अकोला शहरातील एक उच्चभ्रू वस्ती. त्या
वस्तीतील एक पॉश घर. दारापुरे फाटक. फाटकाआड चारचाकी. घरातील सर्वच
उच्चशिक्षित. बाजूलाच चहा टपरी. वेळ सकाळी ८ ते ९ च्या सुमाराची. टपरीवरील
बाकावर कृषी विद्यापीठातील मुला-मुलींचा गलका सुरू. त्या घरापुढं एक गाय
आली. तिनं फाटकाला डोकं घासलं. सुरुवातीला वाटलं तिच्या डोक्याला खाज सुटली
असेल. पण, असंच तिनं दोन ते तीन वेळा केलं. बहुदा ती येथं रोजच येत असावी.
बाहेर कुणी तरी आलंय याची चाहूल लागताच घरातील गृहिणीनं अर्धवट दार उघडून
डोकावलं. लागलीच आत गेली. कडेवर दीड ते दोन वर्षांच्या मुलाला घेऊन बाहेर
आली. हाती पोळी. फाटक उघडलं. चिमुलल्याचं डोकं गायीच्या डोक्यावर ठेवलं नि
स्वत:ही तसाच नमस्कार केला. गायही लाडावली. त्या गृहिणीच्या हाताला चाटू
लागली. तिनं तिच्या तोंडात पोळी भरवली. पोळी खाताच गायीनं चिमुकल्याच्या
हातालाही चाटायला सुरुवात केली. तो घाबरला. परंतु, त्याची आजी की आणखी कोण
असलेल्या त्या बाईंनी “काही नाही गो माताहे” म्हणत त्याचा हात ओढून
गायीच्या तोंडापुढं नेला. चिमुकल्याला आता गुदगुदल्या होत होत्या. त्याला
मज्जा वाटत होती. जनावर आणि मुनष्यातील हे प्रेम भारावणारचं होतं. पण,
अचानक त्या ठिकाणी एक ७० ते ७५ वर्षांचा म्हातारा आला. दाढी वाढलेली. फाटके
कपडे. डोळे खोपडीला भिडलेले. चालायचाही त्राण त्याच्या शरिरात नव्हता. तो
गेट पुढं येऊन उभा राहिला तसे गृहिणीच्या चेहऱ्यावरील भाव बदलेले. “दान धरम
करा काही तरी..” आपल्या हातातील मळकटलेली पिशवी पुढं करत अत्यंत
विणवणीच्या स्वरात तो बोलला. गृहिणी काहीच बोलली नाही. पहिल्या वाक्याला
जोडूनच म्हाताराच्या तोंडून दुसरं वाक्य बाहेर पडलं. “रातचं उरलेलं
शियं-पाकं बी चालंल..” आता मात्र गृहिणी खवळली. “जा समोर, रोजच येतात
मेल्ले ! काम करायचा कंटाळा आणि चालले भीक मागायला. चल निघ येथून.” असं
म्हणत तिनं त्या वृद्धाला हाकलून दिलं. फाटक बंद करून आत गेली. वृद्ध चहा
टपरी जवळ येऊन थांबला. पाच-दहा मिनिटं तिथंच रेंगाळला. त्याच्या मनातील
घालमेल चहा पीत असलेल्या एका मुलानं ओळखली. “ओ संगीतबापू या बुढ्याले पोहे
आन एक कटिंग दे जा.” असं म्हणत त्यानं आपल्या बिलासह त्या म्हाताऱ्याचेही
बिल पे केलं नि मित्रांसोबत निघून गेला. गाय अजूनही फाटकाला डोक घासत होती.
दरम्यान, पुढच्या घरातील एक गृहिणी हाती पोळी घेऊन बाहेर आली. तिला
पाहाताच गायीनं आपला मोर्चा तिकडं वळवला…
- विकास विनायकराव देशमुख
मु. करडा, ता. रिसोड, जि. वाशीम
Vikas Deshmukh Karda, Tq Risod, Distt Washim
- विकास विनायकराव देशमुख
मु. करडा, ता. रिसोड, जि. वाशीम
Vikas Deshmukh Karda, Tq Risod, Distt Washim
भाऊ जबरदस्त मांडणी
उत्तर द्याहटवा