली त्यांची ‘हाल्या हाल्या दुधू दे' ही कादंबरी आली. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजेच १९९५ ला त्यांची ‘पखाल' ही दुसरी कादंबरी आली. पु. ल. देशपांडे यांनी ‘पखाल'चे विशेष कौतुक केले. पुढे बाबाराव मुसळे यांची ‘झुंगु लुखू लुखू', ‘मोहोरलेला चंद्र', ‘नगरभोजन' हे कथासंग्रह आणि ‘पाटीलकी', ‘दंश', ‘स्मशानभोग' या कादंब-या प्रकाशित होत राहिल्या तर ‘वारूळ' या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात खळबळ निर्माण केली. ‘इथे पेटली माणूस गात्रे' हा त्यांचा ‘काव्याग्र'ने प्रकाशित केलेला एकमेव कविता संग्रह आहे. त्यांच्यावर अनेक मानांच्या पुरस्कारांचा वर्षाव होतच आहे. यात दोन वेळा राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कारांचाही समावेश आहे; पण साहित्यिक म्हणून नाव होत असताना त्यांनी आपल्या शिक्षिकीधर्माकडे कधी दुर्लक्ष केले नाही. आज त्यांचे असंख्य विद्यार्थी अनेक उच्चपदांवर कार्यरत आहेत. त्यामुळेच राज्यशासनाने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणूनही गौरव केलेला आहे.
मितभाषी.. आभाळाएवढं कर्तृत्व तरीही मातीतील माणसांविषयी तळमळ, वागण्यातील नम्रपणा, मोठेपणा कुठेच बडेजाव नाही, खूप साधेपणा, भेटणा-या प्रत्येकाला आपुलकीने बोलणे, नवोदितांना तन्मतेने मार्गदर्शन करणे ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. वाशीम जिल्ह्यात नव्याने लिखाण करणा-यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी २०१०-११ मध्ये स्वखर्चाने कवितेचा महासंग्राम ही अभिनव काव्यस्पर्धा राबविली. त्यातून एका कवितेला पुरस्कार देऊन उल्लेखनीय कवींच्या कवितांचा विष्णू जोशींच्या मदतीने ‘हंबर' हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित केला.
मुसळे यांचा ग्रामीण व्यवस्थेचा दांडगा अभ्यास आहे. दलित, आदिवासी, श्रमिक व बारा बलुतेदारांना त्यांनी आपल्या कथेत सामावले. ‘पखाल'मध्ये कोळी बांधवांचे संघर्षशील जीवन रेखाटले. ‘पाटीलकीमध्ये आदिवासींची होणारी पिळवणूक अधोरेखित केली. ‘वारूळ'मध्ये मातंग समाजाची व्यथा कथा मांडली. ‘स्मशानभोग'मध्ये स्मशानजोगी समाजातील व्यक्ती कशा जगातात हे समाजासमोर आणले. त्यांनी साहित्य क्षेत्राच्या कुठल्याच वादाशी संबंध ठेवला नाही. आदिवासी, दलित-श्रमिकांविषयी त्यांना तळमळ आहे. म्हणून त्यांच्या नायक-नायिका त्याच समाजातील आहेत. ते कधी रंजनवादी साहित्य लिहित नाहीत. समाजाची समीक्षा करणारे त्यांचे साहित्य आहे. म्हणूनच ते साहित्य क्षेत्रातच नव्हे तर समाजिकक्षेत्रातही अंधारलेल्यांसाठी ‘मोहरलेला चंद्रचङ्क आहेत.
- विकास देशमुख

करडा, ता. रिसोड, जि. वाशिम

मोबा. ९८५०६०२२७५
 
Vikas V. Deshumkh
Karda, Risod, Washim

1 टिप्पणी: