रविवार, १७ मार्च, २०१३

धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज


त्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आदराचे आणि भक्तीचे उत्तुंग असे स्थान आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवछत्रपतींबद्दल अतीव अभिमान भरलेला आहे. खरे तर शिवछत्रपती हे सा-या भारताचे अस्मिता स्थान आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्राने शिवाजी महाराजांच्या अभिमानावर  मालकी सांगू नये. शिवछत्रपती हे देशातील कोट्यवधी लोकांना आदर्श वाटतात, कारण त्यांच्याबद्दल जसा त्यांना अभिमान वाटतो तसाच आपलेपणाही वाटतो. शिवाजी राजांच्या युद्धनीतीमुळे त्यांना जागतिक पातळीवरही मान्यता मिळाली. जेव्हा शत्रू बलाढ्य असतो आणि तो त्याला फारशी माहिती नसलेल्या क्षेत्रात युद्धासाठी उतरतो तेव्हा त्याला नामोहरम करण्यासाठी गनिमी कावा कसा वापरावा याचा आदर्श छत्रपती शिवाजी  राजांनी आपल्या युद्धतंत्रामुळे निर्माण केला. म्हणूनच व्हिएतनाममध्ये अमेरिकेची बलाढ्य सेना उतरल्यावर तेथील जनतेचे लोकनेते हो चि मिन्ह यांनी शिवाजी राजांचे ‘गोरिला वॉरफेअरङ्क तंत्र वापरले. विश्वविजयी अमेरिकी सेनेला अखेर व्हिएतनाममधून नामुष्कीची माघार घ्यावी लागली. अनेक इंग्रज इतिहासकारांनी शिवछत्रपतींच्या युद्धतंत्राची तुलना  हानिबल, ज्युलियस सिझर, नेपोलियन यांच्याशी केली आहे. भारतात सागरी बळ वाढविण्याची दृष्टी शिवछत्रपतींकडे होती. त्यामुळेच त्यांनी कोकण किना-यावर सिंधुदूर्गसारखे सागरदुर्ग बांधले आणि पहिल्या भारतीय आरमाराची उभारणी केली होती. तत्कालीन ब्रिटिश राज्यकत्र्यांनी शिवछत्रपतींच्या या दूरदृष्टीची नोंद घेतल्याचे ठिकठिकाणच्या कागदपत्रांवरून दिसते. एक आदर्श प्रजाहितदक्ष राजा, उत्कृष्ट प्रशासक, राजकारणापासून धर्माला सुरक्षित अंतरावर ठेवणारा विचारी नेता असे अनेक गुण शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. त्यांच्या चरित्रात आणि चारित्र्यामध्ये शाश्वत जीवनमूल्ये आणि पुरोगामी आशय दिसतो. त्यामुळेच चारशे वर्षांनंतरही शिवछत्रपतींची सर्वसामान्य लोकमनावरील
जादू कधी कमी होणार नाही.अशी सर्वांना भावणारी व्यक्तिमत्त्वे अनेकदा समाजातील वरिष्ठ वर्गाला, राजकीय नेत्यांना सोयीची वाटतात आणि आपल्या विचाराप्रमाणे त्या लोकोत्तर पुरुषावर रंग चढविण्याचा प्रयत्न होतो. अनेकदा जनमानसातील शिवछत्रपतींचे स्थान आपल्या राजकीय किंवा सामाजिक, धार्मिक स्वार्थासाठी वापरण्याचा मोह अनेकांना होतो. त्यामध्ये निखळ आदरभाव, भक्ती किती आणि विविध प्रकारचे लाभ मिळविण्याचे प्रयत्न किती हे समजणेही अनेकदा खूप अवघड होते. आज राजकीय व सामाजिक क्षेत्रात गावोगावी उगवणा-या अनेक संस्था शिवछत्रपतींचे नाव वापरतात. बहुधा त्यांचे वर्तन मात्र शिवछत्रपतींच्या आदर्शांविरुद्धच असते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभा राहिलेली शिवस्मारके ही अशा संमिश्र गोष्टींचे फलित आहे. काही लोकांना शिवाजीराजे ही आपल्या जातीची, समाजाची मिरासदारी वाटते. काही राजकारण्यांना शिवाजीराजांचा भगवा ध्वज सोयीचा वाटतो. काहींना राजांनी आदिलशहा  qकवा औरंगजेब यांच्याशी दिलेला ऐतिहासिक लढा हा धर्मगौरव वाटतो. पण राजांचा लढा हा धार्मिक कधीच नव्हता. तसे असते तर त्यांनी आपल्या सैन्यातील महत्त्वाची पदे मुस्लिम योद्धे किंवा सेनानी यांना बहाल केली नसती. केवळ हिंदवी स्वराज्य ही कल्पना त्यांनी आपली मानली नाही तर प्रजेचा न्यायप्रिय राजा होण्यात मोठेपणा मानला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा