सोमवार, २९ जून, २०१५

प्रसंग दुसरा

अकोला शहरातील एक उच्चभ्रू वस्ती. त्या वस्तीतील एक पॉश घर. दारापुरे फाटक. फाटकाआड चारचाकी. घरातील सर्वच उच्चशिक्षित. बाजूलाच चहा टपरी. वेळ सकाळी ८ ते ९ च्या सुमाराची. टपरीवरील बाकावर कृषी विद्यापीठातील मुला-मुलींचा गलका सुरू. त्या घरापुढं एक गाय आली. तिनं फाटकाला डोकं घासलं. सुरुवातीला वाटलं तिच्या डोक्याला खाज सुटली असेल. पण, असंच तिनं दोन ते तीन वेळा केलं. बहुदा ती येथं रोजच येत असावी. बाहेर कुणी तरी आलंय याची चाहूल लागताच घरातील गृहिणीनं अर्धवट दार उघडून डोकावलं. लागलीच आत गेली. कडेवर दीड ते दोन वर्षांच्या मुलाला घेऊन बाहेर आली. हाती पोळी. फाटक उघडलं. चिमुलल्याचं डोकं गायीच्या डोक्यावर ठेवलं नि स्वत:ही तसाच नमस्कार केला. गायही लाडावली. त्या गृहिणीच्या हाताला चाटू लागली. तिनं तिच्या तोंडात पोळी भरवली. पोळी खाताच गायीनं चिमुकल्याच्या हातालाही चाटायला सुरुवात केली. तो घाबरला. परंतु, त्याची आजी की आणखी कोण असलेल्या त्या बाईंनी “काही नाही गो माताहे” म्हणत त्याचा हात ओढून गायीच्या तोंडापुढं नेला. चिमुकल्याला आता गुदगुदल्या होत होत्या. त्याला मज्जा वाटत होती. जनावर आणि मुनष्यातील हे प्रेम भारावणारचं होतं. पण, अचानक त्या ठिकाणी एक ७० ते ७५ वर्षांचा म्हातारा आला. दाढी वाढलेली. फाटके कपडे. डोळे खोपडीला भिडलेले. चालायचाही त्राण त्याच्या शरिरात नव्हता. तो गेट पुढं येऊन उभा राहिला तसे गृहिणीच्या चेहऱ्यावरील भाव बदलेले. “दान धरम करा काही तरी..” आपल्या हातातील मळकटलेली पिशवी पुढं करत अत्यंत विणवणीच्या स्वरात तो बोलला. गृहिणी काहीच बोलली नाही. पहिल्या वाक्याला जोडूनच म्हाताराच्या तोंडून दुसरं वाक्य बाहेर पडलं. “रातचं उरलेलं शियं-पाकं बी चालंल..” आता मात्र गृहिणी खवळली. “जा समोर, रोजच येतात मेल्ले ! काम करायचा कंटाळा आणि चालले भीक मागायला. चल निघ येथून.” असं म्हणत तिनं त्या वृद्धाला हाकलून दिलं. फाटक बंद करून आत गेली. वृद्ध चहा टपरी जवळ येऊन थांबला. पाच-दहा मिनिटं तिथंच रेंगाळला. त्याच्या मनातील घालमेल चहा पीत असलेल्या एका मुलानं ओळखली. “ओ संगीतबापू या बुढ्याले पोहे आन एक कटिंग दे जा.” असं म्हणत त्यानं आपल्या बिलासह त्या म्हाताऱ्याचेही बिल पे केलं नि मित्रांसोबत निघून गेला. गाय अजूनही फाटकाला डोक घासत होती. दरम्यान, पुढच्या घरातील एक गृहिणी हाती पोळी घेऊन बाहेर आली. तिला पाहाताच गायीनं आपला मोर्चा तिकडं वळवला…
- विकास विनायकराव देशमुख

मु. करडा, ता. रिसोड, जि. वाशीम 
Vikas Deshmukh Karda, Tq Risod, Distt Washim
   

प्रसंग पहिला

रात्रीची १० ते साडे दहाची वेळ. नुकताच पाऊस पडून गेलेला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले. अकोला शहरातील हिंदू-मुस्लिमबहूल भागातील एक मंदिर. महापालिकेच्या पथदिव्यांचा मनमिणत्या प्रकाशात मंदिराच्या पायाऱ्यांवर बसून दोन ते तीन म्हातारे गप्पा करत असलेले. त्यातच मंदिराचा पूजारीही. दिवसभर सायकल रिक्षा चालवून थकलेल्या अवस्थेत एक जळकटेलला, मळकटलेला ५५ ते ६० वर्षांचा वृद्ध घराच्या दिशेनं पायडल मारत जात होता. एका हातात चिलम, डोळे रस्त्याच्या दिशेनं. बहुदा गांजा ओढत असावा. हॅण्डलला एक काळी कॅरीबॅग लटकवलेली. समोरून कोण येतंय, किती वाजलेत याचं काहीही देणं घेणं त्याला नव्हतं. गांजाची झिंग आणि डबक्यात साचलेल्या पाण्यामुळं नेमकं मंदिरासमोर रस्त्यातील खड्डयाचा अंदाज त्याला आला नाही. कॅरिबॅग उसळली. खाली पडली. त्यात मांस होते. रात्री मुला-बाळांची सोय म्हणून तो घेऊन जात असावा. पण, नेमकं हेच दृश्य मंदिरासमोरील एका म्हाताऱ्यानं आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून नरजेत कैद केलं नि “अरं मंदिरापुढं गोमांस आणून टाकलया” म्हणत गलका केला. वातावरण टाईट झालं. पुजारीही खवळला. लागलीच हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आले. त्यांनी रिक्षा चालकाचं बोंकाड धरलं. त्याला पोलिस ठाण्यात नेलं. जय श्रीरामचे नारे देत आताच्या आता गुन्हा दाखल करा म्हणून गोंधळ घातला. उगाच आफत नको म्हणून पोलिसांनी ‘एनसी’ नोंदवली. कडक कारवाई केली जाईल, कत्तलखाना शोधाला जाईल, असं म्हणतं कार्यकर्त्यांची बोळवण केली. गांजांची चढलेली झिंग नि कार्यकर्त्यांचा रुद्र अवतार पाहून बिच्चारा रिक्षाचालकही आपलं म्हणणं ओरडून ओरडून सांगत अचानक गप गुमान झाला. प्रकरण पेट घेईल म्हणून रात्रभर त्याला ठाण्यातच ठेवलं. मांस परीक्षणासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी अहवाल आला, मांस कोंबडीचं आहे म्हणून. लागलीच कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं. पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. सार्वजनिक ठिकाणी आरोग्यास घातक पदार्थ फेकल्याच्या आरोपाखाली रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला. एव्हाणा त्याची झिंग उतरली. कुणीतरी नवसाचं कोंबडं कापलं तेच मांस तो घरी घेऊन जात होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करून आपण खूप मोठं सामाजिक काम केल्याच्या अविर्भावात कार्यकर्ते निघून गेले. दंगल होता होता थांबवली त्यामुळं पोलिसांनीही पाठ थोपटून घेतली. रिक्षा चालक भेदरलेल्या अवस्थेत ठाण्यातच बसून होता. काही वेळाने क्राइम रिपोर्टर आले. त्यांनी रिक्षा चालकाला नाव विचारले. तो उत्तरला, “संपत दगडू इंगळे…”
 
-विकास विनायकराव देशमुख
Vikas Deshmukh
Karda, Tq Risod, Distt Washim

रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

प्रख्यात दिग्दर्शक राबतोय काळ्या मातीत! कलावंत लीलाधर सावंत करताहेत शेती


 ‘सागर’,‘सलाखे’, ‘क्रांतिवीर’, ‘शहंशाह’ ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘अनाडी’, ‘१०० डे’ सारख्या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या १७७ चित्रपटांसह हॉलीवूडच्या चार चित्रपटांचे कला दिग्दर्शक असलेले लीलाधर सावंत चित्रपटसृष्टीतील एक बडी आसामी. या क्षेत्रातील फिल्मफेअर सारखा उच्च पुरस्कार मिळवणारा हा अवलिया सध्या वाशीम जिल्ह्यातील जउळका रेल्वे (ता. मालेगाव) या एका छोट्याशा खेड्यात काळ्या मातीत राबत आहे. लख्ख चंदेरी दुनियेला सजवून राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणारा हा कलावंत आता धरणीमातेला कोरत आपला आनंद शोधत आहे.

दैनिक दिव्य मराठीमध्ये आलेले वृत्त
177 हिंदी आणि हॉलीवूडमधील चार इंग्रजी चित्रपटांचे कला दिग्दर्शन करणाऱ्या लीलाधर सावंत (५८) यांचा वर्ष १९८८ मध्ये ‘हत्या’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव झाला. दरम्यान, ‘कामचोर’साठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. लखलखी चंदेरी दुनियेला सजवणारे सावंत यांचे हात आता शेतात राबत आहेत. कोणत्याही चित्रपटातील ‘आॅलराउंडर’ व्यक्ती म्हणजे कला दिग्दर्शक. वेशभूषा, कथा, प्रसंग, काळ, वेळ, दिग्दर्शन, अभिनय, संगीत या सर्वस्पर्शी कलेला एकरूप करून चित्रपटाला वास्तववादी बनवण्यासाठी ती राबत असते. सावंत यांनीही याच क्षेत्रासाठी आपले आयुष्य वाहून घेतले होते. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. बीएफए झाल्यानंतर कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी सैन्यदलात नोकरी पत्कारली. पाचच वर्षांत राजीनामा देऊन मुंबई येथील एका कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कामाला लागले. याच कंपनीत जउळका येथील पुष्पा देशमुख नोकरीला होत्या. ३७ वर्षांपूर्वी त्यांच्याशी त्यांंचा प्रेमविवाह झाला. सावंतांच्या घरची परिस्थिती बेताचीच तर पुष्पा यांच्या वडिलांकडे ‘देशमुखी’. त्यातल्या त्यात आंतरजातीय लग्न. त्यामुळे या लग्नाला तीव्र विरोध झाला. आपल्या चित्रकलेच्या आवडीतून त्यांनी ही नोकरीही सोडून अत्यंत कमी पैशात पोस्टर्स रंगवण्याचे काम सुरू केले. यातून त्यांना आर. बर्मन यांनी ‘बेताब’ची हवेली बनवण्याचे काम दिले. पुढे ते इप्टा नाट्य संस्थेचे सेट मोफत करून देत. या काळात सलग तीन वर्षे सहायक कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी तब्बल ४०० हिंदी चित्रपटांत काम केले. पुढे त्यांना मुख्य कला दिग्दर्शक म्हणून ‘बॉक्सर’ हा चित्रपट मिळाला. तेव्हापासून ते वर्ष २००८ पर्यंत त्यांच्या अनेक चित्रपटातील कला दिग्दर्शनाचा आलेख वाढत राहिला. सैन्यदल, सुरक्षा अधिकारी, पोस्टर रंगवणे, सेट तयार करणे, सहायक कला दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिका समर्थपणे वठवत कला दिग्दर्शक म्हणून उंची गाठलेल्या सावंतांना अचानक ही ‘भूमिका’ सोडावी लागली आणि अनपेक्षित एक्झिट घेत त्यांनी एक खेडं गाठून नवीन भूमिका स्वीकारली.
‘पनाह’ची केली निर्मिती
सावंत हे ‘पनाह’ या चित्रपटाचे निर्माता आहेत. या चित्रपटात नसरुद्दीन शहा मुख्य भूमिकेत आहेत. आता ‘वासुदेव’ या कलात्मक मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
..
मराठीसाठी काम करता आले नसल्याची खंत
आपण मराठी असूनही एकाही मराठी चित्रपटासाठी काम करता आले नसल्याचे शल्य सावंत यांना अजूनही बोचत आहे. हिंदीतील कला दिग्दर्शक जास्त खर्च करायला लावतात, याच एका कारणाने आपल्याला मराठी चित्रपटांचे काम मिळाले नसावे, असे ते सांगतात.
कॅन्सर रुग्णालय सुरू करणार
जउळका रेल्वे येथे सर्व अद्ययावत कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याची योजना सावंत दाम्पत्याने आखली आहे. यात गरीब रुग्णांवर अत्यंत माफक दरात उपचार केले जातील. त्यासाठी जागासुद्धा निश्चित झाली असून, लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.

का सोडली चंदेरी दुनिया?
विशालहा सावंत यांचा एकुलता एक मुलगा. त्याने अनेक चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केले. त्याचा कर्करोगाने मृत्यू झाला. हे दु:ख सावंत दाम्पत्य सहन करू शकल्याने त्यांनी चंदेरी दुनिया सोडून जउळका रेल्वे गाठत शेती कसणे सुरू केले.
यांचा स्वभाव लहरी
लीलाधरहे सतत नवीन काही तरी करत असतात. त्यांचा स्वभाव प्रचंड लहरी आहे. एकवेळ त्यांनी घरात विषारी साप पाळण्यासाठी आणले. पण, वन विभागाने परवानगी नाकारली. नंतर ते जंगलात सोडले.- पुष्पा सावंत
----


विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम

 (Vikas V. Deshmukh, Karda, tq. Risod, dist Washim)