गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

‘आर्त’ कादंबरीमधून उलगडली बंगालमधील स्त्री शोषणाची समस्या


 

























































बाबाराव मुसळे हे मागील तीन दशकांपासून मराठी रसिकांना परिचित असलेले नाव. मुसळ्यांनी आजवर मराठी साहित्याला ‘हाल्या हाल्या दुधू दे’, ‘पखाल’, ‘वारूळ’, ‘पाटिलकी’, ‘दंश’, ‘स्मशानभोग’ या गाजलेल्या कादंब-या दिल्यात. त्यांच्या साहित्यकृतीला अनेक मानाचे पुरस्कारसुद्धा मिळाले. वेगवेगळ्या विद्यापीठांत त्यांच्या साहित्यकृतींचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
आता मुंबईच्या मॅजेस्टिक प्रकाशनाकडून मुसळ्यांची ‘आर्त’ ही सातवी कादंबरी यावर्षाच्या शेवटी प्रकाशित होत आहे. या कादंबरीविषयी सांगताना मुसळे म्हणाले, ‘‘कादंबरीचे कथानक हे पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगना या जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील काकद्वीप परिसरातून दरवर्षी गंगासागर यात्रेच्या काळात पंधरा वर्षांखालील मुली गायब होण्याचे प्रकार घडतात. या मुलींना कोण पळतीत असावं? या मागे आंतरराष्‍ट्रीय स्वरुपाचं एखादं रॅकेट कार्यरत असावं का? या घटना दरवर्षी होतात तरी या काळात या मुलींचे पालक विशेष काळजी घेत नसावेत का? गंगासागर यात्रेच्या वेळी मला भेटलेले एक सज्जन या बाबत म्हणाले, ‘शाब, हमारे इधर घर घर में औरत का शोषण होता है. उनकी सुरक्षा, खानपान, घरगृहस्थी के बारे में घर के शासक ज्यादा ध्यान नहीं देते. औरत काम में रात-दिन में लगी रहती. बेटी-लोगो का भी वही हाल’ घरात पुरुष मंडळीचे दुर्लक्ष म्हणजे मुली   पळविणा-यांसाठी पर्वणीच नाही काय? या कादंबरीतील निम्नस्तरातील भोई जनजातीची नायिका दामाय हिची चित्रांशी नावाची सातव्या वर्गात शिकणारी मुलगी याच काळात हरवते. या घटनेने दामाय हादरते. आपल्या हरवलेल्या चित्रांशीचा शोध घेताना ती आत्यंतिक आर्त, व्याकुळ, व्यथित, दु:खी-कष्टी होते. मात्र, असहाय्य होत नाही, कारण पश्चिम बंगालची प्रत्येक नारी म्हणजे दुर्गा-महाकाली, याचं प्रत्यंतर ती जागोजागी देते.  कुटुंबप्रखानं दुर्लक्ष केल्यावर जाणीवपूर्वक तिनं नवरा, नातेवाईक, गावप्रमुख, पोलिस यांच्याविरुद्ध दिलेला उग्र  लढा म्हणजे ही ‘आर्त’ कादंबरी.’’
या कादंबरी लेखनासाठी मुसळे हे वर्ष 2008 मध्ये स्वत: गंगासागर यात्रेच्या निमित्ताने त्या भागात गेले. तेथे जावून त्यांनी या समस्येचा अभ्यास केला. प्रसंगी बंगाली भाषासुद्धा शिकली. कादंबरीमध्ये काही ठिकाणी बंगाली संवाद आलेले आहेत. ते घेणे अपरिहार्य होते, असेही मुसळे यांनी सांगितले. मुसळ्यांच्या आजवरच्या कादंबरीतील नायक-नायिका या शोषित, पीडित समाजातीलच आहेच. हाच धागा त्यांनी या कादंबरीतसुद्धा कायम ठेवला आहे.
-
विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशिम
(सौजन्य : दै. दिव्य मराठी Divya marathi)
Vikas Deshmukh, Karda, Risod, Washim
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा