शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

सत्यनारायणाचा प्रसाद खाल्ल्याने ८६ जणांना विषबाधा

महाराष्ट्रात सगळीकडे सत्यनारायणाची पूजा केली जाते; या पूजेमुळे आयुष्य सुखी होते. संतती नसलेल्यांना संतती लाभ होतो, असा समज ही पूजा करणा-यांचा आहे. त्यामुळेच आता या पूजेचे लोण हळूहळू इतर राज्यांतही पोचू लागले आहे. त्यातूनच उत्तर प्रदेशमधील हैदरगढ पोलिस ठाण्याअंतर्गत येणा-या कान्हीपूर (जि. बाराबंकी) या गावातील लालू अवस्थी या व्यक्तीने आपल्या मुलगा होऊ दे असा नवस केला. गंमत म्हणजे त्याला सत्यनारायणाच्या नवसाने (त्याच्या मुळे नव्हे) मुलगा झाला. त्या आनंदात त्याने ठरल्याप्रमाणे ३१ जानेवारीला घरी सत्यनारायणाची पूजा केली. प्रसादासाठी आप्तस्वकियांना आंमत्रित केले. आपण प्रसाद घेण्यासाठी गेलो नाही तर उगाचच ‘कलावतीङ्कप्रमाणे सत्यनारायणाचा आपल्यावरही कोप होईल, या भीतीने तर काही जण एक वेळच्या जेवणाचे भागेल. शिवाय मिष्टान्न खायला मिळेल, या हेतूने प्रसाद सेवण करण्यासाठी अवस्थी याच्या घरी गेले. पूजा झाली. आलेल्या प्रत्येकाने दर्शन घेतले. काहींनी देवाच्या पुढे पैसेसुद्धा टाकले. त्यानंतर रांगेत बसून ८६ जणांनी प्रसाद घेतला. त्यानंतर तास-दीड तासातच या सगळ्या भाविकांना हगवण आणि उलटीचा त्रास सुरू झाला. लागलीच यजमानांसगट पोथी वाचणा-या भटजींचीही ‘फाटली'. मग मिळेल त्या वाहनाने सगळ्यांना दवाखान्यात नेण्यात आले. काही जण स्वतःच गेले. प्राथमिक उपचारानंतर यातील ७६ भाविकांना घरी पाठविण्यात आले तर १० भाविक अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत. फुकटंच खायला मिळेल आणि सत्यनारायण आपल्याला पावेल या (अंधळ्या) श्रद्धेने गेलेल्या या सगळ्यांनाच चांगलाच ‘प्रसाद' मिळाला.
खरं तर सत्यनारायणाची कथा जशी प्राचिन नाही तशी ती भारतभरसुद्धा नाही. या कथेचा हेतू त्याची प्रतिष्ठा, प्रतिज्ञेचे महत्त्व आणि धर्माविषयीचा आदर वाढविणे असा सांगितले जातो; पण यातील एकाही मूल्याची पेरणी ही कथा करीत नाही. उलट या कथेमुळे सत्याची प्रतिष्ठा वाढविण्याऐवजी लोभी वृत्तीच वाढत आहे. मलाच मिळावे, असे वाटणारे ती आपल्या घरी वाचतात. शिवाय धर्माचा आदर वाढण्याऐवजी या कथेमुळे धर्माची भीतीच अधिक वाटते. तुम्ही जर प्रसाद सेवण केला नाही qकवा कथा वाचली नाही तर तुमचे वाईट होईल, अशी धमकीच या कथेतून सरळ-सरळ दिली आहे. एकूणच काय तर या कथेची जर समीक्षा करायचे झाले तर तिच्या लेखकाची आणि ती वाचणा-यांची विकृत मानसिकताच यातून दिसते. त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धीने विचार करायलाच हवा. सत्यनारायणाची कथा वाचल्याने वाचणा-यांचे जर खरंच भले होत असेल तर या ८६ भाविकांना त्याच सत्यनारायणाने हगवण का लावली? त्याच्या प्रसादामुळे बुडलेले जहाज वर येते; पण तोच प्रसाद खाणा-या १० जण मरणासन्न का झाले? याच विचार ही पोथी वाचणा-यांनी करायलाच हवा.
०००००००००००००
- विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम.
०००००००००००००

Vikas V. Deshmukh
Karda, tq, Risod, dist Washim

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा