शुक्रवार, १५ मार्च, २०१३

बेंच


कॉलेज सुटतं. आयुष्यात स्थिरावण्याचा प्रयत्न सुरू होतो. तरीही कॉलजेच्या मोरपंखी आठवणी मनात रुंजी घालतात. आठवतो तो मित्रांसोबत शेअर केलेला बेंच. बोअर झालेल्या पिरिअडमध्ये उगाचच त्या बेंचवर गिरवलेल्या चारोळ्या. तिथेच मांडलेला फुल्ली-गोळ्य़ाचा डाव तर कधी आपल्याला आवडणा-या तिचं किंवा त्याचं नाव तर उगाचच खोडी म्हणून दिलच्या चिन्हात लिहिलंल त्या दोघांचं नाव. त्यावर प्राचार्यांकडे झालेली तक्रार अन् कानाचे पडदे फाटेस्तोर ऐकून घ्यावं लागलेलं लेक्चर. परीक्षेच्या काळात कोणत्या बेंचवर आपला नंबर येणार ते आदल्याच दिवशी हुडकून शिपायाला फूस लावून त्या बेंचवर लिहिलेले उत्तराचे मुद्दे असं बरंच काही.. काही.
कॉलेजच्या आयुष्यात प्रत्येकाचाच सख्खा मित्र असतो बेंच. कुणाचा अगदी पहिल्या रांगेत सर्वात पुढचा, कुणाचा मधल्या रांगेतला तर कुणाचा अगदी शेवटचा. कोण कुठल्या बेंचवर बसतं यावरून त्यांचा स्वभावसुद्धा लक्षात येतोे. अगदी पुढे बसणारे नम्र असतात. नाकाच्या दिशेनं चालणारे. दिलेलं होमवर्क करणारे. केवळ आपणच कसं टॉप राहू असाच विचार करणारे. स्वतःला जपणारे. या उलट शेवटच्या बेंचवर बसणा-यांच असतं. ‘अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला’ म्हणत ते टरेलक्या करतात. कुणाचे केस ओढतात... कुणाला दगड-खडू मारतात... सरांची खिल्ली उडवतात... जणू हे सगळं करण्यासाठीच ते या जागेवर बसतात की काय असं वाटतं; पण वरकरणी ते जरी खोडकर असले तरी ते इतरांच्या मदतीला धावून जातात. आपण केलेल्या खोड्यातून आपल्या इतर मित्रांचं मनोरंजन कसं होईल, हे ते पाहत असतात. मधल्या रांगेत बसणारे बिच्चारे खरोखरच अधले- मधलेच असतात. कधी ते अभ्यास करतात तर कधी खोड्या. काही ठस्सही याच रांगेत असतात. एकूणच काय तर थोडेसे टवाळखोर, थोडेसे हुशार आणि काहिसे गाढव असं मिश्रण असणारी रांग म्हणजे मधली रांग. एकूणच काय तर बेंचचं अन् आपलं नातं अतुट असतं. दिवसा मागून दिवस जातात. कॉलेज तिथंच असतं. त्याच्या रस्त्यावरील गुलमोहराला दरवर्षी नवा बहर येतो. कॉजेलपूर्वीसारखंच फुलतं फक्त दरवर्षी त्या बेंचवर दुसरं कुणी तरी बसतं.

 
- विकास वि. देशमुख
 करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा