दुसर्या वर्गात आम्हाला कविता होती, 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान.. दादा मला एक वहिनी आण..' एका तालात सुरात गुरुजी आमच्याकडून ती म्हणून घेत. या कवितेमुळे आमच्या बालमनावर वर्णद्वेशाचे संस्कार झाले. मग आम्ही आमच्या काळ्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या रंगावरून चिडवत असू. पुढे चाैथीत गेलो. शिवाजीचा इतिहास अभ्यासाला आला. शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचा एक फोटो त्यात छापलेला होता. यासह मराठा आणि मोगलांच्या लढाईचे प्रसंग दाखविणारे इतर फोटोही होते. ते पाहून आम्हाला शत्रू म्हणजे केवळ अन् केवळ मुसलमान असंच वाटत होतं. मग काय फोटोतील दाढीवाल्यांचा चेहरा आम्ही पेनानं घोटून-घोटून फाडून टाकत असू. रिसोडला तालुक्याच्या ठिकाणी वडलांसोबत कधी गेलोच आणि तिथे तसा दाढीवाला दिसला की तोही शत्रूच वाटे. एकूणच काय तर शैक्षणिक पुस्तकांतून वर्णद्वेश, धर्मद्वेश, अंधश्रद्धा याचेच अप्रत्यक्ष 'धडे' मिळाले. धन्य तो अभ्यासक्रम आणि धन्य आपली शिक्षणव्यवस्था..
कधीतरी... याच शब्दाभोवती मानवी आयुष्य आहे. हा शब्दच मुळात प्रचंड ऊर्जा देणारा. कधीतरी आपण असं करू. कधीतरी तसं होईल असं आपण म्हणतो; म्हणूनच आपण जगतो. मानवी आयुष्यातून जर हा आशावाद वजा झाला तर त्याच्या जगण्याला अर्थच उरणार नाही. एवढंच नाही तर त्याचं आयुष्यसुद्धा थांबलेलं असेल. त्यामुळेच माझा हा ब्लॉग ‘कधीतरी...'
रविवार, २५ जून, २०१७
गुरुवार, २२ जून, २०१७
ज्ञानेश्वर माउली याचं उत्तर कुठे शोधू ?
ज्ञानदेवांनी विठूला स्पृश्य-अस्पृश्याच्या दलदलीतून मोकळं करण्यासाठी बंड केला. या दलदलित लोकशाहीचं बीज पेरण्याचं काम केलं. प्रसंगी लेखणीला तलवार करून अनिष्ट रुढी परंपरेवर आसूड आेढले. गवळणींच्या विरहातून जगण्याकडे रसिकेने पाहायला शिकवले. माउली प्रतिभेचे धनी होते. समाजातील विषमता, शोषण यांची त्यांना जाणीव होती. पण, एवढ्या प्रतिभासंपन्न प्रगल्भ, आशावादी, रसिक माणसानं एकाएकी अन् तेही एेन तारुण्यात खरंच समाधी घेतली असेल? की पानसरे-दाभोळकरांप्रमाणे त्यांचाही 'तुकाराम' केला गेला असेल? माउली तुमचा अतोनात छळ झाला, हे सांगितलं जातं. मात्र, त्यानंतर नेमकं काय झालं हा विचार अस्वस्थ करतो. निश्चितच ज्याला भाबडे वारकरी समाधी म्हणतात ती आत्महत्या करणारे पळपुटे तुम्ही नव्हता. तुम्ही निडर होता. याचे संदर्भ आजही तुमच्या आेवीत आहेत.
शनिवार, १७ जून, २०१७
शेतकरी संप
शेतकरी संपाच्या मागे विरोधक असल्याचा अारोप सत्ताधारी अाणि त्यांचे समर्थक करत होते. त्यात पूर्णत: नव्हे पण 'तत्वत:' तथ्य अाहे. पण, अाता सत्ताधार्यांनी केलेली कर्जमाफीची घोषणा अाणि शेतकर्यांप्रति यापूर्वी ओकलेली गरळ यामुळे अापसुकच कर्जमाफीचे श्रेय 'पूर्णत:' विरोधकांकडे जाते. पवारांनी शेतकरी संपाची गुगली टाकली, असे ओरडून अाणि पोस्टी फिरवून भाजपनेच महाराष्ट्रभर उर बदडवून घेतला. शिवाय ते तिला नो बाॅल नो बाॅलही म्हणत होते. परंतु, फडणवीसांना त्याच गुगलीवर तूर्त तरी बोल्ड व्हावे लागले. एकप्रकारे भाजपमुळेच कर्जमाफीचे श्रेय विरोधकांना मिळाले अाहे. मात्र, शेतकर्यांनी हुरहुरूळून जाण्याची गरज नाही. 'तत्वत:' या शब्दांअाड कायदेशीररीत्या असंख्य पळवाटा अाहेत. त्यामुळे पूर्णत: कर्जमाफी होईल की नाही याची शास्वती नाही. तोपर्यंत सरकारच्या विरोधात असेच जोरकसपणे लगे रहो! कारण विरोधक अाणि सत्ताधारी भाई-भाईच अाहेत. खरा विरोधी पक्ष सोशल मीडियाच अाहे.
जाहीर कबुली
वर्ष २००० मध्ये गावातीलच शाळेतून ६५.२० टक्के घेऊन दहावी पास झालो. त्याचा ना अनंद झाला ना दुःख. बस आला दिवस गेला दिवस असेच होते; कारण यातील एकही गुण मनाने लिहून मिळवलेला नव्हता. सरसगट नवनित अपेक्षित मधून पाहून लिहिले. त्यातही नसले की काॅपीवर लक्ष ठेवण्यासाठी असलेले शिक्षकच फळ्यावर लिहून देत. पण, काॅपी करून गुण मिळविले हा माझा अवगुण नव्हता. आमच्या शाळेची, गावाची, परिसराची एवढेच नाही; तर तालुक्याची ती परंपरा होती. तिचा मी पाईक झालो. खुद्द आमच्या भागातील तत्कालीन आजी-माजी आमदार सुरळीतपणे काॅपी सुरू आहे का, हे पाहायला येत. काॅपी करू द्या, अशा सूचना केंद्रप्रमुखांना करत. कधी आलेच तर शिक्षण विभागाचे अधिकारी येत; तेही हाच कित्ता गिरवत पार्टी झोडून परत जात. पुढे तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यातल्या नामांकित एका कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळा नावाजलेली. दरवर्षी ४ ते ५ विद्यार्थी मेरीट येत. (यात शिक्षकांची मुलं किंवा त्यांचे नातेवाईकच अधिक) परंतु, तिथेही तेच. फक्त काॅपी करण्याची पद्धत शिस्तबद्ध. या ठिकाणी ९० टक्के गैरमार्ग आणि १० टक्के मनाने लिहून बारावीची परीक्षा दिली. ५९ टक्के मिळाले. त्यानंतर पदवीसाठी जिल्हा ठिकाणी गेलो. काॅलेज एकदम कडक. आजूबाजूला शहरी मुलं. झालं आत्मविश्वास गमावला. बीएच्या पहिल्याच वर्षी नापास झालो. कशीतरी एटीकेटी मिळाली. मग 'चादडली' पदवी मिळविण्यासाठी तब्बल साडेपाच वर्षे लागले. ते केवळ अन् केवळ गावाकडे असलेल्या शिक्षणाच्या खेळखंडोब्यामुळेच.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)