शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

जातीव्यवस्थेमुळे आईला विकावा लागला काळजाचा तुकडा

राजस्थानातील झालावाड गाव. या गावात काही भटकी कुटुंबं पालं टाकून राहतात. यातील एका कुटुंबात एक चुणचुणीत मुलगी. तिचं वय झोपाळ्यावाचून झुलण्याचं. मंदिरांतील घंट्या अन् मैत्रिणीसोबत खेळण्या-कुदळण्याचं; पण तिचं कुटुंब अठराविश्व दारिद्य्रात खितपत पडलेलं. दिवस उजाडला की दोन वेळच्या जेवणाची भ्रांत या कुटुंबाला पडते. दारिद्य्रीकाठच्या यातना भोगणा-या या कुटुंबातील तिच्या आईला जात पंचायतीने एका प्रकरणात ४ लाख ५० हजार रुपयांचा दंड भरण्याचं फर्मानं सोडलं. ही रक्कम भरली नाही तर जातीतून बाहेर काढण्याची धमकीही दिली. तिचं आणि तिच्या कुटुंबाचं पोटं तळहातावर. त्यामुळे ऐवढी मोठी रक्कम ती कुठून आणणार... आणि ही रक्कम भरली नाहीच तर? पंचायत जाती बाहेर काढेलच शिवाय अजून दुसरी शिक्षासुद्धा देईल, या भीतीनेच आणि जातीच्या खोट्या अभिमानेही एखाद्या पाळीव जनावराप्रमाणे आपल्या कोवळ्या मुलीचा तिने जाहीर लिलाव केला. यात या मुलीला साडे सहा लाख रुपये बोली मिळाली. खरिदार मुलीला घेऊन जात असताना तिने त्यांच्या हाताला झटका देऊन धूम ठोकली. ती एका हॉटेलमधील टेबलामागे लपली. हुमसूहमसू रडू लागली. हॉटेल मालकाला सशंय आला. त्याने या बाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस आले. मुलीने सारा प्रकार सांगितला. खरिदार तिला मुंबईला घेऊन जाणार होते, अशी कैफियत या चिमुकलीने पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी तिची आई आणि खरिदारांना अटक केली आहे.
एकीकडे सारा देश ६४ व्या प्रजासत्ताक दिनाची तयारी करत असताना काळजाची चाळणी करणारा हा प्रकार राजस्थानातील भटक्यांच्या पालावर घडला. येथील व्यवस्थेने त्यांच्यावर पिढ्यान्पिढ्यानपासून लादलेली लाचारी, जातीचा खोटा अभिमान, स्वतःला समांतर न्यायव्यवस्थाच समजणारी क्रूर जात पंचायत आणि गरिबी यामुळेच हे घडलं. यात या मातेचा दोष आहे असे मी म्हणत नाही. तर तिच्यावर अन्याय केला तो येथील मूळ व्यवस्थेनं. या व्यवस्थेमुळे तिच्या आईला तिची विक्री करावी लागली. व्यवस्थेमुळेच त्यांच्यावर भटके म्हणून जगण्याची वेळ आली. त्यामुळेच त्यांना सामाजिक प्रतिष्ठा नाही. सामाजिक प्रतिष्ठा नसल्याने पैसा नाही. परिणामी शिक्षण, आरोग्य अन् घरसुद्धा नाही. या दलदलित हे भटके फसले आहेत. आज आपली लोकशाही ६४ वर्षें झाली तरीही दलित, भटके, आदिवासी यांचं जीवन आपण अजूनही सुधारू शकलो नाही, हेच यातून दिसून आले आहे. हजारो वर्षांपूर्वी मेंदूत पेरलेलं शोषणाचं तणकट अजूनही दणकट अवस्थेत आहे, हीच शोकांतिका आहे.

 - विकास वि. देशमुख

   करडा, रिसोड, वाशीम.
                                                                                                                       

                                                                                                                           Vikas Deshmukh 

                                                                                                                        Karda, Risod, Washim 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा