शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

धोंडिबा रतन झोडापे


रात्रीचे दहा-साडेदहा वाजलेले. सगळीकडे निरव शांतता. नुकताच पाऊस पडून गेलेला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले. शहरातील हिंदू-मुस्लिमबहूल भागातील एक मंदिर. पथदिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात मंदिराच्या पायऱ्यांवर बसून तीन ते चार म्हातारे गप्पा करत असलेले. त्यातच मंदिराचा पुजारीही. काहीच अंतरावरील कट्ट्यावर तरुण मुलांचा एक ग्रुप बसलेला. त्यातील एक दोघं स्मार्टफोनवर काहीतरी गांभीर्यानं पाहत असलेले. कुणी कानात एअरफोन टाकून गाणं ऐकत असलेला तर कुणी चॅटिंगमध्ये व्यस्त.
""अबे, ही पाह्य चिखलीची क्‍लीप.'' एका तरुणानं आपला मोबाईल दुसऱ्याकडं देत म्हटलं.
""लै हॉट हय बे..!'' उत्सुकतेनं दुसऱ्या तरुणानं फोनमध्ये डोळे खुपसत प्रतिक्रिया दिली.
याच वेळी दिवसभर सायकल रिक्षा चालवून थकलेल्या अवस्थेत एक जळकटेलला, मळकटलेला पंचवीस-तिशीतला तरुण घराच्या दिशेनं पायडल मारत जात होता. एका हातात चिलीम. डोळे ताठरलेले. बहुधा गांजा ओढत असावा. हॅण्डलला एक काळी कॅरिबॅग लटकवलेली. समोरून कोण येतंय, किती वेळ झाली याचं काहीही घेणं-देणं त्याला नव्हतं. गांजाची झिंग आणि डबक्‍यात साचलेल्या पाण्यामुळं नेमकं मंदिरासमोर रस्त्यातील खड्डयाचा अंदाज त्याला आला नाही. कॅरिबॅग उसळली. खाली पडली. त्यात मांसाचे तुकडे होते. ते मंदिरासमोर पडले. रिक्षाचालकानंही अचानक ब्रेक लावले. मांसाचे तुकडे वेचण्यासाठी तो खाली उतरला. नेमकं हेच दृश्‍य एका म्हाताऱ्यानं आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून नजरेत कैद केलं नि ""अरं मंदिरापुढं मांस'' म्हणत आरोळी ठोकली. पुजारीही खवळला, ""बाटवलं मंदिर बाटवलं'' म्हणत आरडा-ओरड सुरू केली. ""पकडा सायाच्याले'' म्हणत म्हातारे रिक्षाचालकाच्या अंगावर धावले. तो बिच्चारा गांगरून गेला. या गोंधळामुळं तरुणांचे लक्ष मंदिराकडे गेले.
""रमश्‍या काय झालं बे तिकडं?''
""मंदिर बाटवलं म्हंते ब्बा तात्या.''
""बाटवलं?''
""च्या मायले! कोण कशाले मंदिर बाटवलं''
तरुणांचा हा संवाद सुरू असतानाच पुजाऱ्यानं पुन्हा आरोळी ठोकली, ""ओ पोरोहो, या लांड्यानं मंदिरापुढं मांस आणून टाकलंऽऽऽ''
त्याच्या या आवाजानं मंदिराजवळ असलेल्या झाडांवरील पाखरंही घाबरून एकसाथ उडाली. ""मांस? अरं, चला!'' म्हणत पोरांनी मंदिराकडे धूम ठोकली. म्हाताऱ्यांनी रिक्षाचालकाला पकडून ठेवलं.
""जाऊ द्या राजा मले, बायको लेकरं वाट पाह्यले.'' म्हणत रिक्षाचालक त्यांच्या तावडीतून सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत बोलला.
तरुणांच्या घोळक्‍यानं त्यांच्या जवळ येताच त्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारायला सुरवात केली.
""विज्या नक्कीच हे गोमांस हय'' एक जण बोलला.
""काय ह्यय बे हे.. कुठून आणलं?'' रिक्षाचालकाचे मानगूट पकडत दुसऱ्यानं इचारलं.
""नाई ह्यो गोमांस नाई.'' रिक्षाचालक विनवनी करीत पुन्हा बोलला.
""त्याले कायले इचारतं'' म्हणत अन्य एकाने पुन्हा त्याला लाथाबुक्‍या मारायला सुरवात केली.
""थांब मी राजूअण्णाले फोन लावतो'' म्हणत एकजण बाजूला झाला. त्यानं फोन लावला. ""अण्णा, पटकन गाडी घेऊन या! मंदिरापुढं एका लांड्यानं गोमांस टाकलं,'' असं सांगत त्यानं फोन कटही केला. रिक्षाचालक त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. पण, तरुणांचं टोळकं ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. काहीच वेळात दहा-पंधरा मोटारसायकल आल्या. कुण्या गाडीवर तिघे तर कुण्या दोघे बसलेले होते. तिघा-चौघांनी रिक्षाचालकाचं बोंकाडं धरलं. त्याला जबरदस्तीने एका मोटारसायकलवर बसवून पोलिस ठाण्यात नेलं. "जय श्रीराम'चे नारे देत आताच्या आता गुन्हा दाखल करा म्हणून पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. उगाच आफत नको म्हणून पोलिसांनी "एनसी' नोंदवली. कडक कारवाई केली जाईल, कत्तलखाना शोधाला जाईल, म्हणतं ठाणेदारानं त्यांची बोळवण केली. गांजाची चढलेली झिंग नि कार्यकर्त्यांचा रुद्र अवतार पाहून बिच्चारा रिक्षाचालकही आपलं म्हणणं ओरडून ओरडून सांगत अचानक गपगुमान झाला. प्रकरण पेट घेईल म्हणून पोलिसांनी रात्रभर त्याला ठाण्यातच ठेवलं. परीक्षणासाठी मांस लॅबमध्ये पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी अहवाल आला, "मांस हल्याचं आहे म्हणून.' लागलीच पोलिसांनी रात्रीच्या तरुणांना बोलावून घेतलं. सार्वजनिक ठिकाणी आरोग्यास घातक पदार्थ फेकल्याच्या आरोपाखाली रिक्षाचालकावर गुन्हा नोंदविला गेला. एव्हाना रिक्षाचालकाची झिंग उतरली. कुणीतरी नवसाला हल्या कापला तेच मांस दावत म्हणून तो घरी घेऊन जात होता. त्याच्यावर गुन्हा नोंदवून करून आपण खूप मोठं सामाजिक काम केल्याच्या आविर्भावात तरुण निघून गेले. दंगल होता होता थांबवली म्हणत पोलिसांनीही स्वतःची पाठ थोपटून घेतली. रिक्षाचालक भेदरलेल्या अवस्थेत ठाण्याच्या परिसरात बसून होता. काही वेळाने क्राइम रिपोर्टर आले. त्यांना त्याला नाव विचारलं. तो उत्तरला, ""धोंडिबा रतन झोडापे.''
 ■ विकास विनायकराव देशमुख
मु. करडा, पो. मोठेगाव, ता. रिसोड, जि. वाशीम.
हॅलो- 9850602275
vikas.535388@gmail.com

मंगळवार, २६ जून, २०१८

बहिणाबाई चौधरी : एक काल्पनिक कवयित्री


हिणाबाई चौधरी. मराठी साहित्यातील अजरामर नाव. धरतीले दंडवत या चौथीतील कवितेमुळे पहिल्यांदा त्यांची ओळख झाली. पुढे रेडिओ, डीडी टेनवर अधून-मधून बहिणाबाईंची गाणी ऐकायला मिळत. त्यावेळी फार काही कळत नव्हतं. तरीही त्यातील नाद, ग्रामीण बोलीतील हलके-फुलके शब्द, अगदी सहजतेनं कुठलीही जोर-जबरदस्ती न करता जुळवून आलेलं यमक. सारंच कसं कानाला मधुर वाटे. खरं सांगायच तर कवी म्हणून जर पहिल्यांदा कुणाचं नाव मला माहित झालं तर ते बहिणाबाईंचं. जसं-जसा मोठा होत गेलो तसं-तसं गावातील शिकलेल्यांकडून, शाळेतील शिक्षकांकडून कधीतरी बहिणाबाईंविषयी ऐकायला मिळे. याच काळात माझी बहीण आरतीताई कुठंही गेली तरी  माझ्यासाठी चाचा चौधरी, ‘चंपक, ‘अकबर-बिरबल अशी गोष्टींची पुस्तकं आणत होती. त्यातून वाचनाची आवड वृंद्धिगत झाली. पण, बहिणाबाई काही वाचायला मिळालीच नाही. पुढे आठवी, नववीत असताना रिसोड, अकोला आणि वाशीमला पुस्तकांच्या दुकानांत बहिणाबाईंच्या पुस्तकांचा शोध घेतला. कुठंच मिळालं नाही. पौंगाडवस्था आली तशी वाचनाची रुचीही बदलली. वि. स. खांडेकर, व. पु. काळे, गुरुनाथ नाईक यांच्यासारख्या लेखकांच्या रंजक कथा आवडायला लागल्या. सुरेश भट, ना. धों. महानोर, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे रात्र-रात्र जागून वाचून काढले. स्वप्न पाहायचं ते वय होतं नि ही मंडळी वर्तमानाऐवजी स्वप्नच दाखवत होती. त्यामुळं त्यांच्या पुस्तकांसह ती भावत होती. शिक्षणासाठी गाव सोडलं. वाशीम गाठलं तसं मिशाबरोबरच मतंही फुटलं. स्वप्न दाखवणारं हे साहित्य फुटकळ वाटू लागलं. विज्ञानवादी साहित्यानं दृष्टीकोन बदलला. पणबहिणाबाई काही डोक्यातून जात नव्हती अन् आर. ए. काॅलेजची लायब्ररी, वाकाटक, रिसोडचं विवेकानंद इथं कुठं ती भेटतही नव्हती. अचानक एक दिवस विष्णू जोशीनं अनेक जुन्या नियतकालिकांची थप्पी रुममध्ये आणून टाकली. ती चाळता-चाळता एक जीर्ण, जागोजागी फाटलेलं पुस्तक सापडलं. ते बहिणाबाईंच्या गाण्याचं होतं. कोण आनंद झाला. अधाशासारखं वाचून काढलं. त्यातील उपमा, उपमेय, विचार यानं भारावून गेलो. त्यावर समीक्षक दृष्टीनं विचार केला तर  जाणवलं, बहिणाबाई चौधरी नावाची कुणी कवयित्रीच नाही. मग या नितांत सुंदर, इतक्या दर्जेदार कविता लिहिल्या तरी कुणी, हा प्रश्नही होताच. 


सोपानदेवांच्याच कविता 

प्रसिद्ध कवी तथा मराठीचे प्राध्यापक, अभ्यासक सोपानदेव चौधरी यांच्या बहिणाबाई या आई. सोपानदेव यांनीच त्यांच्या काही कविता बहिणाबाईंच्या नावावर खपवल्या हे माझं ठाम मत आहे.  ते कुणाला मान्य असो वा नसो. पण, बहिबाईंची गाणी या संग्रहाचे रचनाकार सोपानदेवच आहेत, असं मला वाटतं.


या आहेत शंका

बहिणाबाईंची सर्व गाणी ही देवीवर वृत्तात आहेत. यात प्रत्येक ओळीत फक्त आठच अक्षरं असतात.  मोठ्या सरावानं, कष्टानं आणि शब्द मोजून प्रसंगी कंजुसपणा करून यामध्ये लिहावं लागतं. हे काम सोपं नाही. त्यासाठी सरावाबरोबरच अभ्यासही हवा. आपण चिकित्सकपणे वाचलं तर लक्षात येईल की, भल्याभल्यांना देवीवर जमलं नाही. तिथे इतरांचं काय? मग अक्षर आेळख नसतानाही बहिणाबाईंनी देवीवरमध्ये अक्षर मोजून लिहिलंच कसं? एवढेच नाही तर बहिणाबाईंनी अनुष्टुपमध्येही लिहिण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांच्या कवितांवरून दिसते. माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ही रचना तर फक्त भाषा विज्ञानाचा तज्ज्ञच लिहू शकतो. 
एक वेळ मान्य की या कविता बहिणाबाईंच्याच आहेत. पण, जर सोपानदेवांना (बहिणाबाईंचा प्राध्यापक मुलगा) माहिती होतं की आपल्या आईच्या कविता या खूप छान आहेत, आधुनिक आहेत (मर्ढेकरांच्या काळातच) तर त्यांनी तिच्या अगोदर स्वतःचा काव्यसंग्रह का प्रसिद्ध केला? बहिणाबाई हयात असतानाच सोपानदेवांना कवी म्हणून मान्यता मिळाली, त्यांचं नाव झालं. जेव्हा त्यांना प्रसद्धीची गरज राहिली नाही तेव्हा त्यांनी बहिणाबाईंच्या निधनानंतर आचार्य अत्रेंच्या मदतीने बहिणाबाईंच्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला. तो बहिणाबाईंच्या जिवंतपणीच का प्रकाशित केला नाही. कारण त्या कविता वाचून, ऐकून बहिणाबाईंना भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली असती आणि त्या कविता बहिणाबाईंच्या नाही तर सोपानदेवांच्या आहेत हे कळलं असतं, ही भीती सोपानदेवांना असू शकते. त्यामुळेच बहिणाबाई गेल्यानंतर त्यांनी तिची गाणी रसिकांसमोर आणली असावीत. 
विशेष म्हणजे बहिणाबाई या माहेर, सासर या परिसराच्या बाहेरही कधी गेल्या नाहीत. घर, शेती आणि गाव एवढंच त्यांचं अनुभवविश्व, तरीही त्यांच्या कवितेतील तत्तज्ञान थक्क करायला लावणारं आहे. एका कवितेत त्यांना गावकुसाबाहेरच्या व्यक्तींचा कळवळा येतो. तीही माणसंच आहेत, त्यांनाही हक्क आहेत, हे त्या ठामपणे सांगतात. ज्योतिष्या माझा हात पाहू नको असे सत्यशोधकी विचार मांडतात. तरीही त्या दिशेने त्यांची कृती शून्यच आहे. आपल्या गाण्यांतून चार-चौघांना समजावून सांगताना त्या व्यवस्थेवर हल्ला करत असतील तर त्यांनी अनिष्ठ रुढी, परंपरा नष्ट होण्यासाठी कृती का केली नाही; कारण हेच की ते विचार बहिणाबाईंचे नसून ते त्यांच्या शिकलेल्या मुलाचे होते. तेही गाव सोडल्यानंतर, पदवीनंतरचे. गंमत म्हणजे स्वतःच्या हातावर, कतृत्वावर विश्वास ठेवा असा उपदेश करणाऱ्या बहिणाबाईंची माझी माय सरसोतीही कविता वरील कवितेच्या विसंगत आहे. ज्योतिष्याला जे सांगितलं ते स्वतःचंच मत त्यांनी स्वतः क्राॅस केलं. ते यासाठीचं लिहिलं असावं की एक अडाणी बाई एवढं सारं कसं सांगू-लिहू शकते हे कुणी विचारलं तर त्याला गप्प करण्यासाठी माझी माय सरसोती, मले शिकवते बोली.. हे उत्तर आहेच. 
नाही म्हणायला बहिणाबाईंचं चरित्र जसं रंगवल्या गेलं तशा स्वभावानुसार संसार, घर, माहेर, सासर अशा कविताही संग्रहात आहेत. परंतु, त्यातील देवीवरची अचुकता सांभाळण्याची कसरत आणि तत्वज्ञान पाहिलं तर वाटतं की एका अशिक्षित व्यक्तीचं हे काम नाही. हे सोपानदेवांनीच लिहिलं हे नक्की. काहीही असो या कविता म्हणजे गावरान मेवाच आहेत. आचार्य अत्रेंच्या शब्दांत सांगायचं झालं तर जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशा बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे.


- विकास वि. देशमुख Vikas V. Deshmukh 
करडा, रिसोड, वाशीम. Karda, Risod, Washim