सोमवार, १६ जानेवारी, २०१२

'एक होती शकुंतला...!

वर्‍हाडात कापसाला पांढरं सोनं म्हटलं जायचं. हे सोनं लुटण्यासाठी ब्रिटिशांनी सन १९१३ मध्ये मूर्तिजापूर-कारंजा-यवतमाळ हा लोहमार्ग टाकून एक मालगाडी सुरू केली. पुढे तिला प्रवासी गाडी केली. तिला प्रवाशांनी 'शकुंतला' नाव दिले. मधल्या काळात गाडीला तब्बल १0 डब्बे होते. आता पाचच आहेत. गाडीच्या कमी होत जाणार्‍या डब्याप्रमाणे हळूहळू हा मार्गही उखडून गाडी कायमचीच बंद करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला आहे. ओघानेच 'एक होती शकुंतला' अशीच गोष्ट नव्या पिढीला सांगावी लागणार आहे.
सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीची असलेली ही गाडी आता इंग्लंडमधील निल्स्न अँन्ड निल्स्न या कंपनीच्या ताब्यात आहे. भारत सरकार आणि निल्स्न अँन्ड निल्स्न कंपनीचा या गाडीच्या मालकीसंबंधीचा असलेला करार सन १९९६ मध्येच संपला. पण, त्याला सन २00६ पर्यंत वाढ देण्यात आली. पुन्हा यामध्ये वाटाघाटी होऊन या कराराला भारत सरकार आणि कंपनीने २0१६ पर्यंत मुदत वाढ दिली. त्यामुळे शकुंतला, तिचे रुळ आणि त्यावरील रेल्वे स्टेशन आजही इंग्रजांच्या मालकीचे आहेत. एकेकाळी या गाडीतून एका वेळी तब्बल तीन ते चार प्रवासी प्रवास करीत असत. दरम्यान, विज्ञानाने प्रगती केली. कोळशाचे इंजिन जाऊन डिझेलचे इंजिन आले. रेल्वे गाड्यांची गती दुप्पट-तिप्पट वाढली, पण या गाडीची गती आहे तेवढीच आहे. त्यामुळे गाडीचे प्रवासी कमी झालेत. प्रवाशांबरोबरच डब्बेही कमी झालेत. आज मूर्तिजापूर ते यवतमाळ हे ११४ कि.मी.चे अंतर कापायला शकुंतलेला तब्बल सात तास वेळ लागतो, ही बाब धावपळीच्या युगात प्रवाशांसाठी अतोनात गैरसोयीची आहे. ही गाडी किती वेगाने धावते, हे गाडीतील प्रवाशांनाच नाही तर चालकाला सुद्धा माहिती नाही. कारण गाडीत 'स्पिडो मीटर'च नाही, पण तरीही चालक अंदाजाने १५-२0 च्या स्पीडने तिला चालवतो. या गाडीचा रुळ १00 वर्षांपूर्वी तयार केलेला आहे. गिट्टी जीर्ण झाली आहे. 'फिशनप्लेटस्'चेही आयुष्य संपले आहे. अशा प्रकारचे रुळ आणि फिशनप्लेटस् आता तयार होतच नाहीत. त्यामुळे रुळाची दुरुस्ती करणे अवघड झाले आहे.
एकीकडे रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर मीटरगेज आणि नॅरोगेज मार्गाचे मोठय़ा प्रमाणात रुंदीकरण झाले आहे. मात्र, कोळशाऐवजी डिझेल इंजिन हा बदल वगळता मागील ९९ वर्षापासून मूर्तिजापूर-यवतमाळ हा रुळ आहे त्याच स्थितीत आहे. आजही एका खासगी ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात असलेल्या रुळाकडे शासनाचे दुर्लक्षच आहे. त्या कंपनीच्या करारांतर्गत भारतीय रेल्वे चालवित असलेल्या या गाडीतील प्रवाशांना रेल्वेच्या काहीच सुविधा मिळत नाहीत. साहजिकच प्रवासी कमी झाले. ३0 वर्षापूर्वी या मार्गावरून रेल्वे विभागाने माल वाहतूक बंद केली. या गाडीला १४ ठिकाणी थांबा आहे, पण आता मूर्तिजापूर आणि यवतमाळ ही स्टेशन वगळता मधातली स्टेशन बंद झाली आहेत. खेदाची बाब म्हणजे यवतमाळसारख्या मोठय़ा रेल्वे स्टेशनवरही या गाडीच्या प्रवाशांसाठी असलेल्या प्लॅटफॉर्मवर साधे शेडही नाही. गाडी कधी सुटणार, कधी येणार याच्या काहीच सूचना प्रवाशांना संबंधित विभागाकडून मिळत नाहीत. अंतर्गत टेलिफोन आणि सिग्नल व्यवस्था तर रामभरोसे आहे. त्यामुळे गाडी येईल की नाही, हे पाहण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे रुळाला कान लावणे हाच आहे. असे असले तरी आजही गरिबांना ही गाडी आपलीच वाटते. 
रस्ते हे विकासाची पावले आहेत. हेच हेरून ब्रिटिशांनी हा लोहमार्ग केला. पेट्रोल, डिझेलच्या किमती दर महिन्याला वाढत आहेत. त्यामुळे एसटी बसचे प्रवास भाडेही वाढत आहे. केवळ रेल्वेचाच प्रवास गरिबांना परवडणारा आहे. रेल्वेने माल वाहतूक करणेही सोयीचे आहे. त्यामुळे आपल्या भागात लोहमार्ग व्हावा, यासाठी त्या-त्या भागातील खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी आजघडीला आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण, मूर्तिजापूर-यवतमाळ हा असलेला लोहमार्ग बंद करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्न करीत आहे. असे असताना या भागातील लोकप्रतिनिधी चुप्पी साधून आहेत, ही बाब विकासासाठी मारक आहे. आज या लोहमार्गावरील साईड लाईन सिग्नल तोडण्याचे काम हाती घेतले आहे. कालांतराने रुळही उखडून टाकला जाईल. आज स्टेशन बंद केले. ब्रिटिश कंपनीसोबतच करार संपण्याच्या मुदतीपर्यंत ही गाडीही बंद केली जाईल. या रुळावरील मूर्तिजापूर आणि यवतमाळ येथे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे त्यांना फरक पडणार नाही. मात्र, कारंजा येथून या लोहमार्गाशिवाय कुठलाच लोहमार्ग जात नाही. भविष्यात कारंजा येथे ब्राडगेज करण्याचे नियोजनही नाही. त्यामुळे कारंजातील येणार्‍या पिढीला 'एक होती शकुंतला' असेच सांगावे लागेल, पण आता उपाय केल्यास हे टळू शकेल.
-विकास देशमुख, उपसंपादक,
लोकमत वाशीम.