सोमवार, ८ एप्रिल, २०१३

क्रेझीमुआऽऽऽ

‘अरे ! क्रेझीमुआ म्हणजे काय रे? जरा तुझ्या इंग्रजींच्या सरांना विचारतोस का? मी सगळ्या डिक्शन-या चाळल्या; पण अर्थ सापडला नाही. सध्या असे संवाद मराठी चित्रपटातील बडे निर्माते, स्टार कलाकार यांच्या घरात ऐकायला मिळत आहेत. कुणी तर लाडात येऊन त्याच्या बायकोलाही म्हणत आहे, ‘अगं, तुला क्रेझीमुआऽऽऽ माहितीये का?’ त्यावर त्याची बायको त्याचा हात सोडवत ‘आता लाडात येऊ नका जा शूटिंगवर’ म्हणत आहे. थोडक्यात सध्या मराठी कलाकारांत ‘क्रेझीमुआ’ चा अर्थ शोधण्याची क्रेझ आलीय. त्याला कारणही तसंच आहे. क्रेजिमोआ प्रोडक्शनच्या ‘झोलझाल प्रेमाचा’ या मराठी चित्रपटाचे काम सुरू आहे. या प्रोडक्शनचा हा पहिला चित्रपट आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. त्यामुळे अचानक ‘क्रेझीमुआ’ हे नाव चर्चेत आलंय. तसा या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो याचा शोध घेण्याचा आम्हीही प्रयत्न केला. अनेक प्राध्यापकांना भेटलो, भाषातज्ज्ञांना भेटलो; पण यश आलं नाही राव ! मग ठरवलं थेट क्रेझीमुआ प्रोडक्शनच्या संस्थापक सीमा उपाध्ये यांनाच भेटून आपली झोलझाल थांबवायची. मग ‘झोलझाल प्रेमाचा’ चा सेट गाठला. शूटिंग रंगात आलं होतं. तिथे आपला सिद्धू अर्थातच सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, तेजस्विनी पाटील, स्मिता गोंडकर होते; पण खूप वर्षांनंतर नवीन प्रभाकरही दिसला. मीच मला ‘पहेच्चान कोण?’ म्हणत त्याला ओळखलं. एकदाचे चित्रीकरण थांबले. सगळे एकत्र आले. मग आमच्या गप्पाही रंगल्या. आपलं अज्ञान व्यक्त होऊ नये म्हणून मी दबक्या आवाजात सीमातार्इंना विचारलं, ‘ताई, के्रझी म्हणजे माहितीये; पण मुआ काय भानगड आहे? मी इंग्रजीच्या ब-याच तज्ज्ञांना विचारलं; पण कुणालाच सांगता आलं नाही.’ सीमाताई हसल्या. म्हणाल्या, ‘तू ना क्रेझीच आहेस ! अरे, कसं सांगणार ते. ‘मुआ’ हा शब्द इंग्रजी नाहीच आहे. तो फे्रंच आहे आणि मुआ म्हणजे मी. मग क्रेझीमुआ म्हणजे काय?’ मी लगेच उत्तरलो, ‘वेडा मी !’ त्यावर ताई म्हणाल्या ‘हंऽऽ आणि अजून होणार आहे.’ मी म्हटलं ‘कसं बुआ?’ . मध्येच विजय पाटकर बोलले, ‘काहीच दिवसांत ‘झोलझाल प्रेमाचा’ प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंतच्या मराठी चित्रपटांतील हा सर्वाधिक दर्जेदार विनोद असलेला चित्रपट आहे. सलग दोन तास आम्ही तुला हसवणार आहोत. मग हसून-हसून तू वेडा होणार ना!’ हे ऐकूनच माझ्या चेह-यावरही हसू उमटलं. सिद्धार्थ जाधवसुद्धा बोलता झाला. तो म्हणाला, ‘मी मराठी आणि हिंदीत अनेक चित्रपट केलेत. ब-याच चित्रपटांच्या कथेत तोच तो पणा होता; पण ‘झोलझाल प्रेमाचा’ ची कथा खूप वेगळी आहे. ती जशी विनोदी आहे तशी प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारी आहे’ , असे सांगत त्याने हा चित्रपट कसा दर्जेदार आणि मराठीत माईलस्टोन होणार हे पटवून दिले. नवीन प्रभाकरलाही मराठी चित्रपटाचा अनुभव नवीनच होता. तो म्हणाला, ‘माझी मातृभाषा मराठी आहे. दुर्दैवाने मला मराठीत काम करण्याची फारशी संधी मिळाली नाही; पण आता सीमातार्इंनी ती संधी दिली. त्यामुळे आपल्या घरी आईच्या कुशीत आल्यासारखे वाटत आहे’ , हे सांगताना तो थोडासा भावनिक झाला. आपल्या अनुभवाने प्रसंग ओळखून विजय पाटकर यांनी त्याचा कान पकडला नि म्हणाले, ‘आता आईच्या कुशीत झोपू नको ! आजचं काम बाकी आहे,’ त्यावर एकच हशा पिकला. विजयभाऊंनी चित्रपटाचे संगीत आणि गीतरचना कशा लोकप्रिय होणार ते सांगितले. ‘आतापर्यंतच्या भूमिकांपैकी या चित्रपटातील भूमिका मला पूर्ण समाधान आणि न्याय देणारी आहे’ , अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत एदलाबादकर यांनी लिहिली आहे. अमित राज यांचे संगीत आहे. कला दिग्दर्शक सुनील व-हाडकर, रंगभूषा मनोज वडके, संकलन सर्वेश परब, वेशभूषा आशिष डॅव्हर, ध्वनी अनिल निकम आणि कार्यकारी निर्माता म्हणून प्रमोद मोहिते ही मंडळी काम पाहात आहेत. 
या सगळ्या चर्चेमुळे आता ‘झोलझाल प्रेमाचा’ पाहण्याची माझी उत्सुकता वाढली. त्याचे चित्रीकरण कधी पूर्ण होईल याचीच मी वाट पाहात आहे. एकूणच काय तर ‘क्रेझीमुआ’ झालोय. तुम्हीही व्हा ! पण ‘झोलझाल प्रेमाचा’ पाहूनच! 

- विकास वि. देशमुख  
करडा, रिसोड, वाशीम.


Vikas V. Deshmukh 
Karda, tq- Risod, dist- Washim

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा