शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

धोंडिबा रतन झोडापे


रात्रीचे दहा-साडेदहा वाजलेले. सगळीकडे निरव शांतता. नुकताच पाऊस पडून गेलेला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले. शहरातील हिंदू-मुस्लिमबहूल भागातील एक मंदिर. पथदिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात मंदिराच्या पायऱ्यांवर बसून तीन ते चार म्हातारे गप्पा करत असलेले. त्यातच मंदिराचा पुजारीही. काहीच अंतरावरील कट्ट्यावर तरुण मुलांचा एक ग्रुप बसलेला. त्यातील एक दोघं स्मार्टफोनवर काहीतरी गांभीर्यानं पाहत असलेले. कुणी कानात एअरफोन टाकून गाणं ऐकत असलेला तर कुणी चॅटिंगमध्ये व्यस्त.
""अबे, ही पाह्य चिखलीची क्‍लीप.'' एका तरुणानं आपला मोबाईल दुसऱ्याकडं देत म्हटलं.
""लै हॉट हय बे..!'' उत्सुकतेनं दुसऱ्या तरुणानं फोनमध्ये डोळे खुपसत प्रतिक्रिया दिली.
याच वेळी दिवसभर सायकल रिक्षा चालवून थकलेल्या अवस्थेत एक जळकटेलला, मळकटलेला पंचवीस-तिशीतला तरुण घराच्या दिशेनं पायडल मारत जात होता. एका हातात चिलीम. डोळे ताठरलेले. बहुधा गांजा ओढत असावा. हॅण्डलला एक काळी कॅरिबॅग लटकवलेली. समोरून कोण येतंय, किती वेळ झाली याचं काहीही घेणं-देणं त्याला नव्हतं. गांजाची झिंग आणि डबक्‍यात साचलेल्या पाण्यामुळं नेमकं मंदिरासमोर रस्त्यातील खड्डयाचा अंदाज त्याला आला नाही. कॅरिबॅग उसळली. खाली पडली. त्यात मांसाचे तुकडे होते. ते मंदिरासमोर पडले. रिक्षाचालकानंही अचानक ब्रेक लावले. मांसाचे तुकडे वेचण्यासाठी तो खाली उतरला. नेमकं हेच दृश्‍य एका म्हाताऱ्यानं आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून नजरेत कैद केलं नि ""अरं मंदिरापुढं मांस'' म्हणत आरोळी ठोकली. पुजारीही खवळला, ""बाटवलं मंदिर बाटवलं'' म्हणत आरडा-ओरड सुरू केली. ""पकडा सायाच्याले'' म्हणत म्हातारे रिक्षाचालकाच्या अंगावर धावले. तो बिच्चारा गांगरून गेला. या गोंधळामुळं तरुणांचे लक्ष मंदिराकडे गेले.
""रमश्‍या काय झालं बे तिकडं?''
""मंदिर बाटवलं म्हंते ब्बा तात्या.''
""बाटवलं?''
""च्या मायले! कोण कशाले मंदिर बाटवलं''
तरुणांचा हा संवाद सुरू असतानाच पुजाऱ्यानं पुन्हा आरोळी ठोकली, ""ओ पोरोहो, या लांड्यानं मंदिरापुढं मांस आणून टाकलंऽऽऽ''
त्याच्या या आवाजानं मंदिराजवळ असलेल्या झाडांवरील पाखरंही घाबरून एकसाथ उडाली. ""मांस? अरं, चला!'' म्हणत पोरांनी मंदिराकडे धूम ठोकली. म्हाताऱ्यांनी रिक्षाचालकाला पकडून ठेवलं.
""जाऊ द्या राजा मले, बायको लेकरं वाट पाह्यले.'' म्हणत रिक्षाचालक त्यांच्या तावडीतून सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत बोलला.
तरुणांच्या घोळक्‍यानं त्यांच्या जवळ येताच त्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारायला सुरवात केली.
""विज्या नक्कीच हे गोमांस हय'' एक जण बोलला.
""काय ह्यय बे हे.. कुठून आणलं?'' रिक्षाचालकाचे मानगूट पकडत दुसऱ्यानं इचारलं.
""नाई ह्यो गोमांस नाई.'' रिक्षाचालक विनवनी करीत पुन्हा बोलला.
""त्याले कायले इचारतं'' म्हणत अन्य एकाने पुन्हा त्याला लाथाबुक्‍या मारायला सुरवात केली.
""थांब मी राजूअण्णाले फोन लावतो'' म्हणत एकजण बाजूला झाला. त्यानं फोन लावला. ""अण्णा, पटकन गाडी घेऊन या! मंदिरापुढं एका लांड्यानं गोमांस टाकलं,'' असं सांगत त्यानं फोन कटही केला. रिक्षाचालक त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. पण, तरुणांचं टोळकं ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. काहीच वेळात दहा-पंधरा मोटारसायकल आल्या. कुण्या गाडीवर तिघे तर कुण्या दोघे बसलेले होते. तिघा-चौघांनी रिक्षाचालकाचं बोंकाडं धरलं. त्याला जबरदस्तीने एका मोटारसायकलवर बसवून पोलिस ठाण्यात नेलं. "जय श्रीराम'चे नारे देत आताच्या आता गुन्हा दाखल करा म्हणून पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. उगाच आफत नको म्हणून पोलिसांनी "एनसी' नोंदवली. कडक कारवाई केली जाईल, कत्तलखाना शोधाला जाईल, म्हणतं ठाणेदारानं त्यांची बोळवण केली. गांजाची चढलेली झिंग नि कार्यकर्त्यांचा रुद्र अवतार पाहून बिच्चारा रिक्षाचालकही आपलं म्हणणं ओरडून ओरडून सांगत अचानक गपगुमान झाला. प्रकरण पेट घेईल म्हणून पोलिसांनी रात्रभर त्याला ठाण्यातच ठेवलं. परीक्षणासाठी मांस लॅबमध्ये पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी अहवाल आला, "मांस हल्याचं आहे म्हणून.' लागलीच पोलिसांनी रात्रीच्या तरुणांना बोलावून घेतलं. सार्वजनिक ठिकाणी आरोग्यास घातक पदार्थ फेकल्याच्या आरोपाखाली रिक्षाचालकावर गुन्हा नोंदविला गेला. एव्हाना रिक्षाचालकाची झिंग उतरली. कुणीतरी नवसाला हल्या कापला तेच मांस दावत म्हणून तो घरी घेऊन जात होता. त्याच्यावर गुन्हा नोंदवून करून आपण खूप मोठं सामाजिक काम केल्याच्या आविर्भावात तरुण निघून गेले. दंगल होता होता थांबवली म्हणत पोलिसांनीही स्वतःची पाठ थोपटून घेतली. रिक्षाचालक भेदरलेल्या अवस्थेत ठाण्याच्या परिसरात बसून होता. काही वेळाने क्राइम रिपोर्टर आले. त्यांना त्याला नाव विचारलं. तो उत्तरला, ""धोंडिबा रतन झोडापे.''
 ■ विकास विनायकराव देशमुख
मु. करडा, पो. मोठेगाव, ता. रिसोड, जि. वाशीम.
हॅलो- 9850602275
vikas.535388@gmail.com